महायान बौद्ध पंथातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध बोधिसत्त्व. पूर्वोत्तर आशियातील देशांमध्ये त्याच्या उपासनेमुळे ज्ञान, चातुर्य, स्मरणशक्ती, बद्धी आणि वक्तृत्व प्राप्त होते, अशी मान्यता असल्याने त्याच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गूढ धर्मग्रंथांचा अर्थ प्रदान करणारा बोधिसत्त्व अशी त्याची ख्याती बौद्ध तंत्राग्रंथांमधून वर्णिली आहे. तंत्रातील साधनेला अनुसरून जे लोक त्याचे ध्यान करू शकणार नाहीत, अशांनाही केवळ त्याच्या मंत्रोच्चारणाने सिद्धी प्राप्त होऊ शकते, अशी धारणा आहे.
मंजुश्री बोधिसत्त्वाचा प्रवेश महायान पंथात नेमका कधी झाला, हे सांगणे कठीण आहे. परंतु आर्य मंजुश्रीमूलकल्प या इ.स. तिसऱ्या शतकापूर्वीच्या ग्रंथामध्ये सर्वप्रथम त्याचा निर्देश आढळतो. तिसऱ्या शतकातील गुह्यसमाजतंत्रामध्ये मंजुवर नावाने त्याचा उल्लेख आढळतो. अश्वघोष, नागार्जुन आणि आर्यदेव ह्या बौद्ध पंडितांनी मंजुश्रीचा उल्लेख केलेला आढळत नाही; तथापि चौथ्या शतकातील सुखावतीव्यूहाच्या चिनी भाषांतरात आणि त्यानंतरच्या बौद्ध साहित्यात त्याचे अनेक उल्लेख आढळतात. सद्धर्मपुण्डरीक, विमलकीर्तिनिर्देश, सप्तशतिकाप्रज्ञापारमिता या महायान ग्रंथांतून बोधिमार्गाचा उपदेशक मंजुश्री ठळकपणे दिसतो.
वज्रयान पंथातील तथागतांच्या कुलपरंपरेतील अक्षोभ्य ध्यानी बुद्धापासून त्याचा जन्म झाल्याचे आणि यमारी ही त्याची शक्ती असल्याचे निर्देश आढळतात. मंजुघोष, मंजुवर, धर्मधातुवागीश्वर, वज्रराग, मंजुवज्र इ. मंजुश्रीची निरनिराळी रूपे असून त्यांची मूर्तिध्याने निरनिराळी आहेत. निष्पन्नयोगवली या तांत्रिक ग्रंथांत मंजुवज्राचे ध्यान त्रिमुख आणि षड्भुज असे वर्णिले आहे. तीन मुखांचे पीत, नील आणि श्वेत वर्ण, उजव्या तीन हातांमध्ये खड्ग, बाण आणि तिसरा वरद मुद्रेत. डाव्या तीन हातात नील कमल, धनुष्य आणि प्रज्ञापारमिता हे पुस्तक असते. किंवा दोन हातांची धर्मचक्र मुद्रा आणि डाव्या हातातील कमळावर प्रज्ञापारमिता पुस्तक असते.
मंजुश्रीच्या उजव्या हातातील खड्ग हे अज्ञानखंडनाचे आणि डाव्या हातातील प्रज्ञापारमिता ग्रंथ हे उच्चविद्या प्रदान करणाऱ्या देवतेचे प्रतीक मानले जाते. सारनाथ, मगध, बंगाल, नेपाळ आणि इतरत्र मंजुश्रीच्या प्राचीन मूर्ती आढळतात. नेपाळ, तिबेट, चीन, जपान, जावा वगैरे प्रदेशांत शिल्पकारांच्या कल्पनेप्रमाणे तयार केलेल्या त्याच्या विविध प्रतिमा उपासनेत आढळतात. साधनामाला ह्या वज्रयान पंथाच्या तंत्रपर ग्रंथात मंजुश्रीविषयी बरीच माहिती आलेली आहे. तसेच त्याची ३९ साधने व ४० ध्यानेही वर्णिली आहेत.
मंजुश्री हा कोमल सौंदर्य असणारा तरुण बोधिसत्त्व आहे. बोधिमार्गाच्या उच्च पातळीवरचा हा बोधिसत्त्व आहे. बुद्ध होण्याच्या मार्गातील सर्वांत शेवटच्या, म्हणजे दहाव्या भूमीचा तो अधिकारी असल्याने ‘दशभूमीश्वर’ असा त्याचा निर्देश येतो. या भूमीवर साक्षात भगवान बुद्धांकडून धर्मराजपुत्र म्हणून बोधिसत्त्व अभिषिक्त होतो. म्हणूनच ‘कुमार’, म्हणजे राजपुत्र अशा अर्थाने मंजुश्रीला ‘कुमारभूत’ हे विशेषण लावले जाते. मंजुश्री हा बोधिमार्गाचा उपदेशक, साधकांचा संरक्षक आणि ध्यानदेवता अशा विविध स्वरूपांत आढळतो. महायान सूत्र ग्रंथांमधून तो प्रज्ञाविषयक प्रश्नांवर उत्तरे देताना दिसतो. तथात्व म्हणजे काय, बोधिचित्तप्राप्तीचे गुण कुठले, प्रज्ञा कशास म्हणतात इत्यादींविषयी तो भाष्य करतो. सद्धर्मपुंडरीकसूत्रात त्याने असंख्य लोकांना उपदेश करून समुद्रातील असंख्य प्राण्यांनाही मार्ग दाखविला, त्यांच्या आपापल्या कुवतीप्रमाणे त्यांची धार्मिक ध्येये प्राप्त करून दिली आणि समुद्रातही सद्धर्मपुंडरीकसूत्राचेच वाचन केले, असे म्हटले आहे. विमलकीर्तिनिर्देशसूत्रांमध्ये तो विमलकीर्तिच्या अनेक प्रश्नांचे निरसन करतो. एकदा विमलकीर्ति मंजुश्रीस विचारतो की, ‘तथागतांचे कुळ कोणते?’ तेव्हा मंजुश्री म्हणतो, ‘अविद्या, तृष्णा, राग, दोष, मोह इत्यादी बुद्धांचे कुटुंब आहे’, हे उत्तर ऐकून विमलकीर्ति आश्चर्यचकित होऊन यामागचे कारण विचारतो. तेव्हा मंजुश्री उत्तरतो, ‘लाल, निळी, पांढरी रंगांची सुगंधित कमले येतात ती चिखलामधूनच. त्याप्रमाणेच हे सर्व दोष ज्याचे नातलग आहेत, त्याच्याच चित्ताच्या ठिकाणी बुद्धधर्माच्या गुणांचा उगम होतो’. सप्तशतिका, प्रज्ञापारमिता सूत्रांमध्ये मंजुश्री ‘प्रज्ञापारमिता भावना विशद करताना दिसतो. प्रज्ञापारमिता ही अशी भावना आहे की, जी सामान्य धर्मांचा त्याग करीत नाही किंवा बुद्ध गुणांचा स्वीकारही करीत नाही. ती कुठल्याही धर्माचे ग्रहण अथवा नि:सरण करीत नाही. तिच्यामुळे कुठल्याही धर्माची हानी अथवा वुद्धी होत नाही; कारण प्रज्ञापारमिता भावनेने युक्त असणाऱ्याला कुठल्याच धर्मांची जाणीव नसते. ज्याची प्रार्थना करायची, ज्याने करायची अथवा ज्या ठिकाणी करायची या कशाचीही जाणीव शिल्लक राहत नाही.’
मंजुश्रीचे मूळ भारतातील असले, तरी मूर्तिमंत प्रज्ञेचे स्वरूप असणाऱ्या या बोधिसत्त्वाची प्रसिद्धी चीन, कोरिया, जपान, नेपाळ, तिबेट इ. देशांत पसरली आहे.
नेपाळमध्ये नेपाळभूमी वसविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंजुश्रीने केल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. स्वयंभूपुराण या ग्रंथातील कथेनुसार मंजुश्री हा चीनमधील पंचाशीर्ष पर्वतावर एकदा ध्यानस्थ बसला असता, स्वयंभू आदिबुद्ध हे नेपाळमधील ‘कालिह्रद’ या सरोवरात एका प्रफुल्ल कमळातून अग्निज्वाळेच्या रूपात प्रकट झाले आहे, असे त्याला दिसले. या साक्षात्कारानंतर मंजुश्री, मंजुदेव आचार्यांचे रूप घेऊन आपल्या दोन पत्नी आणि शिष्यसंघाला घेऊन नेपाळमध्ये आला. आदिबुद्ध विशाल सरोवराच्या मधोमध असल्यामुळे दर्शनासाठी निकट जाणे शक्य नव्हते. त्या वेळी चारही बाजूंनी असणा-या डोंगरांचे निरीक्षण करून मंजुश्रीने चंद्रहास तलवारीने दक्षिणेकडील कडा कापला आणि तळ्यातील पाणी बाहेर वाहू लागले. अशा तऱ्हेने ते स्थान कोरडे झाल्यानंतर मंजुश्रीने स्वयंभू आदिबुद्धांची प्रतिष्ठापना केली. या काळात आपल्या शिष्यांसह मंजुश्रीने वास्तव्य केलेले ठिकाण आजही नेपाळमध्ये मंजुश्रीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. चीनमधून सोबत आलेल्या धर्माकर राजाला त्याने नवीन नेपाळभूमीचे राज्य सोपविले आणि नंतर तो चीन देशात परत गेला.
चीनमधील प्राचीन खोतान देशाच्या निर्मितीची लोककथाही अशाच स्वरूपाची आणि नेपाळहून प्राचीन असल्याचे मत जॉन ब्राउ यांनी मांडले आहे.
चीनमध्ये मंजुश्री ‘वेनशू’ नावाने प्रसिद्ध असून शांघायमधील ‘वू-ताई-शान’ पर्वतावर मंजुश्रीला बोधि प्राप्त झाली, असे मानण्यात येते. त्यामुळे हा पर्वत मंजुश्रीचे पवित्र स्थान म्हणून विख्यात आहे. तिबेटमधील बौद्ध धर्मात मंजुश्री निरनिराळ्या तांत्रिक रूपात आढळतो. ‘यमंतक’ हे त्याचे उग्र रूप तेथील गेलगू पंथात विशेष प्रसिद्ध आहे. तेथील बौद्ध तंत्रात मंजुश्रीला अनन्यसाधारण महत्त्व असून अनेक तंत्रांनाही त्याची नावे आहेत. तिबेटी साधनेतील मंडलांच्या मध्यभागी मंजुश्रीची प्रतिष्ठापना केलेली असते. अनेक तिबेटी ग्रंथांतून त्याला आरंभीच वंदन केलेले असते.
मंजुश्रीची उपासना मंत्रांद्वारे केली जाते. ‘ॐअरपचन धी:’ हा अरपचन मंजुश्रीचा मंत्र सुप्रसिद्ध आहे. ‘ओम वागीश्वर मूः’ हा मंजुघोषाचा मंत्र प्रसिद्ध असून अनेक प्रार्थनाचक्रांवर तो कोरलेला आढळतो. नव्याने उदयाला आलेल्या पाश्चिमात्य बौद्ध धर्मामध्ये (युरोपियन, अमेरिकन), मंजुश्री नामसंगीती आणि त्याच्या विविध रूपांचे ध्यान अधिक प्रचलित आहे.
संदर्भ :
- Bhattacharya, Benaytosh, The Indian Buddhist Iconography, Calcatta,1958.
- Brough, John, Legends Of Khotan and Nepal, Bulletin Of the School of Oriental And African studies, University of London, Vol. 12, No.2, 1948.
- Shakya, Min Bahadur, Svayambhu Puran, Nagarjun Institue of Exact Methods, 2009.
- शास्त्री, गणपती, आर्यमञ्जुश्रीमूलकल्पः, त्रिवेन्द्रम्, १९२०.
- सप्तशतिकाप्रज्ञापारमिता सूत्र ,DSBC, Nagarjun Institute Of Exact Methods, 2004.
समीक्षक – प्राची मोघे