इ.स.पू. दुसरे शतकातील एक प्रख्यात बौद्ध भिक्खू, महान तर्कशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते. ग्रीक राजा मिनांडर (ज्याला पालि साहित्यात ‘मिलिन्द’ म्हटले गेले आहे) आणि नागसेन यांच्यातील तात्विक संवाद ‘मिलिन्दपञ्हो’ (Milindapañha – मिलिंद प्रश्न) या जगप्रसिद्ध ग्रंथाचा मुख्य विषय आहे. बौद्ध धर्मातील ‘अनात्मवाद’ (Anattā) आणि ‘निर्वाण’ (Nibbāna) यांसारख्या गहन संकल्पना अत्यंत सोप्या उपमांद्वारे स्पष्ट करण्यासाठी नागसेन ओळखले जातात.
१. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि परिचय
नागसेन यांच्या जीवनाविषयीची मुख्य माहिती ‘मिलिंदपञ्हो’ ग्रंथाच्या ‘बाह्यकथा’ (Bāhirakathā) या भागात आढळते. त्यांचा जन्म हिमालयातील ‘कजंगल’ (Kajaṅgala) नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सोनुत्तर (Sonuttara) यांनी त्यांना तीन वेदांचे (Tayo Vedā) शिक्षण दिले होते, परंतु सत्याच्या शोधात त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी ‘रोहण’ (Thera Rohana) नावाच्या स्थविरांकडून प्रव्रज्या (Pabbajjā) घेतली आणि पुढे पाटलीपुत्र येथे ‘अस्सगुत्त’ (Assagutta) यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपिटकाचा (Tipiṭaka) सखोल अभ्यास केला.
२. मिलिंद–नागसेन संवाद: बॅक्ट्रियन-ग्रीक राजा मिनांडर हा अत्यंत बुद्धिमान आणि जिज्ञासू होता. तो विद्वानांना वादात हरवण्यासाठी प्रसिद्ध होता. जेव्हा मिलिंद राजाने नागसेनांना प्रश्न विचारले, तेव्हा नागसेनांनी दिलेली उत्तरे बौद्ध तर्कशास्त्राचा सुवर्णकाळ मानली जातात. हा संवाद ऐतिहासिक ‘सागल’ (Sāgala – आधुनिक सियालकोट) नगरीत झाला.
अ) रथाचे उदाहरण (अनात्मवाद – Anattā): जेव्हा राजाने विचारले की, “नागसेन कोण आहे?”, तेव्हा नागसेनांनी रथाचे रूपक (Ratha Upamā) दिले (Miln. 25). ज्याप्रमाणे चाक (Cakka), आस (Akkhā), दांडा या भागांना एकत्र जोडल्यावर ‘रथ’ हे नाव (प्रज्ञप्ती – Paññatti) मिळते, परंतु स्वतंत्रपणे ‘रथ’ नावाचा कोणताही पदार्थ नसतो; त्याचप्रमाणे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान (पंचस्कंध – Pañcakkhandha) यांच्या एकत्रिकरणाला ‘नागसेन’ म्हणतात. पारमार्थिक दृष्टिकोनातून कोणताही स्थायी ‘आत्मा’ (Attā) किंवा ‘पुद्गल’ (Pudgala) नसतो.
ब) पुनर्जन्म आणि कर्म (Paṭisandhi): आत्मा नसताना पुनर्जन्म कसा होतो, हे स्पष्ट करताना त्यांनी एका दिव्याने दुसरा दिवा लावण्याचे (दीप उपमा – Dīpa Upamā) उदाहरण देऊन, प्रकाश हस्तांतरित होतो, पण दिवा तोच नसतो. ही प्रक्रिया त्यांनी ‘संतान’ (Santāna – प्रवाहाची निरंतरता) या संकल्पनेद्वारे मांडली.
३. मिलिंदपञ्हो ग्रंथाचे महत्त्व: हा ग्रंथ मूळतः उत्तर-पश्चिम भारतात प्रचलित असलेल्या प्राकृत किंवा संस्कृत भाषेत असावा, परंतु आज तो पालि भाषेत उपलब्ध आहे. या ग्रंथाला थेरवाद बौद्ध परंपरेत ‘अतुलनीय’ स्थान असून, म्यानमारमध्ये याला खुद्दकनिकायाचा भाग मानले जाते, तर श्रीलंकेत याला अधिकृत धर्मग्रंथाचा (Canonical) दर्जा दिला जातो.
४. विचारसरणीची वैशिष्ट्ये: नागसेन हे केवळ प्रवचनकार नव्हते, तर ते एक कुशल मनोवैज्ञानिक होते. त्यांनी मानवी मनाचे विश्लेषण करताना ‘अभिधम्मा’तील (Abhidhamma) सूक्ष्म संकल्पनांचा वापर केला. त्यांच्या संवादशैलीत तर्कशुद्धता, उपमांचा नेमका वापर आणि विनयशीलता दिसून येते. त्यांनी निर्वाणाचे वर्णन करताना ते ‘अनुभवता येते’ असे सांगून मध्यम मार्गाचे (Majjhima Paṭipadā) समर्थन केले.
५. जागतिक साहित्यातील स्थान : नागसेन आणि मिलिंद यांचा संवाद हा जगातील महान तात्विक संवादांपैकी एक मानला जातो. चिनी भाषेतही या ग्रंथाची ‘नागसेन-भिक्खू-सूत्र’ (Nāgasena Bhikṣu Sūtra) या नावाने प्राचीन भाषांतरे उपलब्ध आहेत, जे नागसेनांच्या प्रभावाचा विस्तार दर्शवते.
संदर्भ :
- कोसंबी, धर्मानंद, “भारतीय संस्कृती आणि अहिंसा”, सुविचार प्रकाशन, मंडळ.
- वाडेकर, ना. ह., “मिलिंद-पञ्हो (मराठी अनुवाद)”, वरदाप्रकाशन, पुणे.
- Bapat, P.V., “2500 Years of Buddhism”, Publications Division, Govt. of India.
- Trenckner, V. (Ed.), “The Milinda pañho”, Royal Asiatic Society, London, 1928.
- Rhys Davids, T.W., “The Questions of King Milinda. ” SBE Vol. 35 & 36, Oxford.
समीक्षक : जाई परांजपे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.