भारतातील एक आदिवासी जमात. ही जमात मुख्यत: उत्तरप्रदेशातील गंगा व यमुना नदीच्या मधल्या भागात वास्तव्यास असून मुरादाबाद, बरेली, पिलीभीत, अलीगढ, शहाजानपुर व
झांशी या भागांत विखुरलेले आहेत. तसेच ते राजस्थानमधील जैसलमीर परिसरामध्येसुद्धा हे लोक काही प्रमाणात आढळून येतात. ऐतिहासिक नोंदीनुसार हा समाज भटके जीवन जगणारा होता. ब्रिटीशांनी त्यांची नोंद गुन्हेगार जमात म्हणून केल्याचे आढळते. भारत सरकारने त्यांची नोंद भटक्या व विमुक्त जमातीमध्ये केली आहे; मात्र आता हे लोक स्थायिक झाल्याचे दिसून येते. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार ६,०१५ इतकी लोकसंख्या होती.
हबुरा जमात स्वत:ला राजपूत चौहान घराण्याचे वंशज असल्याचे मानतात. दाभी, सोलंकी, परमार व माकोल अशी त्यांची चार कुळे अहेत. मोगल काळात धर्मांतराच्या जुलुमांमुळे त्यांच्या पूर्वजांना मोगल राज्यकर्त्यांविरुद्ध लढावे लागले, त्यात ते हरले व तेथून त्यांना जंगलामध्ये जाऊन आश्रय घ्यावा लागला.
हबुरा लोक लांबुळक्या व अरुंद किंवा निमुळत्या डोक्याचे असतात. ते मध्यम उंचीचे असून उभट चेहरा, अरुंद कपाळ, लांब नाक व छोटी हनुवटी अशी त्यांची शारीरिक ठेवण असते. त्यांची हबुरा ही मूळ भाषा असून तीच आपापसांत बोलली जाते. बहुतांशी लोक हिंदी भाषासुद्धा बोलतात. त्यांच्या बोलीभाषेवर गुजराती भाषेचाही प्रभाव अधिक आहे. यावरून ही जमात मुळात गंगा-यमुनेच्या दक्षिणेकडून आलेली असावी किंवा राजस्थानशी संबंधित असावी, असा तर्क केला जातो.
हबुरा जमात बहुदा संसी जमातीची शाखा असावी. तसेच सिरकीबंद जमातीशी त्यांची जवळीक असून त्यांच्या पंचायतीला ते लोक मानतात आणि त्यांच्याशी व्यावहारिक संबंध ठेवतात. चांभार, भंगी, धोबी, कलार या लोकांकडून ते खाण्यापिण्याच्या वस्तू घेत नसून फक्त कोरडा शिधा घेतात.
हबुरा जमात पूर्वी भटकत राहून चोऱ्या, घरफोड्या अशा पारंपरिक गुन्हे करीत. आपल्या मुलांनाही लहानपणीच शेतातल्या चोऱ्या करायला शिकवत; मात्र आता ते गुन्हेगारीची कामे करताना दिसून येत नाही, तर बरेचसे लोक शेती, शेतमजुरी व इतर मजुरीची कामे करतात. काही लोक रिक्षा ओढतात, हे लोक जाट व ब्राह्मण लोकांच्या जमिनी कसतात आणि त्यातील ‘बटाही’ म्हणजे वाटा घेणे किंवा ‘दिलाही’ म्हणजे कराराने शेती कसतात. हबुरा जमात ही शाखाहारी न मांसाहारी आहे. गहू व तांदूळ हे त्यांचे प्रमुख अन्न असून ते सर्वप्रकारच्या पालेभाज्या व डाळी खातात.
हबुरा जमात काला नामक देवाला आपली पारंपरिक कुलदेवता मानतात. त्यांची लग्नकार्य, जन्म-मृत्यू संबंधित कर्मकांडे काही प्रमाणात हिंदूप्रमाणे करताना दिसतात. लग्न करताना कुळाबाहेर, मात्र जमातीमध्येच लग्न केले जाते. सारख्या कुळांमध्ये विवाह होत नाहीत.
हबुरा जमातीमध्ये मृताचे गहन करतात. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा पोटजातीमध्ये मृताला पुरण्याची पद्धत दिसून येते. ते दहावा किंवा तेरावा दिवस पाळून या दिवशी समाजाला जेवण देतात आणि मृताच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी दारूचा नैवद्य दाखवून प्रार्थना केली जाते.
संदर्भ : Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.
समीक्षक : लता छत्रे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.