स्राफा, पिएरो (Sraffa, Piero) : (५ ऑगस्ट १८९८ – ३ सप्टेंबर १९८३). एकोणिसाव्या शतकातील एक प्रभावी अर्थतज्ज्ञ. मूल्य सिद्धांत, बाजारपेठीय अर्थशास्त्र, संभाव्यता सिद्धांत या क्षेत्रांत स्राफा यांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्राफा यांचा प्रोडक्शन ऑफ कमोडिटीज बाय मिन्स ऑफ कमोडिटीज हा ग्रंथ नव-रिकार्डोवादी विचारधारेचा पाया मानला जातो.
स्राफा यांचा जन्म इटलीतील टोरोनो येथे एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील एंजेलो स्राफा हे मिलान विद्यापीठात वाणिज्यिक कायदा या विषयाचे प्राध्यापक होते. स्राफा यांचे प्राथमिक शिक्षण इटलीत झाले. उच्चशिक्षणासाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे प्रवेश घेतला. त्यानंतर काही काळ मिलान विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे त्यांनी अध्यापन केले. स्राफा यांना ट्रिनिटी कॉलेजची छात्रवृत्ती मिळाली. स्राफा यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांमुळे जे. एम. केन्स या थोर ब्रिटीश अर्थतज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे केन्स यांनी स्राफा यांना केंब्रिज विद्यापीठात व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले. अन्तोनिओ ग्रामसी या इटालीयन साम्यवादी नेत्याशी स्राफा यांची मैत्री होती.
इसवी सन १९२२ मध्ये डेविड क्लाफाम यांनी इकॉनॉमिक जर्नलमध्ये प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲल्फ्रेड मार्शल यांच्या पूर्ण स्पर्धेतील किंमत निर्धारण, परताव्याचे नियम यांच्या वैधतेविषयी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मताशी ए. सी. पिगू आणि स्राफा हे सहमत होते. स्राफा यांनीही इ. स. १९२५ मध्ये मार्शल यांच्या उद्योगसंस्थेच्या सिद्धांतावर प्रश्न उपस्थित करणारे लिखाण केले. त्यांनी मार्शल यांच्या विश्लेषणात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या ‘परताव्याचा नियम (लॉ ऑफ रिटर्न्स),’ उद्योगसंस्थेचा सिद्धांत आणि पूर्ण स्पर्धेचे विश्लेषण यांवर मुद्देसूद शंका उपस्थित केल्यामुळे मार्शल यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली. स्राफा यांच्या मते, वाढते उत्पादन एकाच वेळी सर्व उद्योगसंस्थांना मिळणे शक्य नाही. मार्शल यांनी दुर्लक्षिलेल्या घसरत्या उत्पादनाचा विचारदेखील उद्योगसंस्थांना करावा लागतो. मार्शलनी आपल्या विश्लेषणात अनेक गृहीतकांचा आधार घेतला. त्यांची आंशिक संतुलनाची पद्धत सदोष असून त्यांनी मांडलेल्या संतुलनाच्या अटी व पूर्ण स्पर्धा यांच्यातील सहसंबंध हा कमालीचा अवास्तव व अनैसर्गिक वाटतो, असे स्राफा यांचे निरीक्षण होते. मार्शल यांच्या सीमांतवादी विश्लेषण व पूर्ण स्पर्धा सिद्धांतातील संकल्पनात्मक त्रुटी दाखवून देण्याचे काम स्राफा यांनी केले.
स्राफा यांनी इ. स. १९२६ मध्ये लिहिलेल्या ‘परिवर्तनीय परताव्याचा नियम’ या शोधनिबंधातून अस्पर्धात्मक बाजारपेठेचे विश्लेषण केले आणि अल्पाधिकारशाही बाजारावरील संशोधनाला चालना दिली. त्यांनी वाढता परतावा आणि पूर्ण स्पर्धा यांचे सहअस्तित्व अमान्य केले. त्यामुळे तार्किक सुसंगतीसाठी व दीर्घकालीन स्थिर संतुलनासाठी पूर्ण स्पर्धा अथवा वाढता परतावा यांपैकी एकाचा त्याग केला पाहिजे, हा विचार रुजवण्यात स्राफा यांना यश आले. परिणामी, आर्थिक विश्लेषणात पूर्ण स्पर्धेच्या विश्लेषणाला अवास्तव मानून मक्तेदारीयुक्त स्पर्धा व अल्पाधिकारशाही या बाजारावरील संशोधन सुरू झाले. या संशोधनात जोन व्हायोलेट रॉबिन्सन यांच्या इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पेटिशन आणि एडवर्ड चेंबरलिन यांच्या थेअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पेटिशन या ग्रंथांचे स्थान महत्त्वाचे आहे. याशिवाय रॉय हेरॉड, जे. के. मेहता या विचारवंतांनीही या संशोधनात मोलाची भर घातली. बाजारपेठेचे विश्लेषण आणि उद्योगसंस्थांच्या उत्पादनाचे विश्लेषण यांमध्ये स्राफा यांनी प्रस्थापित विचारांना विरोध करून नव्या संशोधनाला चालना देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले.
स्राफांच्या मते, उद्योगांमध्ये वापरले जाणाऱ्या भांडवलाचे मूल्य ते ज्या वस्तुंपासून बनवले जाते, त्यांच्या किमतींवरून ओळखले जाऊ शकते. वेतन व नफ्याचा दर एकाच वेळी ठरविणारा कायदा ओळखणे शक्य नाही; कारण नफ्याचा दर केवळ वेतन निश्चित करू शकतो. भांडवलाची किंमत नफ्यासह निश्चित केल्याशिवाय ती मोजणे अशक्य आहे. म्हणून भांडवलाच्या मूल्यावर आधारित नफा मोजणे शक्य नाही. मजुरी वाढत असताना श्रमाची जागा भांडवल घेते, असे गृहीत धरता येत नाही; कारण भांडवलाचे मूल्य सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असते. मजुरी वाढली, तरी भांडवलाच्या जागी श्रम वापरले जाते. म्हणून बेरोजगारी हे मजुरीच्या वाढीचे कारण असू शकत नाही, असे स्राफा यांनी नमूद केले आहे.
अतिशय मितभाषी परंतु बुद्धिमान अर्थतज्ज्ञ अशी स्राफा यांची ख्याती होती. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात सुमारे ८,००० पेक्षा जास्त ग्रंथ होते. हा संग्रह ट्रिनिटी कॉलेज येथे अजूनही जतन करून ठेवला आहे. ते शेवटपर्यंत ट्रिनिटी कॉलेज येथे कार्यरत होते.
स्राफा यांचे केंब्रिज (यूके) येथे निधन झाले.
संदर्भ :
१. Kurz, Heinz D., Critical Essays on Piero Sraffa’s Legacy in Economics, Cambridge, 2000.
२. Kurz, Heinz D.; Neri, Salvadori, Theory of Production, Cambridge, 1995.
समीक्षक : धनश्री महाजन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.