पाण्यामध्ये रंग, वास आणि चव उत्पन्न करणारे हे पदार्थ नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांनी उत्पन्न होतात. उदा., चव आणि वास उत्पन्न करणारे जीवाणु, ते मेल्यावर त्यांच्या शरीराचे विघटन होणे, साठवलेल्या पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पाण्यात सल्फेटचे सल्फाईडमध्ये रूपांतर होणे, फेनॉल्स, क्रेस़ॉल, अमोनिया, शेतीविषयक रसायने, कापड, कागद, रंग इत्यादी बनवणाऱ्या कारखान्यामधील प्रदूषित पाणी, शैवल (Algae), बुरशी (Fungi). हे पदार्थ बहुतांशी आलंबित, विरघळलेल्या किंवा कलिल स्थितीमध्ये असतात, त्यामधले काही बाष्पनशील (Volatile) असतात.  भूगर्भातील लोह आणि मँगॅनीज ह्यांच्यामुळे पाण्याला अनिष्ट चव आणि रंग येतो.

आ. २१. साठविलेल्या पाण्यावर मोरचूद पसरविण्याची पद्धत : (अ) विस्तीर्ण जलाशयांसाठी, (आ) लहान जलाशयांसाठी.

वास आणि चव काढण्याच्या पद्धती : ह्या पद्धती (अ) प्रतिबंधक (Preventive) आणि (ब) दोष निवारक (Corrective) असतात.

(अ) प्रतिबंधक पद्धती (Preventive) : साठवलेल्या पाण्यामध्ये वनस्पती आणि त्या अनुषंगाने उत्पन्न होणारे जीवाणू विशेषतः अल्गी वाढू न देणे, औद्योगिक सांडपाणी आणि घरगुती सांडपाणी साठवलेल्या पाण्यामध्ये मिसळू न देणे, धरणाच्या पाणंदीमध्ये (Watershed) बांधकामाला आणि शेतीला बंदी करणे.

(ब) दोष निवारक (Corrective) : वायुमिश्रण, क्लोरीन, क्लोरीन डाय-ऑक्साईड, पोटॅशियम परमँगनेट (KMnO4), ओझोन, क्लोरीन अमोनिया वापरून ह्या पदार्थांचे ऑक्सिडीकरण करणे, प्रभारित कार्बनच्या सहाय्याने पृष्ठशोषण करणे.  वायुमिश्रणाने पाण्यातील हायड्रोजन सल्फाईड आणि बाष्पनशील पदार्थ काढून टाकता येतात. पूर्वक्लोरिनेशन (Prechlorination) किंवा मुक्तपश्चात क्लोरिनेशन (Free residual postchlorination) केल्यास वास आणि चव उत्पन्न करणाऱ्या पदार्थांचे ऑक्सिडीकरण होते.  फक्त निर्जंतुकीकरणासाठी दिलेली मात्रा काही अंशी वास आणि चव कमी करू शकतात, पण त्या पूर्णपणे काढायच्या असतील तर क्लोरीनचा संपर्ककाळ (Contact time) वाढवावा लागतो.  क्लोरीन डाय-ऑक्साईड अथवा ओझोन वापरून निर्जंतुकीकरण आणि वास + चव एकत्रपणे काढून टाकणे शक्य होते.

पोटॅशियम परमँगनेट हा एक चांगला ऑक्सिडीकारक आहे, त्याचा उपयोग मँगॅनीज काढण्यास होतो.  परंतु तो प्रभावी निर्जंतुकीकरण करण्यास असमर्थ आहे.

क्लोरीन + अमोनिया वापरल्यामुळे अतिरिक्त क्लोरीन वापरलेल्या पाण्यामधील क्लोरीनचा वास आणि चव कमी करतात, तसेच पाण्यातील विशिष्ट सेंद्रिय पदार्थांमुळे उत्पन्न होणाऱ्या क्लोरोफॉर्मसारख्या उपपदार्थांची निर्मिती होऊ देत नाहीत.

आ. २२. मोरचुदाचे खडे पाण्यावर पसरविण्यासाठी लाकडी पेटी.

शैवल ह्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती असून त्यांच्यामुळे पाण्याला अनिष्ट वास, चव येते तसेच कणसंकलन आणि निवळण ह्या प्रक्रियांमध्ये बाधा येते. निस्यंदकांचे कार्य बिघडते. पाणी वितरण करणाऱ्या नळांच्या जाळ्यांमध्ये जैविक गंजण्याची (Biological corrosion) क्रिया होऊ शकते. काही शैवले विषारी असल्यामुळे असे पाणी पिणाऱ्या जनावरांना मृत्यू येऊ शकतो, तसेच त्या पाण्यांतील मासे मरतात. हा उपद्रव टाळण्यासाठी (अ) प्रतिबंधक आणि (ब) दोष निवारक उपाय करावे लागतात.

  • प्रतिबंधक उपाय : १) धरणाच्या पाणंदीमध्ये संपूर्ण स्वच्छता राखणे, त्यामुळे शैवलांच्या वाढीला आवश्यक ते अन्न पाण्यात मिसळत नाही, २) धरणातील पाणी बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या खोलींवर आदान संरचनेमध्ये (Intake structure) झडपा बसवणे, ३) अल्गींची वाढ थांबवण्यासाठी मोरचूद आणि क्लोरीन ह्यासारख्या रसायनांचा उपयोग करणे आणि ४) विशिष्ट प्रकारच्या माशांची पैदास धरणातील पाण्यामध्ये करणे.
  • दोषनिवारक उपाय : हे उपाय शुद्धीकरण केंद्रामध्ये करतात. १) वायुमिश्रण, २) ऑक्सिडीकरण करणारी रसायने उदा., क्लोरीन डाय-ऑक्साईड, पोटॅशियम परमँगनेट इ. वापरणे, ३) प्रभावित कार्बनचा उपयोग करणे आणि ४) सूक्ष्मचाळणीसारखी (microstrainer) यंत्रणा शुद्धीकरण केंद्रामध्ये बसविणे.

साठविलेल्या पाण्यामधील अल्गी काढण्यासाठी करावयाच्या उपायापूर्वी पुढील गोष्टी करणे आवश्यक असते : १) साठवलेल्या पाण्याचे नमुने वेगवेगळ्या खोलींवर घेऊन त्यांचे रासायनिक आणि सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने पृथक्करण करणे. ह्यामुळे पाण्याच्या किती खोलीपर्यंत शैवले वाढतात हे कळते. २) कोणत्या प्रकारच्या शैवले पाण्यामध्ये आहेत हे कळते, कारण प्रत्येक प्रकारच्या अल्गीला मारक ठरणाऱ्या रसायनांचे प्रमाण वेगळे असते. ३) किती पाण्यावर (घनफळावर) प्रक्रिया करावी लागेल ह्याचा अंदाज येतो.  पाण्याचे नमुने वर्षभर घेतले तर वर्षाच्या कोणत्या काळामध्ये अल्गीची वाढ सुरू होते हे कळते. ४) शाकीय अवस्थेत असलेल्या शैवलांना मारण्यासाठी कमी रसायनांची मात्रा पुरेशी होती आणि वर्षाच्या कोणत्या महिन्यापासून रसायनांचा वापर सुरू करावा ह्याचा अंदाज येतो.

रसायने पसरण्याच्या पद्धती : (अ) जलाशय छोटा असेल तर मोरचूदाचे खडे पोत्यांमध्ये भरून नावेला बांधून नाव पाण्यामध्ये फिरवली जाते. नावेचा मार्ग नागमोडी ठेवून सर्व जलाशयामध्ये रसायने पोहोचतील ह्याची काळजी घेतली जाते.  हे काम सकाळी आणि जेव्हा जलाशयामध्ये लाटा उत्पन्न होत असतील तेव्हा केले जाते.  कारण तेव्हा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी सर्वांत जास्त अल्गी पाण्याच्या पृष्ठभागावर येतात, शिवाय लाटांमुळे रसायने पसरण्यास मदत होते.  ह्यामध्ये सुधारणा म्हणजे पोत्यांच्या जागी विशिष्ट आकाराच्या लाकडी पेट्या नावेच्या दोन्ही बाजूंना कायमच्या लावून ठेवणे हाेय. (पहा आकृती क्र. २१ व २२ )

(आ) नावेमध्ये मोरचुदाचा द्राव तयार करून पंपाच्या सहाय्याने तो पाण्यावर फवारणे, किंवा वात फुंकनळीच्या (Air blower) साहाय्याने मोरचुदाची पावडर पाण्यावर फवारणे.

वरील दोन्ही प्रकार जलाशयाच्या आदान संरचनेपासून सुरू करून मग उरलेल्या पृष्ठभागावर रसायने पसरावीत, म्हणजे त्यामधील मासे आदान संरचनेपासून दूर राहतील. अशाच प्रकारे क्लोरीनसुद्धा पाण्यामध्ये पसरविता येतो.

समीक्षक : सुहासिनी माढेकर