पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया या देशातील एक ढाल ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीतून भूपृष्ठावर आलेला बेसाल्टासारखा सुवाही लाव्हा जागच्या जागी साचून न
राहता बऱ्याच विस्तृत प्रमाणात पसरतो; लाव्ह्याचे असे थर एकावर एक साचत जाऊन त्यांच्यामुळे अत्यंत कमी उताराचे पालथ्या ढालीसारखे विस्तीर्ण घुमट तयार होतात, त्यांना ढाल ज्वालामुखी म्हणतात. हेली गुब्बी ज्वालामुखी पर्वताची सस. पासून उंची सुमारे ५०० मी. आहे. पूर्व आफ्रिकेतील प्रसिद्ध खचदरीच्या जवळ, पूर्व इथिओपियातील अफार प्रदेशात असलेल्या एर्ता आले पर्वतरांगेच्या दक्षिण टोकावर हा ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी १३° ३०′ ३६″ उत्तर अक्षांशावर आणि ४०° ४२′ ५९″ पू. रेखांशावर स्थित आहे. हा प्रदेश जो निमस्तरावर असलेला खचदरी प्रदेश आहे. मिठाची सपाट मैदाने, लाव्हा क्षेत्रे आणि खोल भेगा या वैशिष्ट्यांनी युक्त असा हा प्रदेश आहे. हा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण तो समुद्रसपाटीखाली स्थित असून थेट पातळ होत गेलेल्या खंडीय शिलावरणाच्या वर आहे. तांबडा समुद्र आणि एर्ता आले पर्वत यांच्याजवळ असल्यामुळे या प्रदेशात वारंवार भूभ्रंशमूलक हालचाली आणि भूऔष्णिक क्रिया घडून येतात.
एर्ता आले हा इथिओपियातील अतिशय जागृत ज्वालामुखी असून तेथपासून साधारण आग्नेयीस १५ किमी. वर हेली गुब्बी ज्वालामुखी आहे. पूर्व आफ्रिकन खचदरीलगतचा प्रदेश असल्यामुळे एर्ता आले पर्वतरांगेत ज्वालामुखींची मालिकाच आढळते; कारण येथे अरेबियन, न्यूबियन व सोमाली हे भूपट्ट एकत्र आले असून त्यांचे एकमेकांपासून अपसारण होत असते. एर्ता आलेचा सर्वांत अलीकडील उद्रेक जुलै २०२५ मध्ये झाला होता. भूशास्त्रज्ञांनी भूगर्भातील शिलारसाच्या हालचालीचा वेध घेतला असता असे आढळले की, शिलारस एर्ता आले ज्वालामुखीपासून भूकवचाच्या खालून दक्षिणेस हेली गुब्बीपर्यंत व तेथून तसाच पुढे वाहत गेलेला आहे. त्यामुळे जुलै २०२५ च्या अखेरीस हेली गुब्बीच्या ज्वालामुखी कुंडातून अल्प प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड व पांढऱ्या रंगाच्या ढगांचे उत्सर्जन झाले, तसेच तेथील जमीन काही सेंटीमीटरने वर आलेली दिसली. या ज्वालामुखी पर्वताचे उतार अनेक भेगांमुळे व लाव्हाशंकूंमुळे खंडित झालेले आहेत. या ज्वालामुखी शिखरावर ग्रॅबेन आढळतात. ग्रॅबेन म्हणजे जमिनीच्या दोन समांतर पट्ट्यांदरम्यान आढळणारा खंदकासारखा खळगा (अवनमन किंवा खचदरी). ज्वालामुखी खडकातील लाव्हाशंकू ग्रॅबेनच्या केंद्रभागी स्थित असून तेथील २०० मी. रुंदीच्या ज्वालामुखी कुंडातून आणि निर्गम द्वारातून वाफ आणि वायू बाहेर टाकले जातात. हेली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकाबद्दल फारच अल्प माहिती उपलब्ध आहे.
हेली गुब्बी ज्वालामुखीचा पहिला नोंदणीकृत प्रमुख स्फोटक उद्रेक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला, त्यापूर्वीची या ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रत्यक्ष नोंद नाही. कदाचित ज्या प्रदेशात या ज्वालामुखीचे स्थान आहे, तो प्रदेश एकाकी असल्यामुळे या ज्वालामुखीची कोणतीही नोंद झालेली आढळत नाही. यापूर्वी या ज्वालामुखीचा उद्रेक कधी झाला असावा, याबद्दल भूशास्त्रज्ञांना निश्चित सांगता येत नसले, तरी तज्ञांच्या मते हा उद्रेक सुमारे १२,००० हजार वर्षांनंतर झालेला आहे. प्लाइस्टोसीन या हिमकालाच्या अखेरीपासून हा ज्वालामुखी निद्रिस्तावस्थेत होता. सन १९६९-७० मधील अभ्यासावरून असे लक्षात आले की, हेली गुब्बी शिखराच्या दक्षिण फाट्यावर लाव्हारसाच्या संचयनापासून निर्माण झालेले खडक आढळले असून त्यांची निर्मिती सुमारे ८,२०० वर्षांपूर्वी झाली असावी. यावरून भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या ज्वालामुखीचा उद्रेक आजपासून सुमारे ८,२५० वर्षांपूर्वी झालेला असावा. याचा अर्थ नोव्हेंबर २०२५ पूर्वी या ज्वालामुखीचा उद्रेक कधी झाला याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता दिसत नाही.
दक्षिण फ्रान्समधील तुलूझ शहरात वातावरणातील ज्वालामुखीय राखेचा हवाई वाहतुकीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाची माहिती देण्याचे कार्य करणारी ‘व्होल्कॅनिक अॅश अॅडव्हायजरी सेंटर’ (व्हीएएसी ) ही तज्ज्ञ सदस्यांची संस्था आहे. या संस्थेने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसारित केलेल्या वृत्तात संबोधित केले होते की, हेली गुब्बी येथे स्फोटक ज्वालामुखी उद्रेक चालू आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता (जागतिक समन्वित वेळेनुसार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता) या ज्वालामुखीच्या स्फोटक स्वरूपाच्या उद्रेकास सुरुवात झाली होती. उपग्रहामार्फत मिळलेल्या प्रतिमेनुसार त्यातून बाहेर पडलेल्या राखेचे लोट आकाशात सुमारे १५ किमी. उंचीपर्यंत गेल्याचे आढळले. या राखेच्या ढगामध्ये ज्वालामुखीय राख, सल्फर डाय-ऑक्साइड (SO₂), काचेसारखे सूक्ष्म तुकडे आणि खडकांचे तुकडे यांचे मिश्रण असते. हे घटक वातावरणात सुमारे ४,५०० ते १३,५०० मी. उंचीपर्यंत वाहून नेले जातात. हे वातविलेप (एरोसोल्स – वातावरणात तरंगणारे सूक्ष्म घन कण) तेथील वातप्रणाली आणि वातावरणातील स्थिरतेनुसार काही दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंत वातावरणात टिकून राहू शकतात. राखेचा हा थर तपांबराच्या वरच्या स्तरावर स्थित असल्यामुळे त्याचा जमिनीच्या दिशेने उतार मंद असतो आणि त्यामुळे भूपृष्ठावरील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता कमी असते. वातावरणाच्या वरच्या स्तरावरील पश्चिमी वारे आणि झोत वारा (जेट स्ट्रीम) यांमुळे हेली गुब्बी ज्वालामुखी उद्रेकातील राखेच्या लोटाच्या दोन शाखा होऊन त्या वेगवेगळ्या विक्षेपमार्गांनी गेल्याचे दिसले. त्यांपैकी उंच राखेचा लोट ईशान्येच्या दिशेने, तर दुसरा कमी उंचीचा लोट वायव्येस गेल्याचे आढळले. ताशी सुमारे १०० किमी. वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे उंच राखेचा लोट पूर्वेकडे तांबडा समुद्र, अरबस्तानच्या द्वीपकल्पावरील येमेन आणि ओमान हे देश ओलांडून पुढे भारतीय उपखंड आणि चीनच्या काही भागांपर्यंत वाहत गेल्याचे आढळले. त्याचा परिणाम त्या त्या भागातील हवाई वाहतुकीवर झाला. या उद्रेकामुळे ज्वालामुखीजवळचे संपूर्ण आफदेरा खेडे राखेच्या थरांनी आच्छादले गेले. आफदेरा खेडे हे देनाकील मैदानात जाणाऱ्या पर्यटकांचे मुख्य थांब्याचे ठिकाण आहे. वातावरणात अचानक पसरलेल्या राखेमुळे परिसरात दृश्यता कमी झाली. त्यामुळे पर्यटक व त्यांचे मार्गदर्शक यांना काही काळ त्या खेड्यातच थांबून राहावे लागले.
या ज्वालामुखीचा उद्रेक साधारणपणे उप-प्लिनी प्रकारातील होता. प्लिनी प्रकारातील उद्रेक अत्यंत उग्र स्वरूपाचा व स्फोटक असतो. या प्रकारात वर उसळणारा वायूचा लोट कित्येक किमी. उंच चढून विस्तारतो. त्यामुळे आसपासच्या विस्तृत प्रदेशात राखेचा वर्षाव होतो. हेली गुब्बीच्या उद्रेकामुळे मूळ ज्वालामुखी कुंडाचा आकार वाढला आणि आग्नेय भागात नव्याने दोन ज्वालामुखी कुंडांची निर्मिती झाली. जागतिक समन्वित वेळेनुसार या ज्वालामुखीचा उद्रेक त्या दिवशी २०.०० वाजता थांबल्याचा अंदाज आहे. २५ नोव्हेंबर रोजी केलेल्या प्रत्यक्ष क्षेत्र पाहणीनुसार असा निष्कर्ष काढण्यात आला की, हा उद्रेक भूगर्भातील वाफेच्या स्फोटामुळे झालेला होता. हा ढाल ज्वालामुखी असला, तरी सिलिकायुक्त शिलारसामुळे त्याचा उद्रेक जास्त स्फोटक झाला. हा प्रदेश विरळ लोकवस्तीचा असून तेथे मोजक्याच लहान वस्त्या आढळतात. तेथील लोकांचा उदरनिर्वाह मीठ खाणकाम, पशुपालन व मर्यादित्त स्वरूपात व्यापार इत्यादी उद्योगांवर अवलंबून असतो.
संदर्भ :
- https://science.iirs.gov.in/
- https://science.nasa.gov/
- https://www.scientificamerican.com/
- https://www.thehindu.com/
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.