एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाजसुधारक संस्था. दादोबा पांडुरंग तर्खडकर तिचे प्रवर्तक होते, तर रामचंद्र बाळकृष्ण जयकर तिचे पहिले आणि अखेरचे अध्यक्ष होते. १८४४ मध्ये सुरत येथे दादोबा पांडुरंग यांनी दुर्गाराम मंछाराम मेहता यांच्या सहकार्याने ‘मानवधर्म सभा’ (१८४४) स्थापन केली, ज्यातून परमहंस सभेचा पाया रोवला गेला. १८४६ मध्ये दादोबा मुंबईला नॉर्मल प्रशालेत बदलून आले. तेथे कार्यरत असताना, सुरतेत सुरू केलेल्या चळवळीची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी संघटना उभारण्यास दादोबांना अनुकूल वातावरण मिळाले. सुरतेतील सहकारी दुर्गाराम मेहता तसेच राम बाळकृष्ण यांसारख्या नव्या कार्यकर्त्यांच्या आणि इतर समविचारी मित्रांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी ‘परमहंस सभा’ स्थापन केली.

परमहंस सभेच्या स्थापनेविषयी विविध मतांतरे आहेत. सभेच्या स्थापनाकाळाचे १८४०, १८४० चे दशक, १८४६ ते १८५२ असे उल्लेख विविध ऐतिहासिक स्त्रोतांमध्ये आहेत. प्रार्थना समाजाचे इतिहासकार द्वा. गो. वैद्य यांनी १८४०, तर ब्राह्मो समाजाचे इतिहासकार शिवनाथ शास्त्री यांनी १८४९ हे सभेचे स्थापना वर्ष नमूद केले आहे. गोविंद नारायण माडगांवकर यांनी आपल्या ‘मुंबईचे वर्णन’ या समकालीन पुस्तकात १८५२ मध्ये सभा स्थापन झाल्याचे म्हटले असले, तरी १ ऑक्टोबर १८५१च्या ‘ज्ञानोदय’मधील संपादकीयात सभेकडून प्रसिद्ध करण्यासाठी आलेल्या पत्रांचा उल्लेख येतो, त्यामुळे ते निर्विवाद मानणे कठीण ठरते. स्कॉटिश धर्मप्रचारक जॉन मरे मिचेल यांनी ‘इन वेस्टर्न इंडिया’ (In Western India, १८९९) या आपल्या आत्मवृत्तात १८४६ मध्ये दादोबांनी परमहंस सभा स्थापन केल्याचे नमूद केले आहे. ज. वि. नाईक आणि अरविंद गणाचारी यांनी विविध पुरावे तपासून परमहंस सभेची स्थापना १८४६ मध्ये झाल्याचा निष्कर्ष मांडला असून तो ग्राह्य धरण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राम बाळकृष्ण यांच्या भेटीनंतर परमहंस सभेची स्थापना झाली, असे प्रार्थना समाजाचा इतिहास लिहिणारे द्वा. गो. वैद्य यांचे अनुमान आहे. मात्र अ. का. प्रियोळकर आणि ज. वि. नाईक यांनी त्या वर्षी राम बाळकृष्ण इंग्रजी शाळेत शिकत असल्याचे निदर्शनास आणून ही भेट १८६० मध्ये राम बाळकृष्ण जेव्हा कलकत्त्याला (कोलकाता) गेले त्या वेळी झाल्याचे सांगत त्याचे साधार खंडन केले आहे. १८४९ मध्ये राम बाळकृष्ण हे सभेचे अध्यक्ष झाल्यानंतर पुढे तिला अधिक औपचारिक रूप प्राप्त झाले.

सभेचे नाव स्वीकारताना दादोबा पांडुरंग यांच्या मनात हंसाच्या नीरक्षीरविवेक या रूपकाची प्रेरणा असावी. विविध धर्मपंथांतील चांगल्या गोष्टी स्वीकारून वाईट गोष्टी नाकारणे, हा सभेच्या कार्याचा गाभा होता. आपल्या ‘धर्मविवेचन’ आणि ‘पारमहंसिक ब्राह्मधर्म’ या ग्रंथांतून त्यांनी जी तत्त्वे मांडली, ती परमहंस सभेच्या सुधारणावादी कार्यक्रमाचा आधार बनली. ब्राह्मधर्माचे प्रतिपादन करणाऱ्या दादोबांच्या लिखाणाच्या हस्तलिखित प्रती नवीन सभासदास वाचण्यासाठी दिल्या जात असत. परमहंस सभेच्या उद्दिष्टांमध्ये जातीप्रथेचे निर्मूलन, मूर्तीपूजेला नकार, एकेश्वरीमताचा पुरस्कार, स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन, अस्पृश्य वर्गांत शिक्षणाचा प्रसार करणे यांचा समावेश होता. शिवाय, विधवाविवाह धर्मशास्त्रसंमत आहे म्हणून शक्य त्या उपायांनी त्याला उत्तेजन देत समाजात रूढ करण्याकडेही सभेचा भर असे.

परमहंस सभेचे कार्य अनेक कारणांमुळे गुप्तपणे चालत असल्याने तिच्या कार्यपद्धतीबाबत अनेक अतिशयोक्तीपूर्ण कथा आणि खोट्या अफवा पसरल्या. सभेचा सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस दीक्षा समारंभातून जावे लागे. या वेळी जातिभेद न पाळण्याची शपथ घेतली जाई; तसेच ख्रिस्ती व्यक्तीने बनवलेल्या पावाचा तुकडा खाणे आणि अध्यक्ष किंवा इतर सभासदांनी उष्टे केलेले दूध पिणे, अशा प्रतीकात्मक कृती कराव्या लागत. या विधींविषयी तत्कालीन समाजात अनेक गैरसमजही रूढ झाले होते. सभेच्या वार्षिक संमेलनांत मुंबई प्रांताच्या विविध भागांतून आलेल्या आणि जातपात न मानणाऱ्या सभासदांसाठी सहभोजने आयोजित केली जात; या सहभोजनांद्वारे परस्परांतील बंधुभाव दृढ करण्याचा प्रयत्न केला जाई. प्रारंभिक काळात असे उपक्रम सनातनी लोकांकडून विरोध होण्याच्या भीतीमुळे अत्यंत गुप्तपणे पार पडत असत; परंतु सभासदसंख्या वाढल्यानंतर सभेने आपली उद्दिष्टे जाहीर करून समाजपरिवर्तनासाठी उघडपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला.

परमहंस सभेच्या बैठकीसाठी ठरावीक जागा नव्हती. सुरुवातीला गिरगाव येथील फणसवाडीच्या दुमेट्याच्या चाळीत बैठका होत. १८५३ साली डॉ. रा. गो. भांडारकर यांना येथेच सभासदत्वाची दीक्षा देण्यात आली. नंतरच्या बैठका पुष्कळदा अध्यक्ष राम बाळकृष्ण किंवा आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या घरी आयोजित केल्या जात. या बैठकांच्या सुरुवातीला आणि शेवटी भास्कर दामोदर लिखित ‘रत्नमाला’ काव्यसंग्रहातील कवितांचे किंवा दादोबांनी रचलेल्या प्रार्थनांचे पठण होई. यासह विविध लेखांची चर्चा, धार्मिक व सामाजिक प्रश्न व सुधारणा यांच्या चर्चा मोकळेपणाने खुल्या वातावरणात होत असत. मात्र, सभेचे प्रमुख प्रवर्तक दादोबा पांडुरंग आणि त्यांचे मित्र भाऊ महाजन हे सर्वसाधारणपणे या बैठकांत प्रत्यक्ष सहभागी होत नसत. ते शेजारच्या खोलीत बसून बैठक संपेपर्यंत थांबत आणि नंतर अध्यक्ष तसेच इतर सभासदांशी भेटून चर्चा करत.

परमहंस सभेचा प्रसार केवळ मुंबई शहरापुरता मर्यादित नव्हता, तर पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, बेळगाव इत्यादी शहरांमध्ये तिचा विस्तार झाला होता; तसेच त्यांचे अनुयायी तेथे सक्रियपणे परमहंसमतांचा प्रचार करत असत. सभेची सदस्यसंख्या सुमारे ५०० ते १००० दरम्यान असावी. तिच्या समर्थकांमध्ये आत्माराम पांडुरंग तर्खडकर, नारायण नवलकर, भाऊ महाजन, बाळ भास्कर शिंत्रे, वासुदेव भिकाजी करमरकर, भिकोबा व सखाराम लक्ष्मण चव्हाण, नारायण रघुनाथ, केशव भवाळकर, शाहू दाजी यांची नावे सांगता येतील. कासम महंमदजी हे सभेच्या अहमदनगर शाखेचे मुस्लीम सदस्य होते, जे पुढे ख्रिस्ती झाले. मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाबा पदमनजी हेही परमहंस मंडळीत सहभागी झाले होते. मात्र, तेथील नास्तिक विचार आणि कोणताही धर्म किंवा शास्त्र ईश्वराने निर्माण केलेले नाही हे तत्त्व मान्य न झाल्यामुळे त्यांनी या संघटनेशी नाते तोडले. मिशनरी शिक्षणाचा प्रभाव, परमहंस सभेसारख्या सुधारणावादी प्रयत्नांबाबतची निराशा, धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदू धर्मातील अंधश्रद्धा तसेच आचार-विचारांतील विसंगती यांमुळे पदमनजी यांनी ख्रिस्ती धर्माला आचारप्रधान व आत्मोद्धाराचा मार्ग मानून धर्मांतर केले. महात्मा जोतीराव फुले यांचे केशव शिवराम भवाळकर तसेच तुकाराम तात्या पडवळ या परमहंस सभेच्या अनुयायांशी घनिष्ठ संबंध होते. जोतीराव या सभेचे सभासद नसले तरी जोतिबांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सभेच्या तत्त्वांशी जुळत होते, असे प्रतिपादन ज. वि. नाईक यांनी केले आहे. तसेच, महात्मा जोतीराव फुले यांनी आपला ‘छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा’ (१८६९) सभेचे अध्यक्ष राम बाळकृष्ण यांना अर्पण केला होता.

ही सभा पुढे १८६० नंतर अनेक कारणांनी मृतप्राय झाली. तत्पूर्वी, साधारण १८५१ नंतर सभेच्या उपक्रमांवर उघडपणे सनातनी वर्गाकडून टीका होऊ लागली होती. रामकृष्ण अनंत जोशी यांनी ‘गजाबा’ टोपणनाव घेऊन ‘परमहंसमतप्रशंसा’ कवितेच्या पुस्तकातून सभेच्या कार्यावर तीव्र नापसंती दर्शवली होती (१८५२). अशा टीकेला प्रभावी प्रत्युत्तर देऊन जनतेसमोर सभेचा बचाव करण्यात सभासद कमी पडले. तसेच, याच्या जोडीला सभासदांच्या नावाची यादी पळवून त्यातील नावे प्रसिद्ध होणे, ही मंडळी ख्रिस्ती होणार असा प्रचार करणे, आपले उपक्रम गुप्त राखण्याविषयी सभासदांतील मतभेद, अशी इतर कारणेही होती. १८६० च्या दशकात मुंबईत उसळलेल्या भांडवली (शेअर) बाजारातील उन्मादामुळे दादोबा पांडुरंग यांच्यासह अनेकांना याचा जबर आर्थिक फटका बसला आणि त्याच दरम्यान अध्यक्ष राम बाळकृष्ण यांनी कलकत्ता येथे प्रयाण केले. यांमुळे परमहंस सभा हळूहळू अस्तंगत झाली. सभेने स्वीकारलेले लोकोपयोगी कार्य, प्रवर्तित केलेली तत्त्वे व धर्मसुधारणेची दृष्टी अभिनव असली, तरी तिचा मार्ग गुप्ततेचा आणि सामाजिक दृष्ट्या क्रांतिकारी होता. परिणामी ती व्यापक समाजावर अपेक्षित परिणाम घडवू शकली नाही. मात्र, या उपक्रमातून धडा घेत सभेच्या मोजक्या ध्येयवादी सदस्यांमार्फतच पुढे प्रार्थना समाज निर्माण होऊ शकला.

राम बाळकृष्ण यांच्या निधनानंतर परमहंस सभेचे काही सदस्य १७ डिसेंबर १८६६ रोजी आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या घरी पुढील वाटचालीसंदर्भात विचारविनिमयासाठी एकत्र आले. या बैठकीत जातिभेद, बालविवाह व विधवाविवाह यांसारख्या लोकक्षोभास कारणीभूत ठरू शकणाऱ्या सामाजिक प्रश्नांऐवजी परमार्थसाधनेवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, १८६४ व १९६७ मध्ये ब्राह्मो समाजाचे प्रवक्ते केशवचंद्र सेन यांनी मुंबई, पुणे येथे दिलेल्या जाहीर व्याख्यानांतून इंग्रजी शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रीय अभिजनांमध्ये उत्साह संचारला होता. तसेच, १८६६ मध्ये इंग्लंडमधील समाज व शिक्षणसुधारक मेरी कारपेंटर (१८०७-१८७७) भारतभेटीवर आल्या असता, त्यांनी आत्माराम पांडुरंग यांच्या घरी झालेल्या सभेत धार्मिक उन्नतीसाठी संघटित होण्याचे सुचविले. या सर्व पार्श्वभूमीवर प्रार्थना समाजाच्या स्थापनेची पायाभरणी झाली.

परमहंस सभेच्या वेळी धारण केलेली गुप्तता तसेच सामाजिक सुधारणांना धर्मसुधारणेचा पाया नसेल तर अशा सुधारणा चिरस्थायी व एकंदर समाजाच्या कल्याणास पोषक ठरणार नाहीत, असे सभेच्या काही सदस्यांना वाटत होते. त्यामुळे अशी जाणीव निर्माण झाल्यानंतर यातून उदयाला आलेल्या प्रार्थना समाजाचा मार्ग निराळा झाला. ‘परमहंस सभेच्या अस्थींतून पुढे प्रार्थना समाजाच्या चळवळीचा उद्भव झाला’ असे न. र. फाटक यांनी म्हटले आहे, ते अगदी यथार्थ आहे.

संदर्भ :

  • Naik, J. V., The Collected Works of J. V. Naik: Reform and Renaissance in Nineteenth Century Maharashtra, Edited by Murali Ranganathan, The Asiatic Society of Mumbai, 2016.
  • नाईक, जे. व्ही.; पाटील, अवनीश आणि शिंदे, रणधीर संपा., ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाचे अंतरंग’, शब्द प्रकाशन, मुंबई, २०२३.
  • प्रियोळकर, अ. का., ‘परमहंस सभा व तिचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण’, मराठी संशोधन पत्रिका: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विशेषांक, अंक ४ आणि १ जुलै ते डिसेंबर २०२२. (मूळ पुस्तक: प्रियोळकर अनंत काकबा, ‘परमहंस सभा व तिचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण’, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय प्रकाशन, मुंबई १९६६.)
  • फाटक न. र. ‘न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे यांचें चरित्र’, पहिली आवृत्ती, मुंबई, १९२४.
  • वैद्य द्वा. गो. (मू.ले., संपा.); दीक्षित, राजा, (द्वि. आ. संपा.), ‘प्रार्थनासमाजाचा इतिहास’, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, मुंबई, २०१९.

समीक्षक : अवनीश पाटील


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.