अंबानी, धीरजलाल हिराचंद (Ambani, Dhirajlal Hirachand) : (२८ डसेंबर १९३२ – ६ जुलै २००२) भारतातील अंबानी घराण्यातील पहिले प्रसिद्ध उद्योगपती आणि
रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक. धीरूभाई या नावाने परिचित. त्यांचा जन्म गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतात असलेल्या जुनागढ जिल्ह्यातील माळीया तालुक्याच्या छोरवाड या एका खेड्यात वडील हिराचंद व आई जमनाबेन या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील तालुक्याच्या शाळेत शिक्षक होते. त्यांचे रमणिकभाई आणि नातूभाई हे भाऊ, तर नीलूबेन व पुष्पाबेन या भगिणी होत.
धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांच्या शाळेतूनच झाले. त्यानंतर जुनागढ सरकारने चालविलेल्या बहादूरखानजी हायस्कूलमध्ये (सध्याचे स्वामी विवेकानंद हायस्कूल) त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे वह्या, पुस्तके घेण्यासाठी त्यांच्या वडिलांचे मित्र बाबाशेठ हे त्यांना मदत करीत. धीरूभाई ही मदत नाईलाजास्तव घेत. दुसऱ्यांकडून किती दिवस मदत घ्यायची, त्यापेक्षा स्वत:च कमाई करायची, या विचारांतून ते जुनागढ येथील गिरनार मंदिराजवळ खाद्यपदार्थ विकू लागले. या व्यवसायातून बऱ्यापैकी पैसे मिळवून ते स्वत:चा व शाळेचा खर्च भागवीत. इ. स. १९४९ मध्ये ते दहावीची परीक्षा पास झाले. त्याच सुमारास त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
वडीलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी धीरूभाई व त्यांच्या भावंडांवर आली. त्यातच धीरूभाई यांचा विवाह १९५५ मध्ये कोकीळाबेन यांच्याशी झाला. विवाहानंतर नोकरीसाठी ते सपत्निक आपल्या थोरल्या भावाकडे एडनला (अरबस्तान) जाण्याचे ठरविले; मात्र जाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा सुरभाबा पर्थ या शेजाऱ्याने त्यांना पैसे दिल्याने ते दोघे भावाकडे गेले. धीरूभाईंनी सुरुवातीला एडन येथील एका छोट्या कंपनीत महिना १२५ रूपये पगाराची नोकरी केली. त्यानंतर तेथेच फ्रान्सच्या ‘ए बेस’ नावाच्या प्रसिद्ध कंपनीत रमणिकभाई कामाला असल्यामुळे त्यांच्या शिफारशीमुळे धीरूभाईंना याच कंपनीत पेट्रोल विक्री सहायक पदावर मासिक ३०० रूपये पगाराची नोकरी मिळाली. कामाप्रती निष्ठा, चिकाटी, मेहनत इत्यादी गुणांमुळे त्यांना विक्री व्यवस्थापक पदावर बढती मिळाली. ही कंपनी आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक देशांतून व्यापारी येत. आपणही एखादी कंपनी उभारावी, या विचारांतून त्यांनी व्यापारांचा व कंपनीच्या कार्याचा अभ्यास केला. त्यांना इंग्रजी भाषा अवगत होती, ते अरबी भाषाही शिकले व परदेशी मित्र जोडले.
धीरूभाई यांना १९५७ मध्ये मुकेश हा मुलगा झाला. आपली पत्नी व मुलाला घेऊन ते १९५८ मध्ये स्वत:चा व्यवसाय उभा करण्याच्या उद्देशाने एडनहून भारतात परतले. पंधरा हजार रूपये जमवून त्यांनी त्र्यंबकलाल दामाणी या दूरच्या मामासह भागीदारी तत्त्वावर मुंबईहून एडनला मसाल्याचे पदार्थ, साखर, गूळ, सुपारी इत्यादी वस्तू पाठविण्याचा व्यवसाय १९५९ मध्ये सुरू केला. थोड्याच दिवसांत त्यांनी रेयॉन कापडाचा व्यवसायही सुरू केला. या दोन्ही व्यवसायातून चांगली कमाई होऊ लागली. त्यामुळे त्यांनी १९६६ मध्ये भारतातील नेरोडा येथे स्वतःच्या मालकीची कापड गिरणी सुरू केली. केंद्र सरकारने १९७१ मध्ये व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी आयात-निर्यात धोरण अनुकूल केले. याचा पुरेपूर फायदा घेऊन धीरूभाईंनी झांबिया, युगांडा, सौदी अरेबिया, रशिया, पोलंड इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या कापडांची निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यांमुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चढू लागले. त्यांच्या कामाचा व्याप प्रचंड वाढल्यामुळे त्यांचे मोठे बंधू रमणिकभाई व लहान बंधू नटुभाई हेही त्यांना कामास मदत करू लागले.
जागतिक बँकेने १९७५ मध्ये ‘विकसनशील देशांतील सर्वोत्कृष्ट प्रकल्प’ म्हणून धीरूभाई यांच्या नेरोडा येथील कापड प्रकल्पाला सन्मानित केले. १९८० च्या दशकात पॉलिस्टर कापडाला मोठ्या प्रमाणात मागणी होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी त्या वेळी कोणताही व्यापारी समर्थ नसल्यामुळे धीरूभाईंनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यांनी पाताळगंगा येथे पॉलिस्टर प्रकल्प उभारून त्याची जबाबदारी केमिकल पदवी असणाऱ्या आपल्या मुकेश या मोठ्या मुलाकडे १९८१ मध्ये सोपविली. त्यांनी ती चोखपणे सांभाळत पेट्रोकेमिकल्स, पेट्रोलियम रिफायनिंग, तेल व गॅस शोध इत्यादींचे उत्पादन वाढविले आणि सर्व स्पर्धकांना मागे टाकत धीरूभाई यांची रिलायन्स कंपनी ही भारतातील सर्वांत जास्त उत्पादन घेणारी कंपनी ठरली. वाढत्या कामाचा व्याप लक्षात घेऊन धीरूभाई यांचा लहान मुलगा अनिल यांनी १९८३ मध्ये व्यवसायात प्रवेश केला आणि नेरोडा येथी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. १९८४ मध्ये धीरूभाई यांनी पेट्रोकेमिकल्स कंपनी सुरू केली. १९८८ मध्ये जपानच्या इटोचू कंपनीच्या साह्याने १,००० कोटी रूपयांची गुंतवणूक असणाऱ्या ‘रिलायन्स पॉलीप्रोपिलीन लिमिटेड’ आणि ‘रिलायन्स पॉलीथिलीन लिमीटेड’ या दोन वेगळ्या कंपन्या तयार केल्या. काही काळातच या दोन्ही कंपन्या, तसेच ‘रिलायन्स टेक्स्टाईल’ ही कंपनी यांचे एकत्रीकरण करून ‘रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड’ ही एकच कंपनी बनविली. त्यामुळे रिलायन्सचा उद्योग प्रचंड प्रमाणात वाढून ही कंपनी भारतातील क्रमांक एकची कंपनी म्हणून नावाजली.
धीरूभाई यांनी खावडा (जामनगर) येथे पेट्रोलियम उद्योग सुरू केला. कालांतराने त्यांनी आपल्या रिलायन्स उद्योग समूहाचा व्याप वाढवत दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, किरकोळ उद्योग, वस्त्रे, पायाभूत सुविधा, भांडवली बाजार व पुरवठा इत्यादी क्षेत्रांत पोहचविला. त्यांच्यात बँका व विमा कंपन्यांशी व्यवहार करण्याचेही कौशल्य होते. त्यांनी आपल्या औद्योगिक दूरदृष्टी व अनुभवावरून जाणले होते की, उद्योगासाठी केवळ भांडवल व धाडस असून चालत नाही, तर अंगात कार्यक्षमतेची जोड असणे गरजेचे असते. स्वतःप्रमाणे त्यांनी आपल्या उद्योगात कार्यक्षम माणसांची निवड करून त्यांना ते वेळोवेळी अद्ययावत व कार्यकुशल ठेवत. त्यांनी कर वाचविण्यासाठी आपल्या उद्योगांची सुरुवात त्या वेळी ग्रामीण भागात केली आणि १० वर्षांत वाचलेला कर पुन्हा उद्योगांत गुंतवून उद्योगवाढीस समर्थपणे फायदा करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी भारतात नवी औद्योगिक संस्कृती तयार करून त्यांच्या कंपन्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांनाही त्यांनी कोट्यधीश बनविले. अंबानी घराण्यात उद्योगधंद्याची कोणतीही परंपरा नसताना केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरावर उद्योगक्षेत्रात पाऊल टाकून त्यांनी यशाचे एव्हरेस्ट गाठले. आपल्या यशाचे रहस्य सांगताना ते म्हणतात की, ‘माणसाला महत्त्वाकांक्षा हवी आणि त्याला इतर माणसांची मने ओळखता आली पाहिजे’.
ज्या काळात धीरूभाई यांची रिलायन्स कंपनी विस्तारत गेली, त्याच काळात देशात खुलेपणा आणि खासगीकरणाचे धोरण अंमलात येत होते. वित्तीय क्षेत्रात व्यापक सुधारणा होत होत्या. रिलायन्स कंपनीने समभाग, रोखे, ऋणपत्रे यांद्वारे हजारो कोटी रुपयांचे भांडवल बाजारातून उभारले. मुख्य म्हणजे सामान्य माणसास अशी गुंतवणुकीची संधी दिली. लाखो नवे गुंतवणूकदार भांडवल बाजारात बचती गुंतवू लागले. देशात नव्या समभाग संस्कृतीची सुरुवात मुख्यतः धीरूभाई यांच्या रिलायन्स कंपनीपासून झाली, असे आढळून येते.
धीरूभाई यांना त्यांच्या औद्योगिक कार्यकुशलतेबद्दल पुढील मानसन्मान लाभले : डीन्स मेडल (१९९८), पॉव्हर ५० : दि मोस्ट पॉव्हरफुल पीपल इन एशिया (१९९६, १९९८ व २०००), इंडियाज मोस्ट एडमायर्ड सीईओ (जुलै १९९९), बिझनेसमन ऑफ दि इयर (ऑक्टोबर १९९९), इंडियन बिझनेसमन ऑफ दि इयर (डिसेंबर १९९९), क्रिएटर ऑफ दि व्हेल्थ ऑफ दि सेंच्युरी (जानेवारी २०००), मॅन ऑफ दि सेंच्युरी अवॉर्ड (नोव्हेंबर २०००), इकॉनॉमिक टाइम अवॉर्ड (२००१), मॅन ऑफ ट्वेटीथ सेंच्युरी किताब, लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड (२००१), ए. बी. एल. एफ. ग्लोबल एशियन अवॉर्ड (२०११).
फोर्ब्ज नियतकालिकात ५०० च्या यादीत रिलायन्स ही भारतातील पहिली कंपनी ठरली. धीरूभाईंच्या उत्कृष्ट व्यवसाय कौशल्यामुळे रिलायन्स उद्योग आज देशातील आणि जगातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक साम्राज्यांपैकी एक आहे.
धीरूभाई यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर २०१६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
धीरूभाईंना मुकेश, अनिल, नीना व दीप्ती ही चार अपत्ये आहेत.
संदर्भ :
- कोल्हे. रविंद्र, कॉर्पोरेट गुरू : धीरूभाई अंबानी, साकेत प्रकाशन, पुणे, २०१७.
- झेंडे, जयप्रकाश, महाराष्ट्रातील उद्योजक, पुणे, २००९.
समीक्षक : संतोष दास्ताने
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.