एम्पेडोक्लीझ : (इ.स.पू. सु. ४९०—४३०). ग्रीक तत्त्ववेत्ता, कवी, धार्मिक गुरू आणि शरीरविज्ञानशास्त्रज्ञ. सॉक्रेटिस पूर्वीच्या तत्त्ववेत्त्यांमध्ये त्यांचे स्थान अत्युच्च मानले जाते. त्यांचा जन्म सिसिलीमधील ॲक्रागास येथे झाला.

विश्व एकजिनसी द्रव्य आहे या पार्मेनिडीझच्या तत्त्वाने एम्पेडोक्लीझ प्रभावित होते. तरी त्यांनी सभोवतालचे जग पृथ्वी (जमीन), आप (पाणी), वायू (हवा-इथर) आणि तेज (अग्नी) चार तत्त्वांनी बनले आहे, असे प्रतिपादन केले. या चार ‘मूलभूत’ तत्त्वांचे विविध प्रमाणात मिश्रण होऊन सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी बनतात, असा त्यांचा विश्वास होता. निसर्ग याच तत्त्वांचा वापर करून वनस्पती, प्राणी, माणसे, पक्षी, मासे इ. निर्माण करतो, असे त्यांचे मत होते. आधीच्या तत्त्ववेत्त्यांनी आप, वायू आणि तेज ही तीन तत्त्वे उल्लेखलेली आहेत, मात्र पृथ्वी (जमीन) या तत्त्वाची भर एम्पेडोक्लीझ यांनी घातली. हेराक्लायटसप्रमाणे पृथ्वी, आप, वायू आणि तेज या चार तत्त्वांखेरीज प्रेम आणि द्वेष या दोन शक्तीही पदार्थाच्या संघटन वा विघटन करण्यात सहभागी असतात, असे त्यांचे मत होते. प्रेम संघटन व रचना निर्मिर्तीस आणि द्वेष विघटन व विलयास कारणीभूत ठरते.

जगात बदल होत राहतात. सॉक्रेटिस पूर्वीच्या अनेक तत्त्ववेत्त्यांना बदल आभासी वाटत असे. परंतु एम्पेडोक्लीझ यांच्या मते, बदल हे वास्तव आहे. बदलामुळे संघटन आणि विघटन एकापाठोपाठ सतत होत राहतात. नवनिर्मितीत पुनर्जन्माचा अंतर्भाव होतो असे त्यांना वाटे. ते पायथॅगोरस यांचेही अनुयायी होते. धर्मकृत्याचा भाग म्हणून प्राणी बळी देणे हे चुकीचे आहे, अशीही त्यांची धारणा होती..

एम्पेडोक्लीझ यांनी ‘ऑन नेचर’ आणि ‘द प्युरिफिकेशन्स’ ही उपदेशात्मक खंडकाव्ये लिहिली. साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीच्या त्यांच्या लेखनातील  सु. पाच हजार ओळी सापडल्या आहेत. त्या काळच्या अन्य तत्त्वज्ञांच्या तुलनेने एम्पेडोक्लीझ यांचे बरेच लिखाण मिळाले आहे. हे लिखाण सु.  दीडशे तुकड्यांत असून त्यातील काही अर्धवट तर काही द्विरुक्तीपूर्ण आहेत. यांपैकी बहुसंख्य ‘ऑन नेचर’ संबंधित असून फक्त दोन तुकड्यात ‘द प्युरिफिकेशन्स’ चा उल्लेख आहे.

एम्पेडोक्लीझ आजारी लोकांना तपासून उपाय सुचवीत आणि शरीरशास्त्राच्या ज्ञानाने रुग्णाला दिलासा देत. गर्भाची आणि भ्रूणाची वाढ यांविषयी त्यांनी सखोल अभ्यास केला होता. डार्विन यांच्याप्रमाणेच एम्पेडोक्लीझ यांना माता आणि पिता या दोघांकडून विविध इंद्रियांचे सूक्ष्म कण (pangens) समप्रमाणात आलेली बीजे एकत्र येऊन भ्रूण तयार करता, असे वाटे. ज्ञानेंद्रिये विशिष्ट प्रकारचे संवेदन मिळवू शकतात आणि त्याकरिता ते सूक्षम-कण किंवा सूक्ष्मछिद्रे यांचा वापर करतात, अशी त्यांची धारणा होती. परंतु आपल्या ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत आणि ज्ञानेंद्रियाच्या मदतीने आपल्याला पूर्ण जग जाणवू शकत नाही. अर्थात त्यांना क्ष-किरण, अतिनील किरण, अति उच्च कंप्रतेच्या ध्वनिलहरी इ. माहीत होते वा निर्देशित करायचे होते असे ठरवता येणार नाही. परंतु मानवी ज्ञानेंद्रियांच्या आणि आकलनाच्या मर्यादा ध्यानी येणे त्यांच्या प्रतिभेचे द्योतक आहे.

हवेला वजन असते, प्रकाशाचा वेग प्रचंड, परंतु सांत असतो, नगरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवले, तर प्लेग आटोक्यात येतो, सूर्याच्या प्रकाशझोतात पृथ्वीच्या पुढ्यात चंद्र येतो तेव्हा त्याच्या सावलीचा रुंद पट्टा पृथ्वी झाकोळून टाकतो इ. विविध मुद्यांबाबतचे एम्पेडोक्लीझ यांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या काव्यातून, भाषणांतून ते अलंकारिक भाषा वापरीत, वाचकांना, श्रोत्यांना खुबीने प्रश्न विचारून आपली मते आणि दृष्टिकोन त्यांना सहज पटेल असे पाहात, त्यांची मने वळवित. ते लोकशाहीचे आणि समानतेचे पुरस्कर्ते होते.

एम्पेडोक्लीझ स्वतःला स्वर्गातील देव मानत. स्वर्गात असताना त्यांच्याकडे पवन आणि पर्जन्य नियंत्रण करण्याची शक्ती होती. मृत माणसाना जिवंत करणे ही शक्तीही त्यांच्या अधीन होती. दुर्दैवाने स्वर्गातील वास्तव्यात मांसाहार करण्याची चूक एम्पेडोक्लीझ यांनी केली. त्यामुळे त्यांना स्वर्गातून पृथ्वीवर, ग्रीसमध्ये यावे लागले. अशी त्यांची स्वतःबद्दलची, अवास्तव वाटावी, अशी धारणा होती. या अवास्तव धारणेचा परिपाक म्हणजे त्यांनी आपले देवत्व सिद्ध करण्यासाठी एटना पर्वतावरून आगीत उडी मारली आणि दुर्दैवाने त्यात जीव गमावला, अशी वदंता आहे. एम्पेडोक्लीझ यांच्याबद्दलची बरीचशी माहिती डायोजीनस लेर्शियस यांच्या ‘लाईव्हज ऑफ एमिनंट फिलॉसॉफर्स’ या पुस्तकातून मिळते.

एम्पेडोक्लीझ यांचे निधन पेलोपनीझ, ग्रीस येथे झाले.

कळीचे शब्द : #ग्रीक तत्त्ववेत्ता #कवी #निसर्गविज्ञानतज्ज्ञ #आप #तेज #वायू #पृथ्वी

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.