आ. १. प्लॅटिपस

प्लॅटिपस हा प्राणी स्तनी वर्गातील अंडज स्तनी उपवर्गात समाविष्ट केला जातो. प्लॅटिपसचे शास्त्रीय नाव  ऑर्निथोऱ्हिंकस ॲनाटिमस असे आहे. (Ornithorhynchus anatimus) ग्रीक भाषेत ऑर्निथॉस (Ornithos) म्हणजे पक्ष्याप्रमाणे आणि  ऱ्हिंकस (Rhyncus) म्हणजे मुस्कट (Snout) असा होतो. मराठीत या प्राण्याचे नाव त्यामुळे बदक चोच्या असे पडले आहे. त्याचे तोंड बदकाच्या चोचीसारखे आहे. याचा अधिवास अर्धजलीय असून तो टास्मानियासह पूर्व ऑस्ट्रेलियात आढळतो.  ऑर्निथोऱ्हिंकिडी कुळातील व ऑर्निथोऱ्हिंकस वंशातील हा एकमेव प्रतिनिधी आहे. याला जिवंत जीवाश्माचे अस्तित्व देण्यात आले आहे. परंतु त्याच्याशी निगडित अनेक प्रजाती मात्र जीवाश्म स्वरूपात होत्या. प्लॅटिपस अंडजस्तनी प्राणी असून ते जिवंत पिलांना जन्म देण्याऐवजी अंडी देतो. विषारी स्तनींच्या काही प्रजातींपैकी हा एक प्राणी आहे. नराच्या मागील पायांवर प्रसर नावाचा तीक्ष्ण काटा असून त्यामार्फत तो विष सोडतो. या विषामुळे मानवात भयंकर वेदना होतात. २०२० पासून प्लॅटिपसला कायद्याने ज्या राज्यात आढळतो तेथे संरक्षण देण्यात आले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियामध्ये याची लुप्तप्राय प्रजाती म्हणून नोंद करण्यात आली असून न्यू साउथ वेल्समध्येही नोंद करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. ही प्रजातीं धोक्याजवळ असलेली प्रजाती म्हणून आययूसीएन संस्थेने वर्गीकरण केलेले आहे. परंतु नोव्हेंबर २०२० मधील एका अहवालानुसार मात्र ही प्रजाती धोक्‍यात आली आहे असे संघराज्याच्या ईपीबीसी कायद्यानुसार जाहीर केले आहे. त्याचे कारण म्हणजे सर्वच राज्यांमध्ये या प्रजातीच्या अधिवासाच्या विनाशामुळे त्यांची संख्या घटली आहे.

आ. १. प्लॅटिपस : शरीररचना

शरीररचना : प्लॅटिपसचे शरीर आणि पसरट शेपूट जैवअनुस्फुरक (Bio fluorescent) केसांनी आच्छादलेली असते. त्यामुळे प्रतिरोधी हवेचा थर तयार होतो आणि प्राणी उबदार राहतो. अंगावरील केस जलरोधक असतात आणि त्यांचा पोत चिचुंद्रीच्या केसांसारखा असतो. प्लॅटिपस आपल्या शेपटीचा उपयोग चरबी साठविण्यासाठी करतो. त्याच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचा पडदा असून पुढील पायांमध्ये तो लक्षणीय असतो. जमिनीवर चालताना त्याची मागच्या बाजूला घडी होते. त्याचे लांबट मुस्कट आणि खालचा जबडा कातडीने झाकलेला असून त्यापासून चोच तयार होते. मुस्कटच्या वरती  नाकपुड्या असतात. तर डोळे व कान मागील बाजूच्या खोबणीत असतात. खोबण पोहताना बंद होते. प्लॅटिपस चिडल्यावर गुरगुरतो. बंदिस्त स्थितीतसुद्धा प्लॅटिपसने  आवाज  काढल्याचे आढळले आहे.

प्लॅटिपसचे वजन ०.७ — २.४ किग्रॅ. असून नर मादीपेक्षा मोठे असतात. त्यांची सरासरी लांबी ५० सेंमी. असते तर मादीची सरासरी लांबी ४३ सेंमी. असते. सरासरी आकारमानात स्थलपरत्वे मोठा फरक आढळतो. हा फरक पर्यावरणीय घटक शिकार आणि मानवी  आक्रमणामुळे असावा. प्लॅटिपसच्या शरीराचे सरासरी तापमान ३२ से. असते . इतर अपरास्तनींचे तापमान ३७ से. असते. संशोधनावरून असे दिसते की, हे प्राणी विषम परिस्थितीशी अनुकूलित असतात.

आधुनिक तरुण प्लॅटिपसमध्ये प्रत्येक जांभिकेमध्ये तीन दात असतात. त्यात एक उपदाढ व दोन दाढा असतात आणि दंतअस्थिवर (Dentary) ३ दाढा असतात. त्या दाढा मात्र आपले प्रजनन काळ पूर्ण होण्यापूर्वी लवकरच पडतात. प्रौढांमध्ये वजनदार कॅरेटिनने बनलेल पॅड्स असतात. त्यांना शृंगदंती (Ceratodons, horn tooth) असे म्हणतात आणि त्यांचा उपयोग अन्नाचे चर्वण करण्यासाठी होतो. पहिला वरचा आणि तिसरा खालच्या गालाचे दात पिलांमध्ये लहान असतात. प्रत्येकाला एक प्रमुख दंतस्कंध (Cusp) असतो आणि इतर दातांना दोन मुख्य दंतस्कंध असतात. इतर प्राण्यांपेक्षा प्लॅटिपसच्या जबड्याची रचना वेगळी असते. तसेच जबडा उघडणारा स्नायू वेगळा असतो.

जरी दोन्ही नर आणि मादी प्लॅटिपस घोट्यावरील प्रसरसह जन्माला येतात तरी फक्त नरांमधील प्रसर हा विष बाहेर टाकतो. त्या विषात मोठ्या प्रमाणात डिफेन्सिनसारखे प्रथिने असतात. प्लॅटिपसमध्ये तीन प्रथिने वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. ही  प्रथिने प्लॅटिपसच्या रोगप्रतिकार प्रणाली मार्फत तयार केली जातात. या प्रथिनांमुळे रोगकारक जिवाणू व विषाणूंमध्ये अपघटन (Lysis) होते. परंतु प्लॅटिपसमध्ये संरक्षणासाठी मात्र ही प्रथिने विषाचे काम करतात. कुत्र्यासारख्या छोट्या प्राण्यांना ठार मारण्यासाठी हे विष प्रभावी असले तरी त्यामुळे माणसाचा मृत्यू होत नाही. परंतु भयंकर वेदना इतक्या त्रासदायक असतात की व्यक्ती पंगू बनते. जखमेभोवती चटकन सूज येते आणि ती बाधित अवयवांमध्ये पसरते. काही घटनांवरून माहिती मिळते की, तीव्र वेदना काही दिवस किंवा काही महिने टिकतात. नराच्या जांघिय (Crural) ग्रंथीमध्ये हे विष तयार होते. वृक्काच्या आकारासारख्या गुहिकाग्रंथी असून पातळ भिंतीच्या नलिकेमार्फत पार्ष्णिका (Calcaneus) प्रसरमध्ये प्रत्येक मागच्या पायांमध्ये उघडते. मादी प्लॅटिपस व इकायडनामध्ये अविकसित प्रसर कोंब असतात. तसेच त्यांच्यात कार्यक्षम जांघियग्रंथी नसते.

विद्युत ग्रहण : अंडजस्तनी हे एकमेव प्राणी (डॉल्फिनची एक प्रजाती मात्र अपवाद आहे) आहेत की, ज्यांना विद्युतग्रहणाची समज आहे. स्नायूंच्या आकुंचनामुळे तयार होणाऱ्या विद्युत क्षेत्रातील  भक्ष्याला शोधून काढतात. इतर अंडजस्तनींपेक्षा प्लॅटिपसचे विद्युतग्रहण अत्यंत संवेदनशील आहे.

विद्युत ग्राहक (Electro receptors) ज्ञानेंद्रिये चोचीच्या त्वचेत चेहरापुच्छ (Rostrocaudal) रांगेत असतात. तर स्पर्शेंद्रिय चोचीमध्ये सर्वत्र पसरलेली असतात. प्रमस्तिष्क बाह्यकाचे विद्युतसंवेदी क्षेत्र हे स्पर्शिक तनुसंवेदी क्षेत्रात सामावलेले असते. काही बाह्यांग पेशींना (Cortical cells) विद्युतग्राही  आणि यांत्रिकग्राही यांच्यापासून माहिती पुरविली जाते. त्यावरून असे स्पष्ट होते की, स्पर्शेंद्रियांचा व विद्युत  इंद्रियांचा खूप जवळचा संबंध आहे. विद्युतग्राही व यांत्रिकग्राही हे दोन्ही ज्ञानेंद्रिये चोचीमध्ये असून ते प्लॅटिपसच्या मेंदूतील कायपोषी भागावर (Somatotropic) प्रभावी ठरतात. त्याचप्रमाणे मानवी हाताच्या वेदना ग्राही (Painfield) भागावर प्रभावी ठरतात. विद्युत ग्राहीच्या संदेशांच्या तीव्रतेमधील फरकांवरून प्लॅटिपस हे विद्युत उगमाची दिशा ठरवतात. यावरून शिकार करताना प्राणी डोक्याची  बाजूबाजूने होणारी हालचाल का करतात त्याचा उलगडा होतो. बाह्यांग संमिलन (Cortical convergence) यात विद्युत संवेदी आणि स्पर्शिक यांच्या निवेशामुळे एक यंत्रणा भक्ष्याचे अंतर ठरवते. जेव्हा ते धावतात तेव्हा ते विद्युत संदेश व यांत्रिक दाब ठोके बाहेर टाकतात. अंतराचा अंदाज किंवा वेध घेण्यासाठी प्लॅटिपस येणाऱ्या संदेशांच्या वेळांमधील फरकाचा वापर करतात.

प्लॅटिपसचे अन्न मिळवणे डोळे आणि गंध ज्ञानावर अवलंबून नाही. प्लॅटिपस डोळे, कान  नाक पोहताना बंद करतो. पाण्याच्या तळाशी आपली चोच खुपसतो. त्यावेळी त्याचे विद्युतग्राही भक्ष्यातील स्नायूंच्या आकुंचनामुळे तयार होणाऱ्या विद्युतप्रवाहाचा शोध घेतात. त्यामुळे त्याला प्राणी आणि निर्जीव वस्तू यांमधील फरक कळतो. त्यातून त्याचे ग्राही सतत उद्दीपित होतात. प्रयोगांवरून असे सिद्ध झाले आहे की, कृत्रिम झिंग्यालाही प्लॅटिपस प्रतिसाद देतो, परंतु फक्त त्यातून थोडासा विद्युत प्रवाह सोडला पाहिजे.

आहार : प्लॅटिपस हा मांसाहारी प्राणी आहे. त्याच्या आहारात गांडूळ, कृमी, कीटकांच्या अळ्या, गोड्या पाण्यातील झिंगे आणि खेकडे इत्यादींचा समावेश असतो. पोहताना देखील तो भक्ष्य पकडतो. त्यांच्यात गालाच्या पिशव्याच्या साहाय्याने तो भक्ष्य पृष्ठभागावर आणतो आणि खातो. प्रत्येक दिवशी प्लॅटिपस आपल्या वजनाच्या २० % भक्ष्य खातो.  त्याला  भक्ष्य शोधण्यासाठी सरासरी बारा तास खर्च करावे लागतात.

आ. १. प्लॅटिपस : जीवनक्रम

प्रजनन : या प्रजातीत विणीचा एकच हंगाम असतो. जून ते ऑक्टोबर या काळात नर मादीचा समागम होतो. काही ठिकाणी स्थानिक भेद आढळतात. ऐतिहासिक निरीक्षणात “चिन्हांकित करा आणि पुन्हा मिळवा” (Mark and recapture) या अभ्यासात प्राण्यांच्या लोकसंख्येच्या आकाराचा अभ्यास केला जातो. यामध्ये प्राण्यांच्या लोकसंख्येचा छोटा भाग पकडला जातो, त्यांना चिन्हांकित केले जाते आणि नंतर सोडून देतात. लोकसंख्या अनुवंशशास्त्राच्या प्राथमिक संशोधनात असे आढळून आले की, निवासी व अस्थिर निवासी लोकसंख्येमध्ये बहुपत्नी समागम प्रणाली दिसते. वयाच्या दुसऱ्या वर्षी माद्या लैंगिक दृष्ट्या प्रजननक्षम  होतात. परंतु ९ वर्षे वयाच्या माद्या प्रजनन करतात.

विणीच्या हंगामानंतर प्लॅटिपस मात्र साध्या बिळात राहतो. त्या बिळाचे प्रवेशद्वार ३० सेंमी. व्यासाचे असून जलपातळीच्या वर असते. समागमानंतर मादी खोलवर बीळ तयार करते. ते काहीसे रुंद, २० मी. लांब व काही ठराविक अंतरावर ते बंदिस्त असते (वाढते पाणी किंवा शत्रू बिळात शिरू नये यासाठी ही योजना असते किंवा बिळातील आर्द्रता व तापमान नियमनासाठी ही योजना केली जाते). नर पिलांची काळजी घेत नाहीत. मागील वर्षाचे बीळ नर नष्ट करतो. मादी बिळातील जमीन मऊ करते. त्यासाठी मृत व घड्या घातलेली ओली पाने वापरते. बिळाच्या शेवटी ती वाळलेली पाने, वेत असे बिछान्यासाठी  साहित्य आणले जाते. हे साहित्य आपल्या वेटोळे केलेल्या शेपटीखाली घालून बिळाजवळ ओढून आणते.

मादीमध्ये अंडाशयाची एक जोडी असते. फक्त डाव्या बाजूचे अंडाशय हे कार्यक्षम असते. प्लॅटिपसचे जनुक स्तनी XY आणि पक्षी व सरीसृप ZW या लिंग ठरविणाऱ्या प्रणालीमधील उत्क्रांतीचा दुवा मानले जातात. कारण प्लॅटिपस च्या ५ X गुणसूत्रांपैकी एकात DMRT1 जनुक आढळून आले आहे.  हे जनुक पक्ष्यांच्या Z गुणसूत्रांवर आढळतो. मादी १-३ (शक्यतो दोन) त्वचा आवरण असलेली अंडी देते (ती सरीसृपांच्या  अंड्यासारखी असतात.)अंडे ११ मिमी. व्यासाचे व किंचित पक्ष्यांच्या अंड्याहून गोलाकार असते. अंडी ही गर्भाशयातच २८ दिवसांपर्यंत विकसित होतात. फक्त दहा दिवस त्यांना शरीराबाहेर उबवावे लागते. अंडी घातल्यानंतर त्यांच्याभोवती मादी आपले वेटोळे करते. अंडी उबविण्याचा काळ तीन टप्प्यांत विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यात भ्रूणातील कोणतेही कार्यक्षम अवयव नसतात आणि त्यामुळे भ्रूण ऊर्जेसाठी पीतक कोशावर (Yolk sac) अवलंबून असतो. विकसित होणारे पिल्लू पीतक शोषून घेते. दुसऱ्या टप्प्यात बोटे विकसित होतात आणि शेवटच्या टप्प्यात अंड दंत (Egg tooth) दिसू लागतो.

अधिवासाचा ऱ्हास : प्लॅटिपस तात्काळ नामशेष होण्याचा धोका नाही. प्लॅटिपसच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण तसेच कृत्रिम अधिवासातील प्रजनन अशा विविध उपाययोजनांनी त्याच्या संवर्धनाचे उपाय यशस्वी ठरले आहेत. परंतु धरण, जलसिंचन, प्रदूषण, त्यांना जाळ्यात व सापळ्यात पकडणे यांच्यामुळे त्यांच्या अधिवासावर विपरित परिणाम झाल्याचे दिसते. कमी झालेला नद्यांचा प्रवाह, भीषण दुष्काळ, औद्योगिक, कृषी आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या भरमसाठ पाण्यामुळे पाण्याची पातळी घटत आहे.  तो देखील या प्राण्यांना धोका आहे. आययूसीएन या संस्थेने प्लॅटिपसची नोंद त्यांच्या रेड लिस्ट तथा धोक्यातील प्रजातींमध्ये नोंद केलेली आहे. २०१६ मध्ये केलेल्या एका मूल्यांकनामध्ये असे आढळून आले की, युरोपियन वसाहतीनंतर त्यांची संख्या सरासरी ३० % कमी झाली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियात या प्राण्याची लुप्तप्राय प्रजातीत नोंद केली आहे. परंतु फेडरल ईपीबीसी ॲक्टखाली मात्र त्याची नोंद नाही.

आयु:काल : नर आणि मादी यांची पूर्णतः वाढ १२ — १८ महिन्यांमध्ये होते. वयाच्या १८ व्या महिन्यात ते लैंगिक दृष्ट्या परिपक्व होतात. छोट्या स्तनींमध्ये ते दीर्घ काळ जगतात. काही उपलब्ध पुराव्यांवरून वन्यस्थितीत २० वर्षांपेक्षा अधिक काळ जगतात. बंदिस्त स्थितीत मात्र प्लॅटिपस जवळपास २३ वर्ष जगतात.

रोग   :  वन्यस्थितीत प्लॅटिपस काही रोगांनी बाधित होतात. २००८ मध्ये मात्र टास्मानियामध्ये (Mucor amphiboum) या बुरशीजन्य आजाराचे घातक परिणाम आढळले होते. या रोगाला म्युकर मायकॉसिस असे म्हणतात. विशेष म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव फक्त टास्मानियन प्लॅटिपसमध्येच झाला होता. ऑस्ट्रेलियातील इतर प्रदेशात हा आजार आढळला नाही. रोगी प्लॅटिपसमध्ये त्वचेत अल्सर तथा व्रण शरीराच्या विविध भागांवर होतात. पाठीवर शेपटीवर आणि पायांवर हे व्रण पडतात. म्युकर  मायकॉसिसमुळे प्लॅटिपस मृत होतात. दुय्यम संसर्गामुळे प्राण्यांची शरीराचे तापमान नियमनाची क्षमताच नष्ट होते. तसेच  भक्ष्यही प्रभावीपणे त्याला शोधता येत नाही. जैवविविधता संवर्धन शाखा, प्राथमिक औद्योगिक व पाणी विभाग यांनी टास्मानिया विद्यापीठाशी सहयोग करून तेथील संशोधक टास्मानियाच्या प्लॅटिपसवर होणाऱ्या परिणामांचा, रोगप्रसाराची यंत्रणा आणि रोगप्रसार यावर अभ्यास करीत आहेत.

पहा : अंडज स्तनी;  विद्युत ग्राही इंद्रिये.

संदर्भ : 1. https://animalia.bio/platypus

  1. https://environment.des.qld.gov.au/wildlife/animals/a-z/platypus
  2. https://en.wikipedia.org/wiki/Platypus
  3. https://www.bushheritage.org.au/species/platypus

समीक्षक : मद्वाण्णा, मोहन


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.