भारतातील एक अनुसूचित जमात. कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड, चिकमंगळूर, शिवमोगा, दावणगिरी, उडुपी, हसन, कोडगू या जिल्ह्यांच्या पर्वतीय व इतर प्रदेशांत विखुरलेली आहे. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार कर्नाटक राज्यातील लोकसंख्या ४४० इतकी, तर संपूर्ण सुमारे २,००० इतकी होती.
मलेरू जमात कन्नड आणि तुळू या दोन समुहांचा संगम असून कन्नड व तुळू भाषेत मलेरू म्हणजे, पर्वतरांगांमध्ये वास्तव्य करणारे, असा होतो. त्यांचा पर्वतीय भागांत असलेल्या वास्तव्यामुळे त्यांना मलेत्तया असेही म्हणतात. पांडव जेव्हा जंगलात फिरत होते, तेव्हा त्यांची भेट या जमातीच्या लोकांशी झाली. त्यांनी या समूहाला जंगलातून वेलची (वेलदोडा) गोळा करण्याचा अधिकार दिला अशी या लोकांची समजूत आहे.
मलेरू या जमातीच्या ओरू मेल व नाडू मेल या दोन उपजाती आढळतात. या दोन उपजाती सामाजिक व प्रांतिक भेदाच्या स्तरावर भिन्न आहेत. जमातीची बंगेरा, बुन्नालू, बालागाराना, बारथेरू, बुदेंरू, मुल्ये इत्यादी कुळी असून त्यांना ‘बरी’ असे म्हणतात. परस्परांत हे लोक तुळू या मातृभाषेतून बोलतात, तर इतरांशी बोलताना व लिहिताना ते कन्नड भाषेचा वापर करतात.
मलेरू जमातीचा पारंपरिक व्यवसाय शिकार करणे व जंगलातील मेवा गोळा करणे होता. काही मलेरू लोकांना शासनाकडून शेतजमीनी मिळाल्यामुळे ते त्यात कॉफीची लागवड करतात. याव्यतिरिक्त ते शेतमजुरी, जंगलातून लाकूड, इंधन व इतर वस्तू गोळा करणे, बांबूंच्या टोपल्या व चटया बनविणे इत्यादी काम करताना दिसतात. मलेरू स्त्रिया शेतातील, सामाजिक, सांस्कृतिक अशी सर्व प्रकारची कामे करून कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावतात. हे लोक शाखाहारी व मांसाहारी असून भात हे यांचे मुख्य अन्न आहे.
मलेरू जमातीत सर्व कुळी, उपजमातींमधील सलोखा टिकविण्यासाठी ‘गुरीकारा’नामक प्रमुख नेमलेला असतो. जमातीत भांडणे झाल्यास तो मिटविण्याचे काम करतो.
जमातीतील सर्व लग्नविधी मुलींच्या घरी होतात. आत्ते-मामे भावा-बहिणींमध्ये लग्न लावली जातात. मुलीकडून तीन प्रकारे हुंडा घेतला जातो, त्याला ‘मुडी’ असे म्हणतात. त्या बदल्यात मुलीला तांदळाची गोणी दिली जाते. पुनर्विवाहास मान्यता असते. बाळाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी बाळाचे नाव ठेवतात.
हे लोक पूर्वज व राक्षसांची पूजा करतात. पंजुर्ली, कलकुर्ती, गुलीगा, ब्रम्हमेरू या त्यांच्या मूळ देवता, तसेच हिंदू देवदेवतांचीही पूजा करतात. हे लोक विशू, नगारापंचमी, संक्रांती, नागपंचमी, कादिरूहाब, दिवाळी इत्यादी सण साजरे करतात. ते लोकसंगीत, लोकनृत्य, पारंपरिक ढोल व इतर वाद्य वाजवून आनंदाने हे लोक उत्साह साजरे करतात. या वेळी पुरुष ताडी आणि अरेक ही पेय पितात.
हे लोक मृत्युनंतर मृत व्यक्तीला दहन करतात आणि अकरा दिवसांचा दुखवटा पाळतात.
संदर्भ ꞉ Singh, K. S., People of India, Oxford University Press, 1998.
समीक्षक ꞉ लता छत्रे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.