प्रस्तावना : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक व माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्यसेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले. एकविसाव्या शतकात या परिवर्तनाची अधिक विकसित आणि प्रभावी अवस्था म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. परिचर्या व्यवसाय हा रुग्णकेंद्रित, ज्ञानाधिष्ठित व चिकित्सक निर्णयक्षमतेवर आधारित असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग या क्षेत्रात विशेष महत्त्वाचा ठरतो. आज निदानातील अचूकता, रुग्णसुरक्षा, सेवांची गुणवत्ता, कार्यक्षमता व संशोधन या सर्व बाबीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालींचा प्रभाव वाढताना दिसून येतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याख्या (परिचर्या संदर्भात) : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशा संगणकीय प्रणाली व तंत्रज्ञान जे मानवी बुद्धिप्रमाणे विचार करणे, शिकणे, विश्लेषण करणे आणि निर्णय घेणे यांसारखी कार्ये करण्यास सक्षम असतात. यामध्ये माहितीचे सूक्ष्म विश्लेषण, नमुना ओळख, तर्काधिष्ठित निर्णयप्रक्रिया, अनुभवातून शिकण्याची क्षमता तसेच भाषिक माहितीचे आकलन यांचा समावेश होतो.

परिचर्या क्षेत्रात रुग्णांशी संबंधित विस्तृत नैदानिक आणि परिचर्या माहितीचे विश्लेषण करून परिचारिकांना योग्य, वेळेवर आणि सुरक्षित सेवा निर्णय घेण्यास मदत करणाऱ्या बुद्धिमान प्रणालींना परिचर्येतील कृत्रिम बुद्धिमत्ता असे संबोधले जाते.

परिचर्या क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेची ऐतिहासिक वाटचालइ.स. २०१० नंतर आरोग्यसेवेत रुग्णांच्या अंकिय (digital) स्वरूपातील आरोग्य नोंदींचा व्यापक वापर सुरू झाला. पुढील टप्प्यात माहितीच्या प्रचंड साठ्याचे विश्लेषण व स्वयंचलित शिकणाऱ्या प्रणालींच्या विकासामुळे निर्णय-साहाय्यक तंत्रज्ञानाची निर्मिती झाली. इ.स. २०२० नंतर जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्ण निरीक्षण, संसर्ग नियंत्रण, सेवा नियोजन व दूरस्थ आरोग्यसेवा यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. या काळात परिचर्या व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ साहाय्यक साधन न राहता एक महत्त्वपूर्ण तांत्रिक आधारस्तंभ बनली .

परिचर्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता

परिचर्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता :

  • नैदानिक परिचर्या : रुग्णाच्या जीवनावश्यक चिन्हांचे सातत्याने निरीक्षण करून संभाव्य धोके पूर्वसूचना स्वरूपात ओळखता येतात. गंभीर संसर्ग, हृदयविकार किंवा श्वसन निकामी होण्यासारख्या अवस्थांबाबत पूर्वसूचक संकेत मिळू शकतात तसेच औषधोपचारातील त्रुटी कमी करण्यास मदत होते.
  • परिचर्या निर्णय-साहाय्य प्रणाली : परिचर्या निदान, उपचारात्मक हस्तक्षेप व अपेक्षित परिणाम यांचे शास्त्रीय विश्लेषण करून पुराव्यावर आधारित परिचर्या पद्धतींचा अवलंब अधिक सुलभ होतो.
  • रुग्णसुरक्षा व गुणवत्ता वृद्धी : रुग्ण पडणे, दाबजखमा (pressure ulcer), रुग्णालयीन संसर्ग यांसारख्या धोक्यांची पूर्वओळख करून सुरक्षित सेवा प्रदान करणे शक्य होते. तसेच सेवा गुणवत्तेचे मापन व मूल्यमापन अधिक परिणामकारकपणे करता येते.
  • प्रशासकीय व व्यवस्थापकीय परिचर्या : परिचारिकांचे कामाचे नियोजन, कार्यभाराचे संतुलन, खाट व्यवस्थापन, रुग्ण प्रवाह नियंत्रण व साधनसामग्रीचे योग्य नियोजन अधिक कार्यक्षमतेने करता येते.
  • परिचर्या शिक्षण व प्रशिक्षण : काल्पनिक परिस्थितींवर आधारित प्रशिक्षण, आभासी रुग्ण संकल्पना व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार शिकण्याच्या पद्धती विकसित करता येतात.
  • परिचर्या संशोधन : मोठ्या प्रमाणावरील संशोधन माहितीचे अचूक वर्गीकरण, विश्लेषण व निष्कर्षनिर्मिती सुलभ होते. त्यामुळे (होऊन) परिणामाधिष्ठित संशोधनाला चालना मिळते.

व्यावसायिक परिणाम :

  • कामाचा ताण कमी होतो.
  • परिचारिकांचे प्रशासकीय काम कमी होते.
  • अचूकता वाढते.
  • आजाराविषयी निदान आणि उपचार यांमध्ये चुका कमी होतात.
  • वेळेची बचत होते.
  • परिचारिकेला रुग्णांसोबत अधिक वेळ घालवता येतो.
  • रुग्णसेवा सुधारते.
  • रुग्णाला वैयक्तिक शुश्रूषा (Personalized care) देणे शक्य होते.
  • नवीन कौशल्ये विकसित होण्यास साहाय्य होते.
  • परिचारिकांना तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य मिळते.

नैतिक, व्यावसायिक सामाजिक बाबी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना रुग्णांची गोपनीयता, माहितीची सुरक्षितता, मानवी संवेदनशीलतेचे जतन व परिचारिकांची व्यावसायिक स्वायत्तता अबाधित राखणे अत्यंत आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही परिचारिकेचा पर्याय नसून तिच्या निर्णयक्षमतेस (विवेकबुद्धीस) पूरक ठरणारे साधन आहे, ही भूमिका केंद्रस्थानी असली पाहिजे.

निष्कर्ष : कृत्रिम बुद्धिमत्ता ही परिचर्या व्यवसायातील एक क्रांतिकारी तांत्रिक प्रगती आहे. तिच्या साहाय्याने परिचर्येची गुणवत्ता, सुरक्षितता व कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढविता येते. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची समज असलेल्या परिचारिका घडविणे ही काळाची गरज असून परिचर्या शिक्षण, सेवा  आणि संशोधन या सर्व क्षेत्रांत तिचा संतुलित, नैतिक व मानवकेंद्रित वापर आवश्यक आहे.

सारांशपरिचर्या क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक आरोग्यसेवेचा एक महत्त्वपूर्ण घटक बनत असून ती परिचारिकांच्या निर्णयक्षमतेस पूरक ठरून रुग्णसेवेची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

संदर्भ :

  • Bodur, G. Artificial intelligence in nursing practice: A qualitative study of nurses’ perspectives, 2025.
  • Hu, M. Artificial intelligence in nursing decision-making: Current trends and future implications, et al. 2025.
  • Nashwan, A. J.; Abujaber, A. A. Embracing artificial intelligence in nursing education: Preparing future nurses, 2024.
  • Wei, Q. The integration of artificial intelligence in nursing : Addressing current applications and challenges, et al. 2025.

समीक्षक : गावंजे, मनिषा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.