पठाराच्या कडांवर जेथे नद्यांचे प्रवाह स्फटिकमय कठीण खडकांच्या प्रदेशातून एकदम मृदु खडकांच्या सखल मैदानी प्रदेशात किंवा किनारपट्टी मैदानात प्रवेश करतात, तेथे अनेक धबधबे (जलप्रपात) व द्रुतवाह यांची मालिकाच निर्माण होते. ही प्रपातमालिका ज्या रेषेवर निर्माण होते, तिलाच जलप्रपात रेषा म्हणतात. नद्यांच्या प्रवाहमार्गात जेथे उच्चभूमी प्रदेश व
सखल प्रदेश एकत्र येतात, अशा भौगोलिक सीमाभागात जलप्रपात किंवा द्रुतवाह आढळतात. झीजप्रक्रियेतील असमानता, भूसांरचनिक उत्थान आणि समुद्रपातळीतील बदल यांमुळे धबधबे व द्रुतवाह यांची मालिका निर्माण होण्यास अनुकूल भूशास्त्रीय रचना निर्माण होते. जलप्रपात रेषा ही भीन्न प्राकृतिक व भूशास्त्रीय रचनेतील सीमारेषा असते. या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंकडील भूप्रदेशाची उंची, खडकरचना व मृदेच्या गुणधर्मात खूपच तफावत असते. अशा भूशास्त्रीय रचनेत उच्चभूमी प्रदेशातील खडक तुलनेने अधिक कठीण असतात, तर मैदानी किंवा किनारपट्टी मैदानातील खडक तुलनेने बरेच मृदु असतात. झीज कार्यामुळे मैदानी भागातील मृदु खडकांची झीज लवकर आणि जास्त झालेली असते, तर तुलनेने पठारी प्रदेशातील कठीण खडक कमी झीजतात. त्यामुळे अशी खडकरचना असलेल्या नदीपात्रात उंच कडे निर्माण होतात. हे एक भू-आकृतिवैज्ञानिक भूमिस्वरूप असून या भागात नदीचे पाणी उच्चभूमी प्रदेशातून खाली सखल भागात म्हणजेच उंच कड्यांवरून खोल दरीत कोसळत असते. अशाप्रकारे पठाराच्या कडेवर प्रपात व द्रुतवाह यांची एक मालिकाच तयार होते. नदीच्या झीजकार्यामुळे कड्याच्या खडकांची जसजशी झीज होत जाते, तसतशी प्रपातमालिका मागेमागे सरकत जाते. एखाद्या प्रदेशातील पर्वत पायथ्याच्या पठारी भागातून वाहणाऱ्या नद्या पठारावरून एकदम समुद्रकिनाऱ्यावरील सखल प्रदेशात प्रवेश करून समुद्राला मिळत असतील, तर ही जलप्रपात रेषा म्हणजे जहाजवाहतूक किंवा नौकानयनाचे अखेरचे टोक असते; कारण नद्यांच्या मुखापासून अंतर्गत भागात होणारी जलवाहतूक याच अंतिम मर्यादेपर्यंत चालू शकते. अशा जलप्रपातांच्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही बाजूंना होणाऱ्या वाहतुकीत ही जलप्रपात रेषा म्हणजे एक अडथळा निर्माण झालेला असतो. सामान्यपणे या जलप्रपात रेषेलगत अनेक महत्त्वाची शहरे स्थापन झालेली आढळतात.
जलप्रपात रेषेचे उत्तम उदाहरण म्हणजे संयुक्त संस्थानांच्या पूर्व भागात असलेले पीडमाँट हे पर्वतपदीय पठार आणि अटलांटिक किनारपट्टी मैदान यांदरम्यान आढळणारी जलप्रपात
रेषा. पीडमाँट पठार आणि अटलांटिक किनारपट्टीचे मैदान यांदरम्यानची ही जलप्रपात रेषा म्हणजे एक भूशास्त्रीय सीमा आहे. येथील अॅपालॅचिअन पर्वतात उगम पावणाऱ्या बऱ्याच नद्या पूर्वेकडील पायथ्याशी पसरलेल्या प्राचीन व अतिकठीण खडकांपासून बनलेल्या पीडमाँट या पर्वतपदीय पठारावरून वाहत जातात आणि या पठाराच्या पूर्व भागात असलेल्या अतितीव्र उतारावरून अटलांटिक महासागरालगत पसरलेल्या सखल प्रदेशात धबधब्यांच्या रूपाने उड्या घेतात. त्यामुळे त्या भागात सखल प्रदेश व पठारी भाग यांच्या सीमेवर सामान्यत: दक्षिण-उत्तर गेलेली जलप्रपातरेषा निर्माण झाली आहे. सुमारे १,४०० किमी. लांब पसरलेल्या तुटलेल्या कड्यांच्या प्रदेशात ही जलप्रपात रेषा आढळते. नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या या धबधब्यांचा उपयोग एक ऊर्जासाधन म्हणून जलविद्युत निर्मितीसाठी करता येतो. जलविद्युतशक्तीच्या उपलब्धतेमुळे तेथे या जलप्रपातरेषेला अनुसरून औद्योगिक शहरांची एक मालिकाच निर्माण झालेली आढळते. तेथून वाहणाऱ्या डेलावेअर, स्कूलकिल, पटॅप्स्को, पोटोमॅक, जेम्झ आणि सॅव्हाना या प्रमुख नद्यांच्या पात्रात अनेक धबधबे आणि द्रुतवाह आढळतात. याच भागांत ट्रेंटन (न्यू जर्सी), फिलाडेल्फिया (पेनसिल्व्हेनिया) बॉल्टिमोर (मेरीलंड), वॉशिंग्टन डी. सी., रिचमंड (व्हर्जिनिया) आणि ऑगस्टा (जॉर्जिया) इत्यादी शहरे या जलप्रपात रेषेवर विकसित झालेली असून त्यांना ‘फॉल लाइन सिटीज’ असे म्हटले जाते. कॅनडातील लॉरेंशन उच्चभूमी प्रदेश आणि पंच महासरोवरे – सेंट लॉरेन्स नदी व नदीमुख खाडी यांदरम्यानच्या तुटलेल्या कड्यांच्या प्रदेशात जलप्रपात रेषा निर्माण झाली असून त्या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रात अनेक धबधबे व द्रुतवाहांची निर्मिती झालेली आढळते. पश्चिम यूरोपात फ्रान्समधील मासिफ सेंट्रल हा पठारी प्रदेश व ब्रिटनमधील पेनाइन पर्वतश्रेणी येथे, तसेच आफ्रिकेचे अरुंद किनारपट्टीचे मैदान, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील येथील किनारपट्टीची मैदाने यांना अंतर्गत खंडीय ढालक्षेत्रापासून अलग करणाऱ्या प्रदेशात जलप्रपात रेषा आढळतात. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील जलप्रपात रेषेसारखी जलप्रपात रेषा भारतात आढळत नाही; परंतु अरबी समुद्रकिऱ्यावरील आणि बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरील किनारपट्टीची मृदु गाळाची मैदाने आणि लगतच्या दख्खन पठारावरील स्फटिकमय कठीण खडकरचना असलेले पश्चिम घाट (सह्याद्री) व पूर्व घाट यांदरम्यानची भूरचना काहीशी तशी आढळते. पूर्व घाटाच्या तुलनेत पश्चिम घाटात तीव्र उताराचे कडे असल्यामुळे तेथे अनेक धबधबे व द्रुतवाह आढळतात.
संदर्भ : Monkhouse, F. J., Principles of Physical Geography, London, 2009.
समीक्षक : शेख, मोहम्मद बाबर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.