जानोरीकर, त्र्यंबकराव डी. : (१३ जून १९२१ — २३ नोव्हेंबर २००६). हिंदुस्थानी संगीतातील भेंडीबाजार घराण्याच्या दुर्मीळ खंडमेरू शैलीचे प्रसिद्ध गायक. त्यांचा जन्म गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झाला. त्र्यंबकराव लहान‌ असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजीआजोबांनी पुणे येथे केले. या कुटुंबाला संगीताची आवड होती. त्याचेच संस्कार त्र्यंबकरावांवरही झाले आणि त्यांचा आवाजही चांगला असल्याने लवकरच पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या गांधर्व महाविद्यालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथे १२ वर्षे‌ ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीचे गायन शिकले आणि मेहनतीने या शैलीच्या गायनाचा कसून रियाज केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम, जलतरंग तसेच इतर वाद्येही वाजवायला शिकले.

जानोरीकर यांनी देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक या संस्थेने आयोजित केलेल्या संगीताच्या मासिक मैफलीत भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. शिवकुमार शुक्ला यांचे गायन ऐकले (१९४६). त्या गायनशैलीने ते प्रभावित झाले आणि ही शैली शिकायला मिळावी याकरिता ते प्रयत्न करू लागले. १९४७ मध्ये भेंडीबाजार घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद अमन अली खाँ हे मुंबईहून पुण्यामध्ये राहायला आले. त्यांच्याकडे जानोरीकरांनी शिकवण्याची विनंती केली आणि ते अमन अली खाँ यांचे गंडाबंद शिष्य झाले. ही शिकवणी पुढे पाच वर्षे अमन अली खाँ यांच्या निधनापर्यंत सुरू राहिली (१९५३). त्यानंतरच्या काळात भेंडीबाजार घराण्याच्याच प्रख्यात गायिका अंजनीबाई मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना जानोरीकरांनी त्या दोघांच्याही गायकीची वैशिष्ट्ये आत्मसात केली आणि या घराण्याची मूळ गायकी प्रसिद्ध करण्याकरिता प्रयत्न चालू केले. त्यांनी या गायनातील मध्य लय आणि विलंबित लय या शैली आत्मसात केल्या. या शैलींच्या मंचावरील यशस्वी सादरीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले.

जानोरीकर यांनी दिल्ली व मुंबई आकाशवाणीवर अनेक दशके सातत्याने गायनाचे कार्यक्रम केले. ते आकाशवाणीवरील अव्वल दर्जाचे गायक कलाकार होते. त्यांचे कार्यक्रम आकाशवाणी पुणे तसेच ‘नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक’ अंतर्गत दूरदर्शनवरही प्रसारित होत असत. भेंडीबाजार गायकीचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतभर ते कार्यक्रम करीत असत. तसेच विविध संगीत संमेलन व महोत्सवात ते गात असत. १९६० ते ७० च्या दशकात ही वैशिष्ट्यपूर्ण गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रिय केली. भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी प्रात्यक्षिकासह केलेल्या व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते. त्यांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये देवीदेवतांची सुरेख वर्णने आढळतात. संगीत नाटक अकादमी, दिल्ली आणि ओंकारनाथ ठाकूर ट्रस्ट, बनारस यांनी त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रकांचे जतन केलेले आहे.  नोव्हेंबर १९८९ ते जून १९९१ दरम्यान कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत भेंडीबाजार घराण्याचे गुरू म्हणून त्यांनी तरुण कलाकारांना प्रशिक्षित केले.

धीरगंभीर, सुरेल आवाजात मध्य आणि विलंबित लयीत सादरीकरण आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी व भारावून टाकणारी गायनशैली ही जानोरीकर यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होत. खोल, सुरेल आवाजात त्यांनी भेंडीबाजार घराण्याच्या गायकीची वैशिष्ट्ये आणि उस्ताद अमान अली खाँ यांच्या आकर्षक रचना (बंदिश) सादर करण्याची उत्कृष्ट कामगिरी केली. श्रोत्यांना त्यांच्या विस्तृत आलापांमध्ये मधुर सुगम संगीत जाणवत असे. काहीवेळा जोरदार गमक, सरगम गायनामध्ये एक झुलणारी लय, आकर्षक स्वर नमुन्यांसह वेगवान विविध ताना त्यांच्या सादरीकरणात ऐकावयास मिळत असत. परिपक्व गायन, निर्मळपणा, भावपूर्णता, गायनातील जाणवणारा सच्चेपणा आणि मांडणीतील सौंदर्यात्मक शिस्त ही त्यांच्या गायनाची आणखी काही वैशिष्ट्ये म्हणता येतील.

जानोरीकरांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले आहेत. गानवर्धन संस्थेतर्फे सूर-लय-रत्न पुरस्कार (१९८६), महाराष्ट्र सरकारचा प्रतिष्ठेचा सांस्कृतिक पुरस्कार (१९९९), पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते मानपत्र व सन्मान (१९९५), गांधर्व महाविद्यालय,पुणे यांचेकडून पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत शिक्षक गौरव पुरस्कार (२०००), कोलकता आयटीसी संगीत अकादमी पुरस्कार (२००३) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

जानोरीकर यांच्यावर त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीदरम्यान पाच मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. तरीही ते शेवटपर्यंत त्याच ताकदीने गात राहिले. वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले. भेंडीबाजार घराण्याची समृद्ध परंपरा पुढील पिढीकडे सोपवण्यासाठी आणि मैफलीतील गाणे गाण्यासाठी त्यांनी अनेक शिष्य तयार केले होते. साधना जोशी, सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांची कन्या व शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका मानल्या जातात.

संदर्भ :

  • https://swaramandakini.com/information-family-tree.aspx
  • https://archive.org/details/dni.ncaa.SF-SFC000719-AC/SF-SFC000719-AC_SIDE_A.mp3

समीक्षण : उज्ज्वला करमळकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.