प्रस्तावना : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्यसेवा क्षेत्र झपाट्याने रूपांतरित होत आहे. रुग्णसेवेची गुणवत्ता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी अंकीय (digital) साधने, माहिती प्रणाली आणि सामग्री-आधारित (data-based) निर्णयप्रक्रिया यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या बदलत्या आरोग्यव्यवस्थेत परिचर्या क्षेत्राची भूमिका केवळ प्रत्यक्ष रुग्णसेवेपुरती मर्यादित न राहता माहितीचे नियोजन, व्यवस्थापन आणि प्रभावी वापर यांपर्यंत विस्तारली आहे. याच पार्श्वभूमीवर परिचर्या माहितीशास्त्र (Nursing Informatics) ही एक स्वतंत्र, प्रगत आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची विशेष शाखा म्हणून विकसित झाली आहे.

परिचर्या माहितीशास्त्र तज्ज्ञ हा परिचर्या विज्ञान, माहिती विज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारा व्यावसायिक तज्ञ असतो.  तो आरोग्यसेवेमधील माहिती प्रणाली अधिक उपयुक्त, सुरक्षित व रुग्णकेंद्रित बनवण्याचे कार्य करतो. इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी, नैदानिक निर्णय साहाय्य प्रणाली, आधार सामग्री विश्लेषण आणि अंकीय आरोग्य धोरणे यांचा प्रभावी वापर करून रुग्णसेवेतील चुका कमी करणे, वेळेची बचत करणे आणि पुरावा-आधारित परिचर्या सरावास चालना देणे हे या भूमिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

जागतिक स्तरावर तसेच भारतात अंकीय आरोग्य उपक्रमांच्या वाढत्या अंमलबजावणीमुळे परिचर्या माहितीशास्त्र तज्ज्ञाची गरज अधिक ठळकपणे समोर येत आहे. त्यामुळे ही भूमिका आधुनिक आरोग्यसेवेतील एक अपरिहार्य दुवा ठरली असून परिचर्या व्यवसायाला तांत्रिक व शास्त्रीय अधिष्ठान देणारी महत्त्वाची शाखा म्हणून तिचे स्थान दृढ झाले आहे.

व्याख्या : माहितीशास्त्र परिचारिका (Informatics Nurse) ही एक अशी नोंदणीकृत परिचारिका असते, जी परिचर्या विज्ञानाचा (Nursing Science) माहिती विज्ञान (Information Science) आणि संगणक विज्ञानाशी (Computer Science) मेळ घालून आरोग्यसेवेतील माहितीचे व्यवस्थापन आणि संवाद सुधारण्याचे कार्य करते. ही एक प्रगत व्यावसायिक भूमिका असून, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवेची गुणवत्ता आणि सुरक्षा वाढवली जाते.

पार्श्वभूमी आणि उगम : २०व्या शतकाच्या उत्तरार्धात आरोग्य क्षेत्रात संगणकांचा वापर वाढू लागल्याने या भूमिकेची गरज निर्माण झाली. १९९२ मध्ये ‘अमेरिकी परिचारिका संघटने’ने (ANA) परिचर्या माहितीशास्त्राला एक स्वतंत्र विशेष शाखा म्हणून मान्यता दिली. भारतात ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ (ABDM) मुळे या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

परिचर्या माहितीशास्त्र आरोग्यसेवेत तज्ञांच्या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे रुग्णसेवेला मूल्य मिळते. माहितीशास्त्र परिचारिकेच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत :

  • आर्थिक आणि निदानीय (clinical) सामग्रीचे परीक्षण करणे.
  • पुरावा-आधारित (evidence-based) आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यास प्रोत्साहन देणे.
  • परिचर्याविषयक माहिती मानकीकृत (standardized) भाषेत सादर करणे.
  • रुग्णसेवेतील सातत्य (continuity of care) वाढवणे.
  • आवश्यक माहिती व संदर्भ (resources & references) शोधणे, सोपे करणे आणि त्यासाठी मदत करणे.
  • वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्ण यांच्यातील संवाद व संबंध मजबूत करणे.
  • खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आणि उत्पादकता वाढवणे.
  • निदानीय कार्यप्रवाह (clinical workflow) सुधारित/पुनर्रचना करणे.
  • व्यवस्थापनातील बदलाला (management of change) साहाय्य करणे.
  • परिचर्येमधील कामाच्या प्रक्रियांचे जतन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • बहुविद्याशाखीय (multidisciplinary) उपचार पद्धतींना प्रोत्साहन देणे.

प्रमुख जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्र : परिचर्या माहितीशास्त्र तज्ज्ञांचे कार्य केवळ संगणक चालवणे नसून, आरोग्य प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे हे असते. त्यांची प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत :

  • प्रणालीची रचना आणि अंमलबजावणी : रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी (EHR- Electronic Health Record), तज्ज्ञांच्या आदेशान्वये संगणकीकृत केलेल्या नोंदी (CPOE- Computerized Physician Order Entry ) आणि निदानीय निर्णय साहाय्य प्रणाली (CDSS- Clinical Decision Support System) यांची रचना करणे आणि त्या प्रत्यक्ष वापरात आणणे.
  • मध्यस्थ भूमिका : माहिती तंत्रज्ञान (IT) विभाग आणि नैदानिक कर्मचारी (Clinical Staff) यांच्यातील दुवा म्हणून काम करणे. तांत्रिक गरजा परिचारिकांना समजतील अशा भाषेत सांगणे आणि परिचारिकांच्या अडचणी तंत्रज्ञांपर्यंत पोहोचवणे.
  • प्रशिक्षण आणि शिक्षण : नवीन कार्यक्रमसामग्री (software) आणि तंत्रज्ञानाबाबत परिचर्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे.
  • माहिती  विश्लेषण : रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण करून संसर्ग दर, औषधांमधील त्रुटी आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी (Length of Stay) यांसारख्या बाबींवर अहवाल तयार करणे.
  • धोरण निर्मिती : आरोग्य माहितीची गोपनीयता (Data Privacy) आणि सुरक्षिततेबाबत धोरणे आखणे.

आवश्यक पात्रता आणि कौशल्ये : या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता बी. एस्सी. परिचर्या (B.Sc. Nursing) असून, त्यानंतर एम. एस्सी. परिचर्या (माहितीशास्त्र) किंवा आरोग्य माहितीशास्त्रातील (health informatics) पदव्युत्तर पदविका (PG Diploma) असणे आवश्यक ठरते.

 महत्त्वाची कौशल्ये :

  • तांत्रिक नैपुण्य : सामग्रीआधारित व्यवस्थापन, आरोग्य माहिती मानके (उदा. HL7, ICD-10) आणि जालक (network) सुरक्षा.
  • विश्लेषणात्मक विचार : क्लिष्ट सामग्री समजून घेऊन त्यातून रुग्णसेवेसाठी उपयुक्त निष्कर्ष काढणे.
  • संवाद कौशल्य : आंतरशाखीय पथकासोबत (Interdisciplinary Team) समन्वय साधण्याची क्षमता.

 माहितीशास्त्र परिचर्येचे महत्त्व (Clinical Impact) :

  • त्रुटींचे निवारण : औषधोपचारांमधील मानवी चुका कमी होतात.
  • वेळेची बचत : कागदी नोंदींच्या तुलनेत अंकीय नोंदींमुळे वेळ वाचतो, जो वेळ प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी वापरता येतो.
  • पुरावा-आधारित सराव (EBP): उपलब्ध सामग्रीच्या आधारे परिचर्या निदानात (Nursing Diagnosis) अचूकता येते.

 नैतिक आणि कायदेशीर पैलू : माहितीशास्त्र तज्ज्ञाला रुग्णाच्या माहितीची गोपनीयता (Patient Confidentiality) राखणे अनिवार्य असते. भारतात ‘अंकीय वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा’ (DPDP Act) आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे या भूमिकेत अत्यंत महत्त्वाचे आहे.

भविष्यातील संधी : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), दूर-परिचर्या (tele-nursing) आणि परिधान करण्यायोग्य आरोग्य उपकरणे (Wearable Health Devices) यांच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात प्रत्येक मोठ्या रुग्णालयात आणि सार्वजनिक आरोग्य विभागात ‘परिचर्या माहितीशास्त्र तज्ज्ञाची’ भूमिका अनिवार्य ठरणार आहे.

निष्कर्ष : आजच्या अंकीय आरोग्य व्यवस्थेत परिचर्या माहितीशास्त्र ही अत्यंत महत्त्वाची शाखा बनली आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून रुग्णसेवेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यात या क्षेत्राचा मोठा वाटा आहे.

संदर्भ :

  • American Nurses Association, Nursing Informatics: Scope and Standards of Practice, 3rd Ed, 2022
  • McGonigle, D.; Mastrian, K. Nursing Informatics and the Foundation of Knowledge, 2022.
  • National Health Authority (India). Ayushman Bharat Digital Mission Guidelines.
  • Saba, V. K.; McCormick, K. A. Essentials of Nursing Informatics, 2021.
  • Sethi, Deepak; Kaur, Sukhabir, Nursing Informatics and Technology, Mumbai, 2023.

समीक्षक : गावंजे, मनिषा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.