पिशारोटी, पिशारोथ राम : (१० फेब्रुवारी १९०९ — २४ सप्टेंबर २००४). भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ.

पिशारोटी यांचा जन्म केरळ (केरलम) राज्यातील कोल्लेनगोड गावात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तेथेच झाले. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक यशाबद्दल त्यांना शालांत परीक्षेपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात आली (१९२२—२५). तामिळनाडूमधील त्रिची (तिरुचिरापल्ली) येथील सेंट जोसेफ कॉलजमधून भौतिकशास्त्र विषयात त्यांनी बी.ए. पदवी विशेष प्राविण्यासह मिळवून नंतर भौतिकशास्त्रात एम.ए. केले. पुढे ते लॉयोला महाविद्यालयात भौतिकीचे व्याख्याता पदावर रुजू झाले (१९३२—४१). उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरुमध्ये सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. पुढे त्यांनी सी. व्ही. रामन यांचा सहवास मिळावा म्हणून कॉलेजमधील नोकरीचा राजीनामा दिला आणि संशोधन साहाय्यकाचे पद स्वीकारले. सी. व्ही. रामन यांच्यासह त्यांनी १९३५, १९३६ आणि १९४० या वर्षांत प्रकाश लहरींच्या गुणधर्मांवरचे तीन शोधनिबंध प्रोसिडिंग्ज ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये  प्रकाशित केले. पुढेही त्यांच्यासह पाच शोधनिबंध प्रकाशित केले.

ब्रिटिश सरकारचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्य संचालक सर चार्ल्स नॉर्मन्ड आणि सी. व्ही. रामन यांनी हवाई दलाच्या वापरासाठी भारतातील विमानतळ संरचनेकरिता हवामानशास्त्रतज्ञ म्हणून पिशारोटी यांची नेमणूक केली (१९४२). भौतिकीवर प्रभुत्व असणारे पिशारोटी यांनी हवामानशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी व्ही. बियर्कनेस, जे. बियर्कनेस, एच. सोलबर्ग आणि टी. बर्जेरॉन यांचे जर्मन पुस्तक इंग्रजीत भाषांतरित केले. साधारण पाचशे पानांचे तीन हस्तलिखित खंड एवढा ग्रंथचा ऐवज आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांतून हवामानशास्त्रावर त्यांची हुकुमत निर्माण झाली. त्यांचे भारतीय हवामानशास्त्र विभागामधील विजेच्या कडकडाटासह होणारी वादळे, पश्चिमी चक्रवात, हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यांच्या हालचालींमुळे होणारे मान्सूनचे आगमन आणि पर्वतीय अडथळ्यांमुळे पडणारा पाऊस इ. संशोधनाचे विषय होते,.

पिशारोटी यांचे पुढील शिक्षण अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जेकब बियर्कनेस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तेथे त्यांनी ‘सम आस्पेक्ट्स ऑफ जिओस्ट्रॉफिक पोलवर्ड सेन्सिबल हीट’ आणि ‘द कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटमॉस्फिअर’ असे दोन महत्त्वाचे अहवाल प्रकाशित केले. त्यांनी कॅलिफोर्नियाच्या लॉस अँजेलिस विद्यापीठातून हवामानशास्त्रातील एम.एस्सी. आणि पीएच.डी. पदव्या संपादन केल्यात. कालांतराने भारतात परतून त्यांनी १९५९ मध्ये कुलाबा आणि अलिबाग येथील चुंबकीय वेधशाळेचे संचालक म्हणून काम पाहिले. नंतर पुण्याच्या उष्णकटीबंधीय हवामान विभागाचे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटीओराजी) संस्थापक संचालकपदी ते विराजमान झाले (१९६२—६७). निवृत्त झाल्यावर त्यांना विक्रम साराभाई यांनी अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये (पीआरएल) ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. साराभाई यांच्या प्रेरणेमुळे त्यांनी भारतातील दूरस्थ संवेदन क्षेत्राचा पाया घातला. मानवनिर्मित उपग्रहांच्या मदतीने दूरस्थ संवेदन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.

पिशारोटी वर्ल्ड मिटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनचे सुरुवातीला वैज्ञानिक सल्लागार समिती सदस्य आणि नंतर अध्यक्षही होते (१९६३—६८). नारळाच्या झाडाला होणारा ‘विल्ट रूट’ रोग त्यांनी रशियन विमाने आणि अमेरिकन संसाधने वापरून शोधला (१९६०). तो भारतात किती पसरला आहे याचेही निरीक्षण केले. नारळाची रोगट झाडे, फळे मानवनिर्मित उपग्रहांच्या मदतीने, विशेषतः अवरक्त (इन्फ्रारेड) किरणांच्या मदतीने केलेल्या चित्रणात निरोगी नारळ झाडांपेक्षा सहज वेगळी ओळखू येत होती. अर्थात हे सारे कळण्यासाठी तशी बौद्धिक क्षमता, दृष्टिकोन आणि संगणकाला योग्य ते आज्ञावली संच लिहून प्रतिमांमधील फरक वर्धित करण्याची गरज होती. कालांतराने दूरस्थ संवेदनांचा उपयोग जलशास्त्र, हवामानशास्त्र, पारिस्थितीकी, समुद्रशास्त्र, भूगर्भशास्त्र अशा पृथ्वीविज्ञानाच्या विविध दालनांत होऊ लागला. त्यातून संरक्षण, व्यापार, गुप्त माहिती मिळविणे, अर्थप्राप्ती, शहरी वस्तीचे आणि रहदारीचे नियोजन, दूरस्थ शिक्षण, आरोग्यसेवा आणि या सर्वांतून मानवकल्याण साध्य होऊ लागले.

पिशारोटी इस्रोच्या अहमदाबादमधील स्पेस ॲप्लिकेशन (SAC) सेंटरचे संचालक म्हणून कार्यरत होते (१९७२—७५). याच कालखंडात ते इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मिटिरिऑलॉजी अँड ॲटमॉस्फेरिक रिसर्चच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळत होते. ग्लोबल ॲटमॉस्फेएरिक रिसर्च प्रोग्रॅमच्या संयुक्त संघटन समितीचे ते सदस्य होते (१९६९—७७). त्यांचे शंभराहून जास्त शोधनिबंध विविध प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. मौसम नियतकालिकाचे ते संपादक होते. त्यांनी सी. व्ही. रामन, सॅटलाईट स्टोरी, मिटिरिऑलॉजी फॉर फार्मर्स, मल्याळम भाषेतील क्लायमेट ऑफ केरळा आणि ट्रॉपिकल सायक्लोन इ. पुस्तके लिहिली. त्यांना इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व, भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे सदस्यत्व, केरळ राज्य सरकारचा पोन्नाडा पुरस्कार, पहिले सी. व्ही. रामन शताब्दी पदक, वर्ल्ड मिटिरिऑलॉजीकल ऑर्गनायझेशनतर्फे इंटरनॅशनल मिटिरिऑलॉजीकल ऑर्गनायझेशन सुवर्ण पदक, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे के. आर. रामनाथन पदक इत्यादींनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

पिशारोटी यांनी भारतीय हवामानशास्त्रात संख्यात्मक परिमाणाला महत्त्व दिले. त्याचा परिणाम म्हणून हवामान विषयक अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन अंदाज बरेच अचूक येऊ लागले. भारतातील पावसाची तपशीलवार माहिती त्यांच्या एवढी अन्य कोणासही नव्हती. ते उत्कृष्ट वक्ता होते. त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.

पिशारोटी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंगद्वारे पिशारोटी मेमोरियल ॲवार्ड प्रदान करण्यात येतो.

कळीचे शब्द : #दूरस्थ संवेदन जनक

संदर्भ :

  • https://timesofindia.indiatimes.com/city/pune/meteorologist-pisharoty-dead/articleshow/23300580.cms
  • https://ksc.kerala.gov.in/speaker/dr-pr-pisharoty/
  • https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/p-r-pisharoty-remote-sensing-960017-2017-02-10

 समीक्षक : रंजन केळकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.