पालवणकर, बाळू : (१९ मार्च १८७६ – ४ जुलै १९५५). पहिल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि विख्यात गोलंदाजपटू. पूर्ण नाव बाळू बाबाजी पालवणकर. पी. बाळू या नावेही प्रसिद्ध. त्यांचा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत धारवाड येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पालवण हे त्यांचे मूळ गाव. वडील आणि आजोबा लष्करी खात्यामध्ये नोकरीला होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण मिलिटरी स्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांचा क्रिकेटशी संबंध आला. सैन्याने निकाली काढलेल्या वस्तूंच्या साहाय्याने पालवणकर आणि त्यांचे भाऊ क्रिकेट खेळायला शिकले.

पालवणकर हे सुरुवातीला मैदानावरील क्रिकेटच्या खेळपट्टीच्या संयोजनाचे काम बघत असत (१८९२). ही खेळपट्टी पारशी लोकांची होती. यासाठी त्यांना महिन्याला तीन रुपये इतका पगार मिळत होता. नेट लावणे, खेळपट्टी आरेखन करणे, गवत कापणे यांसारखी कामे ते करत. याठिकाणी अनेक ब्रिटिश खेळायला येत. ते पालवणकर यांना गोलंदाजी करायला लावत. यातूनच पालवणकर यांनी गोलंदाजीत नैपुण्य संपादन केले. पारशी क्लबमध्ये मेजर जे. जी. ग्रेग (१८७१-१९५८) नावाचे एक ब्रिटिश फलंदाज होते, ते पालवणकर जितक्या वेळेस बाद (आउट) करतील तितक्या वेळेस त्यांना आठ आणे द्यायचे. पुढे त्यांना पुण्याच्या संघात स्थान मिळाले. पुण्यातील एका स्पर्धेत यूरोपीय संघाला हरवल्यानंतर पालवणकर यांचा साताऱ्यात हत्तीवरून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. एका सार्वजनिक सभेत लोकमान्य टिळकांनी पालवणकर यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते.
पुण्यात प्लेगची साथ आली (१८९६). त्याच काळात मुंबईत क्रिकेटला बहर आला होता. तेव्हा पालवणकर मुंबईत गेले. तत्कालीन बॉम्बे बेरार अँड सेंट्रल इंडियन रेल्वे कंपनीने त्यांना नोकरी दिली. तेव्हा हिंदू जिमखान्याकडून ते खेळू लागले. १९०० ते १९१० या काळात पालवणकर यांच्या गोलंदाजीचा क्रीडाक्षेत्रात मोठा प्रभाव होता. जगभरातील पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये त्यांची गणना होत होती. त्यांचे इतर चार भाऊ विठ्ठल, कृष्णा, गणपत आणि शिवराम हे सुद्धा क्रिकेटपटू होते. क्रिकेट या खेळामधील जातीयतेशी पालवणकर बंधूंना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागला. तरीही स्वकष्टावर या खेळात त्यांनी प्रावीण्य मिळवले. प्रसिद्ध पारशी क्रिकेटपटू डॉ. एम. ई. पावरी यांच्या क्रिकेटवरील पुस्तकात ‘हिंदुस्थानचे ऱ्होडस’ असा पालवणकर यांचा गौरव केला आहे.
भारतीय संघाने पहिल्यांदा १९११ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. या ऐतिहासिक संघात पालवणकर यांचा समावेश होता. पालवणकर यांनी त्या दौऱ्यात १८.१४ च्या सरासरीने ११४ बळी (विकेट्स) पटकावले. इंग्लंडमधल्या पत्रकारांनी, क्रिकेट समीक्षकांनी पालवणकरांच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली होती. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यावर रोहिदास विद्यावर्धक समाज, मुंबई यांच्यावतीने त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले (१९२०). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विशेष प्रयत्नाने हा सत्कार घडवून आणला. पालवणकर यांना द्यावयाच्या मानपत्राचा मसुदा स्वत: आंबेडकरांनी लिहिला होता. पुढे लवकरच मुंबई महानगरपालिकेत अस्पृश्यांसाठी एक जागा डॉ. आंबेडकरांनी मिळवली आणि त्या जागेवर पालवणकर यांची नियुक्ती झाली.
क्रीडा क्षेत्रातही स्पृश्य-अस्पृश्यता होती. याचे चटके पालवणकर यांना सहन करावे लागले. अस्पृश्य समाजातील पहिले क्रिकेटपटू म्हणून पालवणकर यांच्याबद्दल सर्वांनाच कौतुक व अप्रूप वाटत होते. दलित समाजाला त्यांच्याविषयी अभिमान वाटत होता. पालवणकर दलित चळवळीतही काहीकाळ सक्रीय होते. बहिष्कृत हितकारिणी सभेचे ते सदस्य होते (१९२४). नंतर महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन ते काँग्रेसकडे वळले. चांभार समाजाच्या सामाजिक परिषदांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई इलाका चांभार परिषदेचे ते अध्यक्ष होते (१९३०). एक मतदान पद्धतीला पालवणकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली (१९३१). पालवणकर यांना मुंबई विधीमंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभे केले; तथापि ते पराभूत झाले (१९३७). भारतीय दलित सेवा संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
मराठी नाटककार मामा वरेरकर यांनी पालवणकर यांच्या आयुष्यापासून स्फूर्ती घेऊन ‘तुरुंगाच्या दारात’ हे अस्पृश्योद्धारावरील नाटक लिहिले होते (१९२३). मुंबईतील प्रभादेवी परिसरातील एका रस्त्याचे ‘पी.बाळू मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे.
संदर्भ :
- Guha, Ramchandra, A Corner of A Foreign Field – The Indian History of a British Sport, 2016.
- Kidambi, Prakash, Cricket Country – The Untold History of the First All India Team, 2019.
- पी. बाळू , ‘माझे क्रीडा जीवन’, भारती प्रकाशन, मुंबई, १९४८.
- मुंबई इलाका चांभार परिषद, ‘अध्यक्ष बाळू पालवणकर यांचे भाषण’, मुंबई, २२ ऑक्टोबर १९३०
- वाळिंजकर, आत्माराम, ‘उत्तर कोकण दलितमुक्ती चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ १९००-१९६०’, डिंपल पब्लिकेशन, ठाणे, २००७.
समीक्षक : संजय दुधाणे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.