विविधज्ञानविस्तार :  मराठी भाषेतील नियतकालिक. रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे या नियतकालिकाचे प्रथम संपादक होते. इ.स. १८६७ मध्ये रा. भी. गुंजीकर यांनी मुंबईतून सुरू केलेले हे मासिक मराठी भाषेतील ज्ञानप्रसाराचे एक प्रमुख माध्यम ठरले. ब्रिटिश काळातील इंग्लंडमधील ‘एडिंबरो रिव्ह्यू’ आणि ‘क्वार्टरली रिव्ह्यू’ सारख्या इंग्रजी नियतकालिकांच्या प्रेरणेने गुंजीकरांनी हे मासिक सुरु केले होते. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी भाषेत ज्ञानोपयोगी व विविध विषयांवर केंद्रित मासिकाची कमतरता होती. “शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवरण, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत.” या भूमिकेसह गुंजीकरांनी पहिल्या अंकातच या नियतकालिकाचे स्वरूप स्पष्ट केले होते. मासिक  म्हणून या नियतकालिकाचे प्रकाशन होत असे. १८६७ ते  १९३७ पर्यंत अशा प्रदीर्घ काळात हे नियतकालिक चालू होते. या मासिकाचे अनेक अंक आजही उपलब्ध आहेत.
१० एप्रिल १८४३ रोजी बेळगाव जिल्ह्यातील जांबोटी येथे जन्मलेले गुंजीकर हे बहुभाषिक विद्वान होते. मराठी, संस्कृत, इंग्रजीसोबत गुजराती, कन्नड आणि बंगाली भाषा त्यांना अवगत होत्या. एल्फिन्स्टन हायस्कूलमधून दहावी (१८६४) झाल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. १८६७ मध्ये मुंबईत शिक्षक असतानाच त्यांनी हे मासिक सुरू केले. गुंजीकरांनी संस्थापक संपादक म्हणून सात वर्षे (१८६७-१८७४) कार्य केले, पण औपचारिकपणे संपादक म्हणून नाव घेतले नाही. त्यानंतर ते संपादनातून बाहेर पडले. जनार्दनपंत मोडक यांनी या मासिकाच्या संपादनात त्यांना सहाय्य केले होते.
रा. भी. गुंजीकर यांच्यानंतर ह. म. पंडित, पुरुषोत्तम गोविंद नाडकर्णी, रामकृष्ण रघुनाथ मोरमकर, मंगेश जिवाजी तेलंग, अनंत आत्माराम मोरमकर, रामचंद्र काशिनाथ तटणीस अशा अनेक संपादकांनी या मासिकाचे संपादन केले आहे. हे मासिक मुख्यालय मुंबई येथे प्रकाशित होत असे, पण त्याचा खप मर्यादित होता. तरीही, ते मराठी ज्ञानप्रसाराच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या मासिकाची सामग्री विविध आणि उच्च दर्जाची होती. भौतिक आणि सामाजिक शास्त्रांतील लेख तत्कालीन विद्वान आणि अभ्यासकांनी लिहिलेले असत. भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती, इतिहास, भूगोल, चरित्रकथा, पुस्तकसमीक्षा आणि नीतिकथन यांसारखे विषय प्रमुख होते. गुंजीकरांच्या लेखांमध्ये मराठी भाषा, मराठी भाषेचे कोश, देशभाषांची दुर्दशा, मराठी कविता आणि व्याकरणविचार यांसारखे मार्मिक विषय होते.
इ.स. १८७२-१८७४ या काळात शिवकाळातील रामचंद्र अमात्यांची आज्ञापत्रे क्रमशः छापली गेली. ही ऐतिहासिक कागदपत्रे मराठा इतिहासाच्या अभ्यासासाठी मौल्यवान आहेत. मासिकाने व्यासंगी लेखकांचे सहकार्य मिळवून ज्ञानविस्तार केला, ज्यामुळे वाचकांना आधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घालता आली. या मासिकात १५४ कलाकृतींची परीक्षणे प्रकाशित झाली आहेत.
मराठीतील नाटकांवर परीक्षण करणाऱ्या लेखांमधून नाट्यानुभव, नाट्यरचना तंत्र, नाट्याविष्कार असा नाट्यतत्त्वांचा शोध विविधज्ञानविस्तारमधून घेतला आहे. रा. भि. गुंजीकरांची मोचनगड ही ऐतिहासिक कादंबरी विविध ज्ञान विस्तारच्या पहिल्या अंकापासून क्रमशः छापून आली. काही इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवादही प्रसिध्द झाले. कादंबरीप्रमाणेच कथा वाङमयाची दखल विविधज्ञानविस्तारने घेतलेली दिसते. नितीशिक्षण देणाऱ्या प्रबोधनात्मक कथा मासिकातून प्रकाशित झालेल्या आहेत. काशिताई कानिटकर, कमलाबाई किवे अशा अनेक कथालेखिकांना विविधज्ञानविस्तारमध्ये लेखनासाठी व्यासपीठ मिळाले. चरित्रे व चरित्रविषयक लेख मासिकात प्रसिध्द झाल्याने समाजसुधारणा, इतिहास, राजकारणातील मान्यवर व्यक्तीचे जीवन व कार्याची माहिती समाजासमोर लेखनातून मांडली गेली. मराठी भाषा व व्याकरणाविषयी विचार मांडताना भाषेची जडणघडण, भाषाशुध्दी, भाषालेखनाचे नियम, भाषेची शास्त्रीय परिभाषा अशा विविध अंगांनी लेखन करताना गुंजीकरांनी मराठी भाषाविषयक अभिमान पुरेपुर प्रकट केला आहे. साहित्यशास्त्र या साहित्यविषयक ग्रंथाच्या समीक्षणामुळे साहित्यनिर्मिती व साहित्यसमीक्षा या घटकांचा विचार केला आहे.
समाजातील सामान्य माणसाची वाङमयीन अभिरूचीचे उन्नयन करण्याचा प्रयत्न, अनेक लेखकांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे अमूल्य कार्य विविधज्ञानविस्तारने केले. गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्तारातून मराठी भाषेच्या विकासावर भर दिला, ज्यामुळे ते पत्रकारितेच्या जनकांपैकी एक ठरले. जुलै १८६७ ते जानेवारी १९३५ पर्यंतचे १०० अंक महाराष्ट्राच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे मासिक मराठी साहित्यातील ज्ञानप्रसाराची परंपरा जपते आणि आधुनिक वाचकांसाठी संशोधनाचे साधन आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी जागरूक असणाऱ्या या मासिकाला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असे संबोधिले गेले आहे.
संदर्भ : दडकर,जया, गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत आबाजी (संपा), संक्षिप्त मराठी वाङमयकोश, मुंबई, १९९८.
समीक्षण : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.