चेंबरलिन, एडवर्ड एच. :  (१९ मे १८९९ – १६ जुलै १९६७). विसाव्या शतकातील एक सुप्रसिध्द अमेरिकन नवअभिजातवादी अर्थशास्त्रज्ञ. ते औद्योगिक एकाधिकार आणि अपूर्ण स्पर्धेबद्दलच्या सिद्धांतामुळे सर्वपरिचीत आहे. त्यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विशेष योगदान दिले आहे.

चेंबरलिन यांचा जन्म ला कॉनर, वॉशिंग्टन येथे झाला. आयोवा विद्यापीठात शिकत असताना त्यांच्यावर अमेरिकन नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ फ्रँक हाइनमन नाइट (Frank Hyneman Knight) यांचा प्रभाव होता.  चेंबरलिन यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण मिशिगन विद्यापीठात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ए. यंग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अपूर्ण स्पर्धा’ या विषयावर प्रबंध लिहून १९२७ मध्ये  हार्व्हर्ड विद्यापीठातून विद्यावाचस्पती (Ph. D.) ही पदवी प्राप्त केली. त्यांना गुगेनहेम अधिछात्र, कॅनडा मिळाली. पुढे १९३३ मध्ये चेंबरलिन यांनी आपल्या प्रबंधाचा विस्तार करून दि थिअरी ऑफ मोनोपॉलीस्टीक काँपिटिशन : ए रि-ओरिएंटेशन ऑफ दि थिअरी ऑफ व्हॅल्यू हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांनी या ग्रंथात उत्पादन भिन्नता, जाहिरातीचे फायदे, व्यापारी चिन्हे (Brand) इत्यादी घटकांचा उल्लेख केला असून त्यांना आधुनिक आर्थीक सिद्धांतामध्ये आजही एक मध्यबिंदू मानले जाते. त्यांनी आपल्या ग्रंथात प्रस्तावीत केलेले उपाय ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जोन व्हायोलेट रॉबिन्सन (Joan Violet Robinson) हिने केंब्रिज विद्यापीठात मांडले आणि अपूर्ण स्पर्धा या सिंध्दांतावरील द इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट काँपिटिशन हा आपला ग्रंथ प्रका‍शित केला. ते दोघेही अपूर्ण स्पर्धात्मक अभ्यासाचे पालक म्हणून ओळखले जाते. पुढे चेंबरलिन यांना जोन रॉबिन्सन हिच्या अपूर्ण स्पर्धा या सिद्धांताकरिता शिकागो येथील तज्ज्ञ आणि इतर टीकाकार यांच्याशी आयुष्यभर प्रतिवाद करावा लागला. चेंबरलिन यांनी १९३७ – १९६७ पर्यंतचा मोठा काळ हार्व्हर्ड विद्यापीठात अध्यापन केले.  ते १९३९ – १९४३ या काळात विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.

चेंबरलिन यांना सीमांत उत्पन्न संकल्पनेचा प्रथम वापर करणाऱ्या विचारवंतांपैकी एक मानले जाते. ही संकल्पना १९२० च्या दशकातील कूर्नोट यांच्या ‘मक्तेदारीʼ या संकल्पनेत अंतर्भूत होती. चेंबरलिन यांच्या मते, बाजारपेठेतील बहुतांश किंमती मक्तेदारीयुक्त आणि स्पर्धाशील घटकांद्वारे निश्चित होतात. त्यांनी १९५७ मध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा या विषयावरील अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असलेला टुवर्ड्स ए मोअर जनरल थिअरी ऑफ व्हॅल्यू हा प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये त्यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धा सिध्‍दांताची ठळक वैशिष्ट्ये मांडताना म्हटले की, वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक संस्था असतात. या स्पर्धेत दिर्घकालीन बाजारप्रवेश आणि बाजार त्यागाचा खर्च नसतो. उत्पादक प्रत्येक उत्‍पादन व किंमतविषयक निर्णय स्वतंत्रपणे घेतो. प्रत्‍येक उत्‍पादकाला उत्‍पादन बाजारात स्वत:चे असे विशिष्ट स्थान असते. वस्तू विक्रेते व खरेदीदार यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञात नसते. १९६० च्या दशकात अर्थशास्त्रातील खेळ सिध्दांतकारांनी चेंबरलिन यांच्या बाजारपेठ संरचना, वर्तवणूक क्षमता इत्यादी परिप्रक्षांवर विपूल विवेचन केले; परंतू नोबेल विजेते पॉल रॉबिन क्रूगमन (Paul Robin Krugman) आणि इतरांनी अशा विवेचनावर आधारीत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नवीन सिध्दांताचा पाया घातला.

चेंबरलिन यांचा मक्‍तेदारी (Monopoly)युक्त स्पर्धा सिध्दांत वस्तुभेदावर अधिक प्रमाणात निर्भर असल्याचे दिसून येते. अपूर्ण स्पर्धेत वस्तूंच्या किंमती समतोल पातळीला कशा पोहचू शकत नाहीत, या विषयावर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात आपल्या विद्यार्थ्यांनाच प्रयोगविषय म्हणून समावेश केला आणि प्रयोगांच्या आधारे सखोल विश्लेषण केले. त्यांच्या मते, पूर्ण स्पर्धेच्या बाजारापेक्षा अपूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्री होणाऱ्या वस्तूंची संख्या सातत्याने अधिक होती. तसेच या वस्तूच्या  किंमती  पूर्ण स्पर्धेच्या बाजार किमतीपेक्षा कमी होत्या. चेंबरलिन यांना या गोंधळाचे कारण आपल्या विद्यार्थ्यांच्या पूर्वग्रहदूषित प्रवृत्तींमध्ये सापडले. हॅरिसन व्हाईट या समाजशास्त्रज्ञांनी आपल्या ‘बाजार संरचना आणि स्पर्धा विश्लेषण’ सिध्दांतामध्ये चेंबरलिन यांच्या मक्तेदारीयुक्त स्पर्धा सिध्दांताचा आधार घेतल्याचे दिसून येते. चेंबरलेनला मूल्यभेदाच्या संकल्पनेचा प्रवर्तक असेही मानले जाते.

चेंबरलिन हे अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीवर विस्तृत विवेचन करताना म्हणतात की, उत्पादन हे संयत्र जाहिरातीच्या माध्यमातून सतत सक्रीय व स्पर्धाशील असतात. संयंत्रानी  जर वस्तुभेद केला नाही, तर ही सयंत्रे मक्तेदारीयुक्त स्पर्धा उद्योगात त्यांच्या आकारमानाच्या मानाने खूप कमकुवत दिसतील;  तथापि त्यांनी स्वत:च असा युक्तिवाद केला, की जर उपभोक्त्यांना हवी असलेली विधिधता प्राप्त करायची असेल, तर सयंत्रांचे आकारमान लहान असणे आवश्यक असते. त्यांचा हा युक्तीवाद मक्तेदारीयुक्त स्पर्धेकडे वाटचाल करणाऱ्या आधुनिक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील बाजारपेठ संरचना सिद्धांताचा मूलभूत स्रोत मानला जातो. या माध्यमातून त्यांनी आधुनिक औद्योगिक संघटन विश्लेषणाची मुहूर्तमेढ रोवली. चेंबरलिन यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उद्योगप्रधान झोत बदलून तो संयत्र प्रधान बनविला. हे करीत असताना त्यांनी नवअभिजात अर्थशास्त्रज्ञांच्या बाजारपेठ अभ्यासाच्या किंमत निर्धारण सिध्दांताचा प्रतिवाद करून विक्रीखर्च आणि वस्तुभेद ही चले प्रमुख मानली. मक्तेदारीव्यतिरिक्त संयंत्रांना वस्तूंच्या किंमती नियं‍त्रित ठेवण्यात वस्तुभेदाच्या चलास त्यांनी विशेष महत्त्व प्रदान केले. परिणामी त्यांचा थिअरी ऑफ मोनोपॉलीस्टीक काँपिटिशन हा ग्रंथ बाजारपेठ संरचना विश्लेषणाचा पाया मानला जातो. त्यांच्या मते, उत्पादन भिन्नता म्हणजे अशी प्रक्रिया की, ज्याद्वारा विक्रेते आपल्या उत्पादनाला विशिष्ट व अधिक आकर्षक बनवून खरेदीदारांना इतर विक्रेत्यांकडून वेगळे व आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. उदा., व्यापारी चिन्हे.

मार्शलनंतर सूक्ष्मलक्षी अर्थशस्त्राला मैालीक योगदान देण्यात चेंबरलिन आणि जोन रॉबिन्सन यांचा मुख्य वाटा आहे; मात्र चेंबरलिन यांचा मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे जोन रॉबिन्सनच्या अपूर्ण स्पर्धेपेक्षा तांत्रिक दृष्ट्या वेगळे व सरस आहे. प्रस्तुत मुलभूत फरक संयम समतोलाच्या अटीत आहे. रॉबिन्सनच्या सिध्दांतानुसार सिमांत खर्च आणि सिमांत प्राप्ती ज्या उत्पादन पातळीवर समान होतात, त्या पातळीवर उत्पादन संस्था समतोलात येते. तर चेंबरलिन यांच्या विवेचनानुसार सरासरी खर्च व सरासरी प्राप्ती वक्र ज्या उत्‍पादीत पातळीवर एकमेकांस स्‍पर्श करतात, त्या पातळीवर उत्‍पादन संस्था समतोलात असते आणि उत्पादकास प्राप्त होणारी किंमत सिमांत खर्चापेक्षा जास्त असते. म्हणजेच, समतोल ही दीर्घकाळात उत्पादन संस्था अतिरीक्त नफ्याच्या अवस्थेत आपला समतोल प्राप्त करत असते. यामुळेच नवीन उत्पादन संस्था उत्पादन क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रवृत्त होतात की, ज्यामुळे उद्योगसंस्थांचा मागणीचक्र डाविकडे सरकतो. यातून निर्माण होणरे नविन किंमत-उत्पादन संतुलन उत्पादन संस्थेचा सीमांत खर्च व सीमांत प्राप्ती समान पातळीवर आणते व त्या उत्पादन पातळीवर उद्योगसंस्था स्थिरावते.

चेंबरलिन यांनी अर्थशास्त्र विषयात पुढील ग्रंथ लिहिले : दि थिअरी ऑफ मोनोपॉलीस्टिक काँपिटिशन : ए रि-ओरिएंटेशन ऑफ दि थिअरी ऑफ व्हॅल्यू (१९३३), मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन रिव्हिजिटेड (१९५१), मोनोपोली ॲण्ड कॉम्पिटिशन ॲण्ड देअर रेग्यलेशन : पेपर्स ॲण्ड प्रोसिडिंग्ज ऑफ ए कॉन्फरन्स हेल्ड बाय दि इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशन (१९५४), टुवर्ड्स ए मोअर जनरल थिअरी ऑफ व्हॅल्यू (१९५७), लेबर यूनिअन ॲण्ड पब्लिक पॉलिसी (१९५८).

चेंबरलिन यांचे ‘ड्युओपोली : व्हॅल्यूज व्हेअर सेलर्स आर फ्यूʼ (१९२९), ‘ॲन एक्सपेरीमेंटल इंपॅक्ट मार्केटʼ (१९४८), ‘प्रोडक्ट हेटरॉजेनीटी  ॲण्ड पब्लीक पॉलिसीʼ (१९५०), ‘दि प्रॉडक्ट ॲज ॲन इकॉनॉमिक व्हेरिएबलʼ (१९५३), ‘सम परफेक्ट नॉनप्राइस कॉम्पिटिशनʼ (१९५४), ‘दि मोनोपोली पॉवर ऑफ लेबरʼ (१९५७), ‘ऑन दि ओरिजीन ऑफ ओलिगोपोलीʼ (१९५७) इत्यादी लेखही प्रसिद्ध आहेत.

चेंबरलिन यांचे केंब्रीज, मॅसॅचूसेट्स येथे निधन झाले.

समीक्षक – श्रीराम जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा