अल्गॅकल्चर हे शैवल प्रजातींचा समावेश असलेला मृद्हीन कृषिशेतीचा (Aquaculture) एक प्रकार आहे. त्यासाठी लागवड करण्यात येणाऱ्या बहुतेक एकपेशीय वनस्पती या सूक्ष्मशैवलांच्या श्रेणीत मोडतात. त्याला फाइटोप्लॅंक्टन, मायक्रोफॉइट्स् किंवा प्लॅंक्टोनिक शैवल असेही म्हटले जाते. तर समुद्री तण (Seaweed) शेतीमध्ये मॅक्रो (Macro) म्हणजे मोठ्या आकाराची शैवले असून त्यांची लागवड आणि कापणी केली जाते. सूक्ष्मशैवलांप्रमाणे त्यांचादेखील व्यावसायिक आणि औद्योगिक वापर करतात. परंतु त्यांच्या आकारामुळे आणि त्यांना वाढीस लागणाऱ्या वातावरणाच्या विशिष्ट गरजांमुळे ते लागवडीसाठी सहजपणे उपयोगात आणता येत नाहीत.
मुख्य अन्नपदार्थांमध्ये समावेश असलेल्यागेलिडियम (Gelidium),टेरोक्लॅडिया (Pterocladia),पोरफायरा (Porphyra) आणि लॅमिनेरिया (Laminaria) या प्रजाती जपान, चीन आणि कोरियामध्ये मृद्हीन कृषिशेतीद्वारे मिळविल्या जातात. यातीललॅमिनेरिया ही तपकिरी शैवलाची प्रजाती असून सामान्यतः तिला ‘केल्प’ म्हणतात. समुद्री तणांच्या शेतीचा इतिहास पाहिल्यास असे आढळते की, इसवी सनाच्या १५ व्या शतकात जिमची लागवड कोरियात करण्यात आली होती. जिम हेपायरोपिया (Pyropia) आणिपोरफायरा यासारख्या लाल शैवलापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे कोरियन नाव आहे. जपानमध्ये तो नॉरी (Nori) आणि वेल्स येथे तो लावेर (laver) म्हणून ओळखला जातो. सन १६७० मध्ये जपानमध्ये समुद्री तणांची शेती टोकियोच्या उपसागरात सुरू झाली. फिलिपीन्समध्ये समुद्री शेती करण्यासाठी जी जुनी मार्गदर्शके आढळतात; त्यामध्ये लॅमिनेरियाची लागवड किमान एक मीटर खोलीच्या ओहोटीच्या पाणी पातळीवर करण्यात यावी अशी शिफारस आहे.
जांभळा लावेर (पोरफायरा ) हे कदाचित सर्वात मोठ्या प्रमाणावर अन्न म्हणून वापरले जाणारे सागरी शैवल आहे. डल्से (पाल्मिया पालमॅटा ; Palmiya palmata) एक लाल शैवलाची प्रजाती असून आयर्लंड आणि अटलांटिक कॅनडामध्ये पालकच्या भाजीप्रमाणे कच्ची, ताजी, वाळलेली किंवा शिजविलेली वापरली जाते. समुद्री बटाटे (लेटूस; Letuce) म्हणून उल्वा या प्रजातीचा स्कॉटलंडमध्ये सूप्स आणि सॅलड्समध्ये वापर केला जातो. सरगॅसम (Sargassum) ही प्रजाती समुद्री तणांचा एक महत्त्वाचा गट आहे. या शैवलांमध्ये अनेक फ्लोरोटॅनिन्स (Phlorotannins) आढळतात. असे आढळून आले आहे की, काही फ्लोरोटॅनिन्स प्रथिनांचे क्षपण घडवून आणतात. ते पेशी आणि सजीव अशा दोन्ही स्तरावर प्राथमिक आणि माध्यमिक भूमिका बजावतात.
अनेक शतकांपासून समुद्री तणांचा वापर खत म्हणून केला जात आहे. पलाश (पोटॅश) आणि पोटॅशियम नायट्रेट तयार करण्यासाठी ते उत्कृष्ट स्रोत आहेत. अशा प्रकारची शेती प्रवाळांची विविधता वाढवून त्याची बेटे व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. पाणवनस्पती खाणारे मासे आणि शंख-शिंपल्यात राहणारे जलचर यांचे प्रमाण वाढवून देण्यास ही शेती फायद्याची ठरू शकते. यांचा उपयोग हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे कार्यक्षम शोषण करून जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी नवीन संशोधन पद्धतीमध्ये करण्यात येत आहे.
संदर्भ :
- https://ideas.ted.com/vertical-ocean-farms-that-can-feed-us-and-help-our-seas/
- https://blogs.scientificamerican.com/observations/soil-and-seaweed-farming-our-way-to-a-climate-solution/
समीक्षक : बाळ फोंडके