कन्नमवार, मारोतराव (Kannamwar, Marotrao) : (१० जानेवारी १९०० – २४ नोव्हेंबर १९६३). महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री व एक स्वातंत्र्य सेनानी. त्यांचा जन्म
विदर्भातील चांदा (चंद्रपूर) येथे सांबशिवपंत व गंगाबाई या दांपत्यापोटी झाला. कन्नमवार घराणे हे मुळचे म्हैसूर प्रांतातील असावे; कारण ज्यावेळी शिवसागर धरण बांधले गेले, त्यावेळी कन्नमवाडी हे गाव धरणात गेले व तेथील काही लोकमहाराष्ट्रातीलनागपूर व चंद्रपूर या परिसरांत येऊन स्थायिक झाल्याचे निर्देश सापडतात. यातीलच कन्नमवार हे एक घराणे होय.
मारोतराव यांचे प्राथमिक शिक्षण घराजवळच्या प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण गव्हर्नमेंट जुबिली हायस्कूल मधून झाले. त्यांना लहानपणापासून क्रिकेट व हॉकी या खेळांची विशेष आवड होती. मारोतराव दहावीचे शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक चंद्रपूरला आले होते. लोकमान्य टिळक यांच्या गोला बाजार (टिळक मैदान) लगतच्या मैदानावरील भाषणाचा मारोतराव यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांचे अभ्यासावरील लक्ष उडाले त्यानंतर त्यांनी देशसेवेच्या कार्यास स्वत:ला वाहून घेण्याचे ठरविले. लोकमान्य टिळकांना ते स्वत:चे राजकीय गुरू मानत. या काळात ते घरी कमी व वाचनालयात जास्त वेळ घालवू लागले. यावर तोडगा म्हणून सांबशिवपंतांनी मारोतराव यांचा वयाच्या अठराव्या वर्षी गोपिकाबाईंशी हिंगणघाट येथे विवाह लावून दिला. मारोतरावांना सर्वजण दादा म्हणत.
मारोतराव हे आधीपासूनच नोकरीच्या बंधनात अडकून पडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला कापूस खरेदी विक्रीचा स्वतंत्र उद्योग सुरू केला. नंतर लोकमान्य या दैनिकासोबत स्वराज्य, तिलक, वंदेमातरम्, यंग इंडिया, मराठी नवजीवन, महाराष्ट्र आणि सुदर्शन या पत्रकांची एजन्सी चालविणे; गावच्या आठवडी बाजारात राजकीय पुढार्यांची चित्रे विकणे; धान्य व किराणा दुकान चालविणे इत्यादी व्यवसाय त्यांनी केला; परंतु त्यांना ते जमले नाही. शेवटी त्यांनी चांदा डिस्ट्रिक्ट कौंसिलमध्ये रेकॉर्ड किपरची (लिपिक) नोकरी पत्करली. एकीकडे नोकरी व दुसरीकडे देशसेवा असा त्यांनी दैनिक उपक्रम सुरू केला. १ ऑगस्ट १९३७ रोजी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वाचकांसाठी जिल्ह्याचे पहिले मुद्रित लोकसेवक हे वृत्तपत्र सुरू केले; मात्र याचे ते संपादक नव्हे, तर सूत्रसंचालक होते. टिळकांच्या मृत्यूनंतर मारोतराव यांच्यावर गांधीजींच्या कार्याचा प्रभाव पडला. त्या वेळी त्यांनी अनेक चळवळी, आंदोलने, सत्याग्रह यांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना इंग्रजांनी अनेकदा अटक केली होती. अटकेवेळी ते चंद्रपूर तालुका काँग्रेस समितीचे सचिव होते.
मारोतराव हे चंद्रपूरच्या राजकारणात पारंगत झाले होते. त्यांनी आपल्या सहकार्यांसह ‘गांधी सेवा मंडळा’ची स्थापना केली. त्यामार्फत त्यांनी विधायक कार्यास सुरुवात केली. त्यामुळे इ. स. १९३८ मध्ये ते नागपूर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व नंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य झाले. त्या वेळी अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता असा त्यांचा लौकिक थेट गांधीजींपर्यंत पोहचला. त्यांच्या कार्याकडे बघता १९५२ मध्ये काँग्रेसनी त्यांना मुळसावली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली व ते निवडून आले. त्यांच्याकडे मध्य प्रदेशाचे आरोग्यमंत्री पद देण्यात येऊन १९६० पर्यंत ते या पदावर होते. त्यांच्या आठ वर्षांच्या आरोग्यमंत्र्याच्या काळात त्यांनी दवाखाण्यात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहिरी; पुरेशा पलंगांची सोय; निर्मुलन केंद्रे; क्षयरोग नियंत्रण केंद्रांची वाढ; स्वच्छता मोहिम; क्षयरोग निवारण सप्ताह; अनेक ठिकाणी नवीन दवाखाण्याची निर्मिती असे अनेक समाजहितोपयोगी कार्ये केली. त्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन महाराष्ट्र राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात मारोतराव यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री, दळणवळण व बांधकाममंत्रीही पदे सोपविण्यात आली. या कार्यकाळात त्यांनी उमरेड-बारखेडी आणि उमरेड-लोहार रेल्वेमार्ग, वैनगंगा नदीवर चंद्रपूर-सिरांचा या दोन शहरांना जोडण्यासाठी आष्टी येथे १,७२५ फुट लांबीचा पूल अशी अनेक कामे केली.
राज्यात १९६२ मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. यामध्ये मारोतराव पुन्हा विजयी झाले. या वेळीसुद्धा त्यांच्याकडे पूर्वीचीच खाती सोपविण्यात आली. याचवर्षी चीनने पूर्व सूचना न देता भारतावर आक्रमण केले. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्राच्या ठिकाणी बोलावून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली. यशवंतराव चव्हाण हे दिल्लीस जाण्यापूर्वी राज्याची धुरा मारोतराव यांच्या खांद्यावर सोपविली आणि २० नोव्हेंबर १९६२ रोजी मारोतराव हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. चीनच्या भारतावरील आक्रमणामुळे देशाची तद्वतच राज्याची परिस्थिती खोळंबली होती; परंतु मारोतराव यांनी या परिस्थितीशी सामना करण्याचे ठरवून राष्ट्रीय संरक्षणाकरिता राज्यभर दौरे केले. त्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कोट्यावधी रुपयांचा निधी व सोने गोळा करून ते केंद्रात पाठविले. तसेच आसाम राज्याला नगर सैनिक संघटना निर्माण करण्यास मदत; राज्याच्या नगर सैनिक संघटनेत वाढ; एन. सी. सी. रायफल कंपन्या व बटालियन्स उभारणे; सशस्त्र दलात भरती होणार्यांसाठी आहार केंद्रांची निर्मिती; जवानांच्या कुटुंबियांना अनेक सवलती; भंडारा-भद्रावती येथे संरक्षण साहित्य उत्पादन प्रकल्प अशी अनेक महत्त्वाची कार्ये त्यांनी केली.
मारोतराव यांनी आणिबाणीच्या काळात शेतकी उत्पादनास प्राधान्य देऊन शेतकर्यांच्या हितोपयोगी योजना जाहीर केल्या. त्यांनी कापसाला योग्य दर मिळावा,यासाठी ‘कापूस एकाधिकार खरेदी योजना’ सुरू केली. कृष्णा-गोदावरीच्या पाणी वाटपाचा प्रश्न महाराष्ट्र व भारत सरकारच्या निदर्शनास आणून दिला. ओझर येथील मिग कारखान्यात प्रशिक्षित कामगार असावे, यासाठी ऑगस्ट १९६३ मध्ये ‘कामगार तांत्रिक प्रशिक्षण केंद्र’ नासिक येथे स्थापन केले. त्याचबरोबर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगलाला प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आणि सिंदखेड राजा येथे कस्तुरबा उद्यान तसेच जिजामाता स्मारकाची निर्मिती करून त्या ठिकाणांना प्रेक्षणीय स्थळांचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला १ मार्च १९६३ रोजी मान्यता दिली.
मारोतराव हे उच्च शिक्षित नसले, तरी त्यांना वाचन-लेखनाची फार आवड होती. शिक्षणप्रसाराचा वाढता व्याप लक्षात घेऊन त्यांनी हजारो प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका केल्या. त्यांची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केली. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष घालून ‘कस्तुरबा विद्यालय’ व राहण्यासाठी वसतिगृहाची निर्मिती करून अनेक संस्था उभारल्या.
मारोतराव यांनी गांधी गीतांजली (१९४०), भारताचा थोर भिक्षेकरी महात्मा गांधी (१९५८), विनोदप्रिय गांधीजी, स्वच्छताप्रिय गांधी आणि काटकसरी गांधी; स्त्रियांचे गांधी (१९६३), राजमाता जिजाबाई (१९६३) इत्यादी पुस्तके लिहिली.
मारोतराव यांच्याबद्दल मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी “ कन्नमवार हे उच्चपातळीवर विचार करणारे, गटबाजीपासून अलिप्त राहणारे व व्यक्तीनिष्ठ राजकारणापासून दूर असणारे असून दूरदर्शी व सामर्थ्यशील राजकीय नेतृत्त्व त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभले आहे” असे गौरवोद्गार काढले आहे.
मारोतराव ऊर्फ दादासाहेब हे मुख्यमंत्री पदावर असताना मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- मेहेंदळे विश्वास, यशवंतराव ते पृथ्वीराज चव्हाण, पुणे, २०१२.
- वासाडे, प्रभा, लोकनेते कन्नमवार, चंद्रपूर, १९९९.
समीक्षक : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.