दाणी, शांताबाई : (१ जानेवारी १९१८-९ ऑगस्ट २००२). महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाच्या कार्यकर्त्या. त्यांचा जन्म धनाजी व कुंदाबाई या दाम्पत्यापोटी नाशिक येथे एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. शांताबाई विंचूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये शांताबाई दाणी यांना तुरुंगवास पतकरावा लागला होता (१५ एप्रिल १९३२). पुढे त्यांनी सामाजिक सेवेसाठी नोकरी सोडून ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनमध्ये प्रवेश केला (१९४२). या फेडरेशनच्या त्या नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्ष होत्या (१९४३). तसेच फेडरेशनच्या कानपूर येथील महिला परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या (१९४५). पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते, त्यातील स्त्री सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत त्या सहभागी होत्या. पुणे विधीमंडळावर नेलेल्या मोर्चामुळे येरवडा कारागृहात त्यांनी तीन आठवडे कारावासही भोगला (१९४६).

दाणी यांनी मुंबई विधानसभेसाठी सिन्नर निफाड या मतदारसंघातून शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनतर्फे निवडणूक लढवली; तथापि काँग्रेसचे उमेदवार अमृतराव रणखांबे यांच्याकडून त्यांना पराभव पतकरावा लागला (१९५२). त्या रिपब्लिकन पक्षाच्या संस्थापक सदस्य होत्या. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन अनेक दीक्षा समारंभ घडवून आणले (१९५६). कुंदेवाडी (ता. निफाड) येथील धर्मांतर सभेच्या त्या अध्यक्ष होत्या. पुढे मालेगावमधून लोकसभेसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणूक लढविली, पण या ही वेळी त्यांचा पराभव झाला (१९६२).

दाणी यांची भूमिहीनांच्या सत्याग्रहात महत्त्वाची भूमिका होती. भूमिहीनांच्या आंदोलनात त्यांनी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व केले (१९६४). त्या दलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्राच्या सरचिटणीस होत्या (१९५९). या केंद्रामार्फत ‘तक्षशिला महाविद्यालय’ स्थापन केले. महाराष्ट्र विधान परिषदेवर त्या राज्यपाल नियुक्त सदस्य होत्या (१९६८-१९७४).

दाणी या नाशिक येथील रमाई आंबेडकर वसतिगृह आणि मनमाड येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाच्या सचिव होत्या. तसेच त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या निष्ठावंत सहकारी होत्या. मात्र गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाशी केलेला समझोता दाणी यांनी नाकारला. ह्या समझोत्यास त्या ‘गाजराची पुंगी’ म्हणत. दाणी यांनी मलेशिया, श्रीलंका येथील जागतिक धर्म परिषदांत सहभाग घेतला. तसेच जपानमधील शांती परिषदेला शांती सैनिक म्हणून त्या उपस्थित होत्या (१९७०). त्यांनी नाशिक शहरात पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांसाठी ‘कुणाल’ ही शाळा काढली (१९८३). शांताबाई दाणी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मान केला (१९८७).

नाशिक येथे त्यांचे निधन झाले

संदर्भ :

  • जाधव, मोगल, ‘लोकनेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड’, सनय प्रकाशन, नारायणगाव २०२२.
  • पवार, उर्मिला; मून, मीनाक्षी, ‘आम्हीही इतिहास घडवला’, स्त्री उवाच प्रकाशन, मुंबई, १९८९.
  • फडकुले, निर्मलकुमार आणि इतर, संपा., ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड : काल आणि कर्तृत्व’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००२.
  • भार्गवे, भावना, ‘रात्रंदिन आम्हा’,भावसरिता प्रकाशन, नाशिक,१९९०.

समीक्षक : लहू गायकवाड


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.