प्रस्तावना : राजकारण हे मानवी जीवनाशी निगडित असून त्यांच्या व्यवहारावर आणि कारभारावर त्याचा परिणाम होत असतो. सत्ताधार्‍यांच्या चांगल्या-वाईट निर्णयांचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. एवढेच नव्हे, तर ते स्वीकारणे अटळ असते. राजकारणाचा प्रभाव समाजमनावर पडत असतो. पर्यायाने मानव हा राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही.

धर्म हा आत्म्याशी आणि मुक्तीच्या, तारणाच्या अंतिम मूल्यांशी संबंधित असतो. म्हणूनच पुष्कळदा बहुतेक धार्मिक माणसे राजकारणाबद्दल आस्था बाळगीत नसतात. राजकारण ऐहिक आहे; ते भ्रष्ट, मोहमयी आहे असे मानून काही लोक राजकारणापासून दूर राहतात. वास्तविक पाहता जे धार्मिक, सत्प्रवृत्त आणि सदाचरणी असतात त्यांनी राजकारणात अधिक सहभागी व्हायला हवे, म्हणजे राजकारण अधिक शुद्ध राहू शकेल. राजकारणातील भ्रष्टाचार हा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. भ्रष्टाचारविरहित राजकारण आणण्यासाठी सत्शील, धार्मिक माणसांनी राजकीय प्रक्रियेपासून अलिप्त न राहता तीत अधिक सक्रिय असणे अपेक्षित असते.

नामदार गोखले यांनी राजकारणाच्या शुद्धीकरणाचा किंवा आध्यात्मिकीकरणाचा (Spiritualization of Politics) आग्रह धरला होता. आज त्याची नितांत गरज आहे. महात्मा गांधी हे अतिशय धार्मिकवृत्तीचे होते. ईश्वराशी एकरूप होऊन मोक्ष मिळविणे, हे त्यांनी अंतिम उद्दिष्ट मानले होते. राजकारणात सक्रिय राहून त्यांनी ऐतिहासिक क्रांती घडवून आणली.

ख्रिश्चन आणि राजकारण : म्हणूनच ख्रिस्ती लोकांनी राजकीय जीवनापासून दूर राहणे बरोबर नाही. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेपासून (१९६०–६५) कॅथलिक चर्चने लोकांना राजकीय प्रक्रियेत सामील होण्याची प्रेरणा दिलेली आहे. सर्वांच्या भौतिक गरजा पूर्ण व्हायला हव्यात. भौतिक भरभराटीचा मार्ग सर्वांना खुला असावयास हवा. मानवी प्रतिष्ठा, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि शांती ही मूल्ये समाजात सुरक्षित असावयास हवीत, म्हणूनच ख्रिस्ती लोकांनी राजकारणात सक्रिय असावयास हवे.

धर्म आणि राजकारण : ख्रिस्ती लोकांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. याचा अर्थ असा नव्हे की, स्वार्थी, संकुचित राजकारणात धर्माचा (गैर) वापर व्हावा. केवळ कुणी एका विशिष्ट धर्माचा आहे म्हणून त्याला निवडून देणे अथवा सत्तास्थानावर बसवणे हे गैर आहे. आपल्या धर्मनिरपेक्ष राजकीय प्रणालीशी ते सर्वथैव विसंगत आहे. आपल्या देशात धर्माचा गैरवापर राजकीय सत्ता मिळविण्यासाठी होत आहे, हे दुर्दैव आहे. न्यायालयात काही निवडणुकांना आव्हान देण्यात आले, आणि धार्मिक भावनांना आवाहन करून धर्माचा गैरवापर केल्याने निवडणुका अवैध ठरविण्यात आल्या आहेत.

भारत हा अनेक धर्मीयांचा देश आहे. सर्व धर्मीयांनी हा देश घडविलेला आहे. म्हणूनच या देशात धर्माचा वापर एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षांसाठी करणे अन्याय्य आहे. ख्रिस्ती लोक जगात राहतात, ते देशाचे नागरिक असतात आणि लोकहिताबद्दल अनास्था ठेवू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी राजकीय प्रक्रियेत सामील व्हायला पाहिजे, अशी चर्चची आग्रही भूमिका आहे.

येशू ख्रिस्त आणि राजकारण : तथापि एक धर्मसंस्था म्हणून चर्च राजकारण करू शकत नाही. येशू ख्रिस्त यांचे कार्य करीत राहणे, हे चर्चचे कर्तव्य आहे. येशू ख्रिस्त हे स्वत: राजकारणी नव्हते. ‘माझे राज्य या जगाचे नाही’ असे त्यांनी पिलाताला, राजसत्तेच्या प्रतिनिधीला सांगितले. राजकीय सत्ता मिळविणे हे येशू ख्रिस्त यांचे उद्दिष्ट नव्हते. जगामध्ये ईश्वराची अधिसत्ता प्रस्थापित करणे, हे त्यांचे कार्य होते. ‘तुझे राज्य येवो’ अशी प्रार्थना करण्यास त्यांनी आपणास शिकविले. तारण, अविनाशी जीवन, चिरंतन आत्मिक मूल्ये हे येशू ख्रिस्त यांच्या संदेशाचे विशेष होते. त्यांनी स्थापन केलेले चर्च हे असे धार्मिक, आध्यात्मिक, मुक्तीमय स्वरूपाचे आहे. चर्च हे जगात आहे हे निश्चित; पण ते जगाचे नाही. ऐहिक राजसत्तेचे महत्त्व चर्चला नाही असे नव्हे; पण राजसत्ता बळकट करणे हे चर्चचे काम नाही. चर्चचे क्षेत्र वेगळे आहे. तिच्या कार्याचे आणि कार्यपद्धतीचे स्वरूप निराळे आहे, म्हणून चर्च राजकारणात भाग घेऊ शकत नाही.

समाजजीवनात चर्चचे स्थान फार मोठे आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतील चर्चचे कार्य नेत्रदीपक आहे. समाजावरील चर्चच्या प्रभावामुळे तिचा राजसत्ता मिळविण्यासाठी वापर करून घेण्याचा मोह होऊ शकतो; पण तो सर्वांनीच टाळायला हवा. एखाद्या पक्षाला सत्तेवर येण्यासाठी चर्चने मदत करणे हा चर्चचा राजकारणासाठी झालेला गैरवापर आहे. तशी अपेक्षा बाळगणे बरोबर ठरत नाही; कारण राजकीय सत्तेसाठी चर्चचा जन्म झालेला नाही.

राजकारण हे जीवनव्यापी असले, तरी ते ‘पक्षीय’ असते. राजकीय पक्षांच्या माध्यमातून राजसत्ता मिळविली जाते. पक्षीय राजकारण हे नेहमी ‘एक्स्क्लूसिव्ह’ असते. म्हणून राजकारणात स्पर्धा असते. चर्च हे सगळ्यांसाठी आहे. चर्चला सर्व नागरिक समान आहेत. ऐक्य हे चर्चचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जेथे विभाजन, गटबाजी, फाटाफूट असते, तेथे चर्च नसते. चर्चमध्ये सर्वांना एकत्र नांदता आले पाहिजे. या ऐक्यासाठी चर्च पक्षीय राजकारणाशी संबंध ठेवू शकत नाही.

धर्मगुरू आणि राजकारण : लोकांना चर्चच्या छत्राखाली एकत्रित आणणे आणि ठेवणे हे आत्यंतिक महत्त्वाचे कार्य आहे. म्हणूनच धर्मगुरूंनी राजकारणात भाग घेऊ नये, असे चर्चचे धोरण आहे. धर्मगुरूंचा राजकारणातील भाग भारतीय संविधानाच्या दृष्टीने आक्षेपार्ह नाही. एक भारतीय नागरिक म्हणून धर्मगुरूला राजकारणाचा हक्क आहे; पण चर्चने स्वतंत्रपणे ठरविलेल्या अंतर्गत धोरणानुसार धर्मगुरूला राजकारणात, विशेषत: पक्षीय राजकारणात, भाग घेता येत नाही.

लोकांना नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची संधी मिळावयास हवी. म्हणून त्यांनी राजकीय क्षितिजावर प्रमुख भूमिका बजवावी, अशी चर्चची शिकवण आहे. ऐहिक, भौतिक क्षेत्र हे खास त्यांच्या कामगिरीसाठी आहे. म्हणून धर्मगुरूंनी सक्रिय राजकारणापासून मोकळे असावयास हवे.

आपल्या कळपाची काळजी वाहणे, समाजजीवनात धार्मिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे, ही धर्मगुरूंची प्रमुख जबाबदारी आहे. गुरुदीक्षेच्या वेळी उमेदवारांना त्यांच्या खास जबाबदारीविषयी असाच उपदेश केला जातो.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धर्मगुरू हा समाजाच्या ऐक्याचे प्रतीक आणि साक्षी असला पाहिजे. राजकारणात वेगवेगळे गट, पक्ष असतात. धर्मगुरू पक्षीय राजकारणाशी संबंधित असल्यास एकाच पक्षाचे लोक त्याच्या सभोवताली राहतील. दुसऱ्या पक्षातील लोकांचे काय? धर्मगुरू हे आपलेदेखील प्रतिनिधी आहेत असे ते मानतील काय? सक्रिय पक्षीय राजकारणात असलेल्या धर्मगुरूस कळपाचे ऐक्य अबाधित राखणे, सर्वांचे सहकार्य मिळविणे कठीण होऊन बसेल.

मानवी मूल्यांचा आग्रह : मानवी प्रतिष्ठा, मानवी हक्क, न्याय, समता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये चर्चच्या संदेशास आणि कार्यास पायाभूत, आधारभूत आहेत. मानवी कल्याणाच्या दृष्टीने ही मूल्ये आवश्यक आहेत. म्हणून राजकारणात, पक्षीय राजकारणात किंवा राजसत्तेमुळे ही मूलभूत मानवी मूल्ये जेव्हा धोक्यात येतात, तेव्हा मात्र ‘मानवी सद्विवेकाचा संरक्षक’ ही भूमिका चर्चने बजावयास हवी. तसे जर चर्चने केले नाही, तर चर्चच्या प्रयोजनाबद्दल प्रश्न निर्माण होतील. म्हणून जगभर जेथे मानवी मूल्यांची पायमल्ली होत असते, तेथे चर्च आपला आवाज उठविते. राजसत्तेपासून जनतेवर अन्याय होत असताना टीका करणे आणि न्यायाची मागणी करणे, हे चर्चचे कर्तव्य ठरते. तसे करणे म्हणजे राजकारणात हस्तक्षेप नव्हे.

संदर्भ :

  • Cardinal Gracias, Cardinal Gracias Speaks, Mumbai, 1977.
  • Dias, Fr. Mario Saturnino, Evangelization in the light of Ecclesia In India, Bangalore, 2003.
  • Flanery, Austin, Vatican Council II : More Post Conciliar Documents, Vol. 2, Mumbai, 2014.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया