भारतातील एक अनुसूचित जमात. यांची वस्ती हिमालयातील तेराई भागात, तसेच उत्तराखंडमधील डेहराडून, नैनिताल, पौरी गढवाल, चंपावत या जिल्ह्यांत आणि उत्तर प्रदेशातील बिजनोर या भागात आढळून येते. यांना बुक्सा, बक्सा किंवा बुकासिया असेही म्हणतात. बुक्सा हा शब्द पहाडी बोकड किंवा एक प्रकारचे कंदमुळ असा होतो. विल्यम क्रूक यांच्या मते, भोकसा ही जमात डककीन या भागातून आली; तर काहींच्या मते, ते दिल्लीमधून स्थलांतरित झाले असावेत. नाग आणि रॉय बर्मन यांच्या मते, भोकसा या शब्दाचा अर्थ ‘तेराई येथील भक्षिंना मारणारा’ असा आहे. राजस्थानचा शूर योद्धा राजा जगतदेव मुघलांकडून पराजीत झाल्यानंतर त्यांनी तेराईच्या डोंगरांकडे पलायन केले. त्यामुळे एका प्रवादाप्रमाणे भोकसा ही जमात राजस्थानच्या मेहरा राजपूत या राजघराण्याची वंशज आहे. भोक्सा जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ६७,९०६ इतकी होती.

ही जमात मंगोलाईड वंशाशी संबंधित असून कुशवंशी आणि राजपूत ही त्यांची प्रमुख कुळे आहेत. चौहान, पुंडीर, तुवर, चंबेवाल, कुटियाला, पुंवर, कोतवाल, छड ही वेगवेगळी घराणी त्यांच्यात दिसून येतात. त्यांची सिंग, चौहान इत्यादी आडनावे आहेत.

जमातीतील लोक साधारणत: मध्यम व मजबूत बांद्याचे, ५.३० फूट उंच, लहान डोळ्यांची तिरपी ठेवण, डोळ्यांखाली गालांचे हाड वर आलेले, पसरट नाक, गोरा किंवा काळसावळा रंग अशी असतात. पांढरा शर्ट किंवा बंडी, गुढग्याच्या वर धोतर, अंगावर लाल रंगाची पट्टी, डोक्यावर पांढरे पिसे लावलेली लाल टोपी व गळ्यात रंगबिरंगी मण्यांची माळ असा पुरुषांचा पारंपरिक पोषाख असतो; तर पांढरा शर्ट, गुढग्यापर्यंत काळा स्कर्ट, अंगावर लाल रंगाची पट्टी, डोक्यावर पांढरे पिसे लावलेली लाल टोपी व गळ्यात रंगबिरंगी मण्यांची माळ असा स्त्रीयांचा पोषाख आहे. स्त्रीया चांदीच्या अंगठ्या, पायबंद, कंबरपट्टा इत्यादी आभूषणे वापरतात. आता हे लोक आधुनिक पोषाख वापरतात. जमातीची मूळ भाषा भोक्सा, बक्सुआरी व थारू असून परस्परांत ते मूळ भाषेत व इतरांशी हिंदी भाषेत संवाद साधतात.

जमातीची घरे उत्तरेकडील हवामान व इतर नैसर्गिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सामान्यतः लाकूड, दगड, बांबू इत्यादींपासून बनविलेली असतात. जमातीत एकल व संयुक्त कुटुंब पद्धती दिसून येते. घरातील वयस्क पुरुष हा कुटुंब प्रमुख असतो. त्यांचा पारंपरिक प्रमुख व्यवसाय शेती व पशुसंवर्धन असून रोजमजुरी, टोपल्या बनविणे, पर्यटकांचे मार्गदर्शक (गाईड), यांसह ते सरकारी व खाजगी क्षेत्रातही कार्यरत आहेत. हे लोक शाखाहारी व मांसाहारी असून भात, गहू, विविध पालेभाज्या, दुधाचे पदार्थ हे त्यांचे प्रमुख अन्न आहे.

जमातीत ‘बिरादरी पंचायत’ हा पारंपरिक प्रमुख असतो. तो गावातील आर्थिक, सामाजिक, कायेदेविषयक योग्य निर्णय घेत असतो. तसेच महिलांनाही सर्व कार्यांत स्थान दिले जाते. जमातीत वधुमूल्य ही पद्धत असून सारख्या कुळात लग्न होत नाहीत. लग्नामध्ये कन्यादान व फेरा हे महत्त्वाचे विधी असतात. रंगार व हिंदू गुजर यांच्यातही या जमातीच्या लोकांची लग्ने होताना दिसून येतात. बहुपत्नीत्व, घटस्फोट, पुनर्विवाह यांस मान्यता आहे.

हे लोक विशेषत: शाकंभरी देवीची पूजा करतात. काही लोक हिंदू, ख्रिश्चन व बौद्ध या धर्मांचा स्वीकार केल्याचे दिसून येतात. त्यांचे शेती चक्र, ऋतू बदल, धार्मिक विधी इत्यादी सण-समारंभ आहेत. वसंत पंचमी, होळी, दिवाळी इत्यादी सण ते साजरे करतात. सणांच्या वेळी हे लोक पारंपरिक नृत्य करतात.

जमातीत मृताला दहन करतात व मृत्युनंतर दुखवटा पाळतात.

संदर्भ :

१. International Journal of Creative Research Thoughts, Vol. 8, Garhwal, 2020.

२. Singh, K. S., People of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक : शौनक कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.