इस्लाम धर्मातील एक संकल्पना. अल्लाहच्या तीन गुणधर्मांपैकी रबुबियात (दैवी संगोपन) आणि करुणा या गुणधर्मांनंतर अदालत किंवा न्याय या गुणधर्माचा क्रमांक लागतो. क्रमांक तिसरा असला तरी, अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि न्यायिक क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांत या मूल्याचा वापर असल्यामुळे त्याला आपोआपच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘अल्-फातिहा’ या ‘कुराणा’च्या पहिल्या सूरामध्ये (अध्यायात) अल्लाहचा उल्लेख, ‘मालिक-ए-यौमिद्दीन’ म्हणजेच न्यायाच्या दिनाचा स्वामी असा करण्यात आला आहे. अल्-दीन याचा अर्थ मोबदला असा असून, पाप आणि पुण्य या दोन्ही संकल्पनांसाठी ‘मोबदला’ हा एकच शब्द वापरण्यात आला आहे; पण अर्थछटा मात्र भिन्न असल्यामुळे पुण्यशील माणसाला मिळणारा न्यायाचा मोबदला पापी माणसापेक्षा वेगळा असणार हे ओघानेच आले.
‘कुराणा’तील अल्लाहच्या ९९ नावांपैकी एक नाव ‘अदिल’ असे आहे. हा शब्द ‘अदल’ किंवा ‘अदालत’ या शब्दापासून निर्माण झाला असल्यामुळे साहजिकच त्याचा अर्थ ‘न्यायदान करणारा’ असा होतो. शिवाय प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात केलेल्या चांगल्यावाईट कृत्यांसाठी स्वत: जबाबदार असते. त्यामुळे न्यायाच्या दृष्टिकोनातून त्याचा मोबदला त्याला मिळणे अटळ असते. “प्रत्येक व्यक्ती आपल्या केलेल्या कर्माशी (चांगले किंवा वाईट) बांधलेली असते” (५१:२१). न्यायाची आणि न्यायदानाची संकल्पना पुढील आयतांतून (श्लोकांतून) स्पष्ट करण्यात आली आहे : “अल्लाह कोणत्याही जीवावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक ओझे टाकीत नाही, कर्मरूपी कमाईचा त्याचा मोबदला त्यास मिळेल आणि त्याने ओढवून घेतलेली शिक्षाही त्याला मिळेल” (२:२८६). “जो कोणी सत्कर्म करतो, तो ते आपल्या स्वत:च्याच भल्यासाठी करत असतो आणि जो कोणी दुष्कर्म करतो, त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतील. अल्लाह आपल्या सेवकांवर कदापी अन्याय करीत नाही” (४१:४६).
येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कोणाही व्यक्तीला मोबदला किंवा शिक्षा दिली जाते, ती अल्लाहच्या मर्जीप्रमाणे दिली जात नाही. त्या त्या व्यक्तीचे चांगलेवाईट कृत्य किंवा पाप आणि पुण्य याच निकषांवर त्या त्या व्यक्तीला मोबदला किंवा शिक्षा दिली जाते. या सर्व सैद्धांतिक मांडणीतून सृष्टीच्या व्यवहारामागे कार्यकारणभावाचा नियम कार्यरत आहे, हे स्पष्ट होते. त्याचबरोबर चांगले आणि वाईट किंवा पाप आणि पुण्य या संकल्पनांचा आणि त्याबद्दल देण्यात येणाऱ्या मोबदला किंवा शिक्षा यांचा नेमका अर्थही स्पष्ट होतो.
निसर्गात कार्यरत असणाऱ्या रबुबियात आणि रेहमत (अल्लाहची अनुकंपा) या अल्लाहच्या गुणधर्मांच्या सुप्त चैतन्यामुळे काही फलनिष्पत्ती होत असते. ही फलनिष्पत्ती भीतीच्या दडपणामुळे होत नसते, तर ती न्याय आणि औचित्याच्या प्रभावामुळे होत असते. मानवी बुद्धीला या सर्व सृष्टिव्यवहाराचे यथायोग्य आकलन होऊ शकत नाही. त्यामुळे जीवनातील अप्रिय घटना अल्लाहच्या कोपामुळे झाल्या, असे समजून मनुष्यप्राणी स्वत:चे समाधान करून घेतो. पण तो हे लक्षात घेत नाही की, सृष्टीच्या व्यवहारामागील किंवा मानवी जीवनातील मोबदल्याचा किंवा भरपाईचा नियम कार्यरत नसता, तर मानवी जीवनातील समतोल, सौहार्द आणि न्याय या संकल्पनांना काहीच अर्थ उरला नसता.
इस्लाममधील न्यायाच्या संकल्पनेवर भाष्य करताना मौ. अबुलकलाम आझाद (१८८८–१९५८) यांनी म्हटले आहे की, “अदल किंवा न्याय या मूल्याचा वापर मापन किंवा परिणाम निश्चित करण्यासाठी केला जातो; कारण त्यामुळे संबंधित पक्षकारांच्या हितसंबंधाचे मूल्यमापन समन्यायाने करता येते किंवा त्यांना योग्य न्याय दिला जातो. परिणामत: जीवनात समतोल राखला जातो. याच तत्त्वामुळे जीवन आणि त्यातील विवेकशीलता या दोन्ही क्षेत्रांत प्रमाणबद्धता आणि सौंदर्य यांची निर्मिती होऊ शकते”.
संदर्भ :
- Husain, Athar, ‘Prophet Muhammad and His Mission’, New Delhi, 1967.
- Kidwai, Mohammad Asif, ‘What Islam Is?’, Lucknow, 1967.
- Salahi, M. A. ‘Muhammad : Man and Prophet’, Massachusetts, 1995.
- Watt, W. Montgomery, ‘Muhammad : Prophet and Statesman’, Edinburgh, 1960.
- अबुल हसन अली नदवी, ‘इस्लाम : एक परिचय’, नई दिल्ली, २०१६.
- केळकर, श्रीपाद, अनु. ‘इस्लामची सामाजिक रचना’, पुणे, १९७६.
समीक्षक : अन्वर राजन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.