सस्तन प्राण्यांमध्ये रोगजंतूंचा प्रतिकार करणारी नैसर्गिक यंत्रणा आढळून येते. वनस्पतींमध्ये त्या स्वरूपाची प्रभावी यंत्रणा नसते, तरीही त्या रोगजंतूंचा प्रतिकार निश्चितपणे करतात असे संशोधनांती दिसून आले आहे. वनस्पती त्यांच्या बाधित पेशींद्वारे मिळणाऱ्या रासायनिक संदेशांद्वारे याचे नियोजन करतात. रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींच्या वाढीवर तसेच पुनरुत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
या परिस्थितीचा सामना करताना वनस्पती मुख्यत्वेकरून दोन प्रकारच्या प्रतिकारक प्रणालींचा वापर करतात. पहिल्या प्रकारात, वनस्पती विविध सूक्ष्मजीवांकडून (ज्यात रोगकारक नसलेल्या सूक्ष्मजीवांचाही समावेश असतो) निर्माण होणाऱ्या रेणूंना प्रतिकार करण्याची स्वतंत्र अशी यंत्रणा स्वत:मध्ये विकसित करतात. तर दुसऱ्या प्रकारात, वनस्पती या रोगकारक सूक्ष्मजीवांमधील घातक घटकांना थेट प्रतिकार करताना दिसतात. वनस्पतींमध्ये आढळून येणारी ही रोगप्रतिकारक यंत्रणा आणि त्याद्वारे सूक्ष्मजीव अथवा त्यांच्यातील घातक रसायनांना केलेला प्रतिकार यांबद्दलची माहिती एकंदरच पेशीविज्ञानापासून ते सजीवांची उत्क्रांती यांच्या आकलनात महत्त्वाचे योगदान देते.
हे रोगकारक जीवाणू वनस्पतींची पर्णरंध्रे, जलरंध्रे अथवा त्यांना झालेल्या जखमांद्वारे प्रवेश करतात आणि पेशींमधील (कोशिकांमधील) मोकळ्या जागेत स्थिरावून वाढीस लागतात. टोळ किंवा मावे वनस्पतींच्या पेशीत सोंड खुपसून थेट शिरकाव करतात, तर बुरशीवर्गीय जीव वनस्पतींच्या खोड किंवा सालीतून प्रवेश करून वृद्धितंतूंचे दाट जाळे विणतात. रोगकारक किंवा सहजीवी बुरशी आणि त्यांची कवकबीजे यजमान वनस्पती पेशींमध्ये अन्नरसाद्वारे प्रवेश करतात. यानंतर वनस्पतींची आणि कवकांची पेशीभित्तीका आणि पेशीबाह्य जाळे यांचे मिळून एक पटल तयार होते. या पटलाद्वारे त्यांच्यातील एकमेकांच्या प्रभावाची व्याप्ती ठरविली जाते. हे विविध गटातील रोगकारक जीव, रोगाचा प्रसार अधिक सक्षमपणे करण्यासाठी विविध विषारी रसायने आणि घटकांची निर्मिती करून ते मूळच्या वनस्पती पेशीत पसरवितात.
समीक्षक : डॉ. बाळ फोंडके