तर्खडकर, आत्माराम पांडुरंग : (२३ डिसेंबर १८२३- २६ एप्रिल १८९८). महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, परमहंस सभेचे संस्थापक सदस्य, प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य-अध्यक्ष आणि मुंबईतील विख्यात वैद्य. ‘आत्माराम पांडुरंग’ म्हणूनही ते परिचित. त्यांचा जन्म मुंबई-गिरगावमधील शेणवीवाडी येथे झाला. वडिलांचे नाव पांडुरंग यशवंत. आईचे नाव यशोदाबाई. त्यांना एकूण पंधरा भावंडे, त्यांपैकी फक्त पाच मोठी झाली. आत्माराम बारा वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. थोरले बंधू दादोबा पांडुरंग हे मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक म्हणून, तर दुसरे बंधू भास्कर पांडुरंग हे समाजसुधारक म्हणून ख्याती पावले. त्यांचे पणजोबा नारायण शेट यांचे मूळचे घराणे वसई (जि. ठाणे) तालुक्यातील तरखड या गावातील. त्यांच्या पूर्वजांनी चिमाजी आप्पांच्या १७३९ मधील वसई मोहिमेवेळी विशेष शौर्य गाजविले होते. म्हणून त्यांना ‘तरखड’ गाव इनाम मिळालेले होते. पुढे आजोबा यशवंत हे कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झाले.

आत्माराम यांचे शिक्षण इंग्रजी सोसायटीच्या शाळेमध्ये तिसर्‍या सामान्य शिष्यवृत्तीपर्यंत झाले. विद्यार्थीदशेत त्यांचा गणित हा आवडीचा विषय होता. प्रा. अँडरसन व हार्कनेस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. अँडरसन यांच्या धार्मिक वृत्तीचा प्रभाव आत्माराम यांच्यावर पडला. त्यामुळे ते रेव्हरंड नेसबिट यांच्या धर्मवर्गास जात. घरातही ते विविध धार्मिक विषयांवर वडिलांशी चर्चा करीत. पुढे त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले (१८५१). त्या वेळी आत्माराम यांनी मुंबईतील देवी या साथरोगाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात मोठे सहकार्य केले.

आत्माराम यांचे वयाच्या १४ वर्षी लग्न झाले. लग्नप्रसंगी त्यांच्या पत्नीचे वय अवघे सहा वर्षांचे होते. त्यांना एकूण चार मुले (मोरेश्वर, आनंदराव, रामचंद्र व ज्ञानेश्वर) व तीन मुली (दुर्गाबाई, अन्नपूर्णा व माणकबाई). तत्कालीन समाजातील बालविवाह प्रथेस विरोध करून आत्माराम यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. यावरून त्यांना सामाजिक रोषाला सामोरे जावे लागले. आत्माराम यांची कन्या अन्नपूर्णा या लंडनला जाऊन उच्चविद्याविभूषित झाल्या. महाकवी रवींद्रनाथ टागोरांशी त्यांचा स्नेह होता. रवींद्रनाथांनी अन्नपूर्णा यांच्यावर भावकाव्ये लिहिली आहेत. अन्नपूर्णा या आयरिश मुलाशी विवाहबद्ध झाल्या. त्या सासरच्या ॲना हॅरॉल्ड लिट्लडेल होत.

आत्माराम यांनी दादोबा पांडुरंग यांच्या धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला. तसेच अनेक लोकहितवादी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. आत्माराम हे ३१ मार्च १८६७ रोजी स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे संस्थापक अध्यक्ष होते (१८६७-१८९८). ब्रिटिशकालीन ख्रिस्ती मिशनऱ्यांचे भारतीय धर्म आणि संस्कृतीवरील आक्रमण टाळणे आणि भारतीय समाजातील मूर्तिपूजा, बहुदेवतावाद, जातिभेद व इतर परंपरागत अनिष्ट चालीरीती दूर करणे या उद्दिष्टांसाठी आत्माराम, दादोबा पांडुरंग, राम बाळकृष्ण जयकर, भिकोबा चव्हाण, तुकाराम तात्या आदींच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या परमहंस सभेचे अस्तित्व १८६० च्या सुमारास संपले आणि पुढे प्रार्थना समाज नावारूपाला आला. परमहंस सभेची तत्त्वे व धर्मसुधारणेची दृष्टी प्रार्थना समाजाने पुढे नेली.

आत्माराम यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. मुंबई विद्यापीठाचे ते अधिछात्रधारक (फेलो) तसेच मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. तत्कालीन मुंबई सरकारने त्यांची शहराचे शेरीफ (नगरपाल) म्हणून नेमणूक केलेली होती. मुंबई रॉयल एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ‘स्ट्रे थॉट्स ऑन द ओरिजिन अँड डिव्हेलपमेंट ऑफ रिलिजन’ हा त्यांचा एक निबंध प्रसिद्ध आहे. तसेच बौद्धधर्माविषयी त्यांचा विशेष अभ्यास होता.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • वैद्य, द्वारकानाथ गोविंद; दीक्षित, राजा, संपा., ‘प्रार्थनासमाजाचा इतिहास’, प्रथमावृत्ती, प्रार्थनासमाज, मुंबई, १९२७; द्वितीयावृत्ती, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, मुंबई, २०१९.
  • सरदेसाई, बी. एन. ‘आधुनिक महाराष्ट्र’, कोल्हापूर, २०००.

समीक्षक : अवनीश पाटील