भारतातील एक अनुसूचित जमात. या जमातीचे वास्तव्य जम्मू व काश्मीर राज्यातील लडाख जिल्ह्यातील मुख्यतः गारकून, दारचीक, चुलीचान, गुरगुरडो, बटालिक, दाह, हानो, गार्कोन या खेड्यांमध्ये व सिंधू नदीच्या खोऱ्यांत आढळते. लडाखी भाषेत त्यांना ‘मीनारो’ (आर्य) या नावानेही ओळखले जाते. ही जमात हिमाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग व तवांग या जिल्ह्यातही काही प्रमाणात आढळून येते. हे लोक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथून आले आहेत. ते चिलासचा राजा पॉईनलो यांस आपले वंशज मानतात; तर काहीजण अलेक्झांडर द ग्रेट यांच्या हरविलेल्या एका सैन्याचे वंशज असल्याचे मत मांडतात. त्यांची लोकसंख्या सुमारे १,८०० आहे.

ब्रोक म्हणजे ‘टेकडी’ आणि पा म्हणजे ‘लोक’ यानुसार ब्रोकपाचा अर्थ ‘पर्वतीय लोक’ असा होतो. त्यांचे अनेक भागांत व्यवसायानुसार वर्गीकरण झाले आहे. उदा., शेख (याजक-धर्मगुरू), रोम किंवा राजराम (सत्ताधारी), शिन (शेतकरी) व डोम (कलाकार).

या जमातीचे लोक रंगाने गोरे, मध्यम बांध्याचे, लांबुळक्या डोक्याचे, मध्यम आकाराच्या नाकाचे आहेत. गडद लाल रंगाचा पायघोळ झगा व त्यावर कमरबंध, शेळीच्या कातडीची व लोकरीची वस्त्रे असा पुरुष व स्त्रीया दोघांचाही पारंपरिक पोशाख आढळतो. पुरुष व स्त्रिया डोक्यावर वेगळ्या रंगीत फुलांनी, मण्यांनी, पिसांनी, कवळ्यांनी सजविलेल्या रंगबिरंगी टोप्या घालतात. ते सप्तरंगी रिबीन व मणी वापरतात, ज्यामुळे सूर्य ग्रहणांपासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून बचाव होतो, असे ते मानतात. स्त्रिया वेगवेगळ्या धातूंचे आणि सोन्या-चांदीचे दागिने घालतात. शरीरावर धातू परिधान केल्याने रोगराईपासून संरक्षण मिळते, असा त्यांचा समज आहे. तसेच ग्रहांच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी चांदीचे ब्रूच व अर्धांगवायू न होण्यासाठी मोराचे पीस वापरतात. काही लोक आधुनिक पोशाखही परिधान करताना दिसून येतात. हे लोक आपापसांत इंडो-यूरोपीयन भाषाकुळातील ब्रोकस्कॅट ही पारंपरिक भाषा बोलतात.

त्यांची घरे लाकडाच्या पाट्यांची व पक्के असून ती स्वच्छ असतात. ज्या जागेवर अग्नी प्रज्वलित केला जातो, ती जागा पवित्र समजली जाते. हे लोक भांडी स्वच्छ व चकचकीत ठेवतात; कारण ते सर्व धातूंना पवित्र मानतात. घरातील खांबांमध्ये अद्भुत शक्तिचा वास असल्याचे ते मानतात. घराच्या बाहेर परसबागेत भाज्या, फळे, गहू, बार्ली इत्यादी पिके पिकवितात.

त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. शेतात बार्ली, गहू, अक्रोड, सफरचंद, जर्दाळू व विविध प्रकारच्या भाज्या पिकवितात. तसेच मजुरी, मेढ्यांच्या लोकरीपासून हस्तकलात्मक वस्तू बनविणे ही कामेही ते करतात. काही ब्रोकपा सैन्यात व इतर सरकारी व खाजगी नोकरीत आढळून येतात. हे लोक शाखाहारी व मांसाहारी असून कांडलेली बार्ली व गहू हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. ते बटाटा, भोपळे, स्थानिक भाज्या व फळे खातात. मुसलमान सोडून इतर कोणत्याही जातींचे अन्न ते स्वीकारत नाहीत.

यांच्यात चुलत भावंडांशी लग्न लावण्याची प्रथा आहे; मात्र मावस भावंडांशी लग्नास मान्यता नाही. वधू पित्याकडून हुंडा घेतला जातो. पूर्वी बहुपत्नीत्वाची चाल होती, ती आता दिसून येत नाही. घटस्फोट आणि पुनर्विवाहास मंजुरी आहे. मुले व मुलींना वडिलोपार्जित संपत्तीमधील कमी-जास्त प्रमाणात हिस्सा मिळतो.

बहुतांश ब्रोकपा हे शिया मुसलमान असून काही बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. डोम, बाल्टी व बौद्ध धर्मीयांशी ते व्यवहार करतात. हे लोक निसर्ग पूजक असून ते ला-डोंगला आणि सपदक या त्यांच्या मूळ देवतांची पूजा करतात. या देवतांना प्राण्यांची बळी देण्याची प्रथा आहे.

ब्रोकपा लोकांत सण-उत्सवांच्या वेळी लोकसंगीत व लोकनृत्याची जुनी परंपरा आढळून येते. ते जर्दाळूच्या फुलांच्या स्मरणार्थ मेंटोग स्टॅनमो; शेतातील कापणीच्या वेळी बोनाना हा पाच दिवसांचा उत्सव आणि छोपो सुपला हा उत्सव साजरा करतात. त्यांचा लोपा हा महोत्सव खास असून या महोत्सवात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण एकत्रित नृत्यात सहभागी होतात.

जमातीत मृत्युनंतर व्यक्तीला आंघोळ घालून कापडात गुंडाळतात आणि प्रार्थना म्हणून मृत व्यक्तीचे दफन करतात.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक :  शौनक कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.