राव, उडुपी रामचंद्र : (१० मार्च १९३२ — २४ जुलै २०१७). भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष. त्यांनी अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि बंगळूर येथील नेहरू तारांगण यांच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष पद आणि तिरुवनंतपुरम येथील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST) चे कुलपती ही पदे भूषविली. त्यांना भारताचे ‘उपग्रह पुरुष’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९७५ मध्ये भारताच्या पहिल्या ‘आर्यभट्ट’ उपग्रह प्रक्षेपणाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण (१९७६) आणि पद्मविभूषण (२०१७) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनलने आयोजित केलेल्या समारंभात वॉशिंग्टन येथील सॅटेलाइट हॉल ऑफ फेममध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आले (१९ मार्च २०१३). या सन्मानास समाविष्ट होणारे पहिले भारतीय ठरले. ते आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघमध्ये (IAF) देखील समाविष्ट होते.

राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी (१९५२), बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (१९५४) आणि अहमदाबाद येथून विक्रम साराभाई यांच्या येथे पीएच.डी. (१९६०) पदवी संपादन केल्यात. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेत संशोधन करीत असतांना एमआयटीमध्ये पोस्ट-डॉक्टरल साहाय्यक आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट डलास येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. भारतात परत येऊन ते अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत संशोधन करू लागले (१९६६).

राव यांनी भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदारी स्वीकारली (१९७२). त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित करण्यात आला. दळणवळण, दूरस्थ संवेदन आणि हवामानविषयक सेवा प्रदान करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ हून अधिक उपग्रहांची रचना आणि प्रक्षेपण करण्यात आले. त्यांनी अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासाला गती मिळाली (१९८४). परिणामी एएसएलव्ही रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण आणि २.० टन वर्गाचे उपग्रह ध्रुवीय कक्षेत प्रक्षेपित करू शकणारे पीएसएलव्हीचे प्रक्षेपण वाहन यशस्वीरित्या विकसित करण्यात आले. त्यांनीच भूस्थिर प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही आणि क्रायोजेनिक तंत्रज्ञानाच्या विकासाची सुरुवात केली.

राव हे इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अकादमी, नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स, इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स आणि थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांसारख्या अनेक अकादमींचे सन्मानीय सदस्य होते. त्यांना वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टस अँड सायन्सेसची अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात आली. त्यांनी विविध नामवंत संस्थांमध्ये सन्माननीय पदे भूषविली आहेत, त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे सरचिटणीस (१९९५-९६), इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशनचे उपाध्यक्ष (१९८४— १९९२), विकसनशील देशांशी संपर्क समितीचे (CLIODN) अध्यक्षपद (१९८६ पासून), युनोच्या ‘बाह्य अंतराळाचा शांतीपूर्ण वापर’ म्हणजे UN-COPUOS समितीचे तसेच UNISPACE परिषदेचे अध्यक्ष (जून १९९७), नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशन रिसर्चचे सह-अध्यक्ष, प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष, सेंटर फॉर स्पेस फिजिक्सच्या नियामक मंडळाचे चौथे अध्यक्ष (२००७). अध्यक्ष असताना त्यांनी त्याचे राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन त्याचे नाव बदलून इंडियन सेंटर फॉर स्पेस फिजिक्स असे ठेवले. याव्यतिरिक्त त्यांनी कर्नाटक विज्ञान आणि तंत्रज्ञान अकादमीचे अध्यक्षपद, बंगलोर असोसिएशन ऑफ सायन्स एज्युकेशन-जेएनपीचे अध्यक्षपद, लखनौच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरूपद, केंद्रीय संचालक मंडळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सदस्यपद, बंगलोरच्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडचे अतिरिक्त संचालकपद आणि पुण्याच्या गव्हर्निंग कौन्सिल ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटरॉलॉजीचे अध्यक्षपद भूषविले.

राव यांनी वैश्विक किरण, आंतरग्रहीय भौतिकशास्त्र, उच्च ऊर्जा खगोलशास्त्र, उपग्रह आणि रॉकेट तंत्रज्ञान या विषयांवर ३५० हून अधिक वैज्ञानिक आणि तांत्रिक लेख लिहिले आहेत.

राव यांचे बंगळुरु येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #इस्रो #एएसएलव्ही #पीएसएलव्ही #जीएसएलव्ही

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.