इस्लाम धर्मातील एक संकल्पना. जीवनाच्या भौतिक आणि आधिभौतिक जडणघडणीत ज्या सुप्त शक्ती कार्यरत असतात त्यांतील तकदीर आणि हिदायत या दोन शक्ती महत्त्वाच्या मानल्या जातात. चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला गुणात्मकता (क्वॉलिटी) आणि परिणाम (क्वॉन्टिटी) या दोन्ही दृष्टीने नियतीने एक विशिष्ट भूमिका प्रदान केलेली असते, तिला तकदीर म्हटले जाते.
एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये अनेकानेक लहानमोठे सुटे भाग असतात. या घटकांचा पृथकपणे विचार केला, तर ते निरुपयोगी आहेत, असे वाटते; पण ते जर यंत्रात योग्य जागी बसवले, तर त्यांतून एक परिपूर्ण यंत्र तयार होते. ते कार्यान्वित करण्यात आले की, त्याच्याकडून अपेक्षित असलेले उद्दिष्ट ते यंत्र पुरे करू लागते. तकदीरचा नेमका हाच अर्थ आहे. चराचर सृष्टीच्या दैनंदिन व्यवहारातून आपल्याला याचा सतत प्रत्यय येत असतो. सृष्टीच्या प्रंचड पसाऱ्यात प्राणी, पशुपक्षी, वृक्षवल्लरी, पाणी, दगड, माती असे कित्येक घटक आहेत. वरवर पाहता ते पृथक आणि स्वतंत्र आहेत, असे दिसते. काही प्रमाणात ते खरे असले, तरी प्रत्यक्षात ते एकमेकांना पूरक असतात. शेतात उगवणारे धान्य, आकाशातून पडणारा पाऊस, वृक्षवेलींवर येणारी फळेफुले इत्यादींची सृष्टीच्या व्यवहारात काही ना काही भूमिका असते व ती भूमिका बजावणे हेच त्यांचे प्रारब्ध असते.
‘त्यानेच या चराचर सृष्टीतील प्रत्येक वस्तूची निर्मिती केली आहे. आपल्या योजनेनुसार सर्वांसाठी एक परिणाम निश्चित केले आहे.’ ‘कुराणा’च्या या आयतातून हाच अर्थ सूचित होतो.
विश्वातील सर्व वस्तुमात्र अल्लाहच्या अधिकारकक्षेत येतात. ग्रहमालाही त्याला अपवाद नसते. यासंदर्भातच ‘कुराणा’त असे म्हटले आहे की,
“सूर्य त्याला आखून दिलेल्या कक्षेतच फिरत असतो.
कारण सर्व शक्तिशाली आणि सर्वज्ञानी अल्लाहचा तो आदेश आहे.”
या अनुरूपतेच्या नियमामुळेच विश्वातील सर्व वस्तुमात्रांना जीवनसंघर्षात टिकून राहण्यासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण होते किंवा ते प्राप्त होते. आकाशात उडणारे पक्षी, पाण्यात स्वैर संचार करणारे मासे, जमिनीवर चालणारे द्विपाद व चतुष्पाद प्राणी, इतकेच नव्हे, तर मातीत रांगणाऱ्या कीटकांसाठीसुद्धा सुयोग्य वातावरण नियतीने निर्माण केले आहे. पक्षी पाण्यात, तर मासे पाण्याबाहेर जगू शकत नाही; कारण अल्लाहने त्या प्रत्येक प्रवर्गाच्या जगण्यासाठी आणि विकासासाठी जे वातावरण निश्चित केलेले असते त्यापेक्षा वेगळ्या वातावरणात ते जगण्याचा प्रयत्न करतात आणि असे वातावरण त्यांच्या जीवनसंघर्षात तगून राहण्याच्या दृष्टीने अनुरूप नसते. तोच नियम उष्ण आणि थंड हवामानाच्या बाबतीत लागू होतो. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवांवर राहणारे प्राणी उष्ण हवामानात तगू शकत नाहीत आणि उष्ण हवामानात राहणारे प्राणी थंड प्रदेशात जगू शकत नाहीत; कारण अल्लाहने या प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र प्रारब्ध आणि अनुरूप वातावरण निर्माण केले आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी अल्लाहने निश्चित केलेल्या या भूमिकेच्या कक्षेत राहणे व त्या सर्व प्रवर्गांमध्ये समतोल साधणे, हेच विश्वाच्या शांतिपूर्ण व्यवहाराचे रहस्य आहे. यांत किंचित जरी बदल झाला, तरी विश्वाच्या व्यवहाराचा तोल बिघडतो आणि मग भूकंप, वादळ, पूर, अतिवृष्टी यांसारखी आसमानी संकटे उद्भवतात. म्हणूनच हा तोल बिघडणार नाही याची काळजी घेणे हाच शांतिपूर्ण जीवन जगण्याचा चिरंतन मंत्र आहे.
संदर्भ :
- Husain, Athar, ‘Prophet Muhammad and His Mission’, New Delhi, 1967.
- Kidwai, Mohammad Asif, ‘What Islam Is?’, Lucknow, 1967.
- Salahi, M. A. ‘Muhammad : Man and Prophet’, Massachusetts, 1995.
- Watt, W. Montgomery, ‘Muhammad : Prophet and Statesman’, Edinburgh, 1960.
- अबुल हसन अली नदवी, ‘इस्लाम : एक परिचय’, नई दिल्ली, २०१६.
- केळकर, श्रीपाद, अनु. ‘इस्लामची सामाजिक रचना’, पुणे, १९७६.
समीक्षक : अन्वर राजन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.