भारतात गुप्तचर नेमण्याची प्रथा वास्तविक अगदी पुरातन काळापासून रूढ होती. शुक्रनीती या ग्रंथातून हेर व हेरगिरीचा उल्लेख आढळतो. हेरगिरीचे महत्त्व छ. शिवाजी महाराजांनीही जाणले होते. त्यांच्या सैन्यातील बहिर्जी नाईक, विश्वासराव नानाजी प्रभू मुसेखोरेकर, सुंदरजी प्रभू वगैरे हेरांकडून माहिती घेऊनच महाराज रणनीती ठरवीत असावेत.  

अफझलखान स्वराज्यावर चालून आला (१६५९), तेव्हा त्याच्या सैन्यात महाराजांचे हेर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवभारतात एकोणिसाव्या अध्यायाच्या पहिल्या दोन श्लोकात छ. शिवाजी महाराज आपली हेररूपी दृष्टी सर्वत्र टाकून आहेत आणि त्यांनी आपला वकील खानच्या छावणीत पाठवला, असा उल्लेख आढळतो. शिवदिग्विजय बखरीमधील उल्लेखानुसार विश्वासराव नानाजी प्रभू मुसेखोरेकर (याचे आडनाव बहुधा दिघे असावे) हे महाराजांचे पाच हजार मावळ्यांचे प्रमुख, खानाच्या छावणीत फकीर बनून भिक्षा मागण्यासाठी रोज जात असत आणि छावणीत जी काही खलबते शिजत असत, त्याची बातमी ते महाराजांपर्यंत पोहोचवीत. अफझलखान प्रकरणात महाराजांचे वकील पंताजीकाका बोकील हे देखील खानच्या छावणीत जात होते. ही वकील मंडळी कान आणि डोळे नीट उघडे ठेवून अधिकाधिक माहिती टिपून घेत होते. असेच हेर शत्रूचेही असण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडन याची राहण्याची व्यवस्था, राजसदरेपासून लांब करण्यात आली होती.

बहिर्जी नाईक यांच्याबद्दल सभासद बखरीमध्ये ‘बहिर्जी नाईक म्हणोन मोठा शहाणा जासुदाचा नाईक तो बहुत हुशार चौकस ठेविला’, अशी नोंद आहे. सप्तप्रकरणात्मक चरित्रात बहिर्जी नाईक यांची नेमणूक झाल्याचा उल्लेख आहे. यात त्यांनी बातमी महाराजांस आणून द्यावी, असे नमूद केले आहे. शिवभारतात आणखी एक उल्लेख सापडतो, तो म्हणजे सिद्दी जोहरच्या वेढ्यातून महाराज निसटले. त्या वेळी महाराज प्रवास करत असताना, जे मार्ग महाराजांना त्यांच्या हेरांनी दाखवले आहेत, त्याच मार्गांनी महाराज गेले. बहिर्जी नाईक यांच्या नावाचा सभासद बखरीत जालनापूर म्हणजे आताचे जालना लुटले, त्याबाबतचाही उल्लेख आढळतो. जालना हे मोगलांचे समृद्ध शहर. साधारण १६ नोव्हेंबर १६७९ रोजी मराठ्यांनी जालना लुटले. पण सरदारखान केसर सिंह वगैरे मोगली सरदार मराठ्यांच्या मागावर अनपेक्षित आले. त्यावेळी बहिर्जी नाईक व महाराजांनी शत्रूला हुलकावण्या देऊन केलेली लूट अहमदनगर जिल्ह्यातील पट्टा किल्ल्यावर आणली. त्या भागाची तसेच तेथील आडवाटांची नखशिखांत माहिती असलेले बहिर्जी नाईक यांच्यावर महाराज बेहद्द खुश झाले.

शत्रूंची शहरे लुटण्यापूर्वी हेरांच्या मदतीने कशी तयारी केली जात असे, याचा उल्लेख सभासद बखरीत आहे. त्यात असे लिहिले आहे की, ‘पुढे जितकी मुघली शहरे होती, त्यात दोन चार माणसे वेषांतर करून पाळतीस ठेवली. दोघे खबर द्यावयास यावे, दोघांनी तेथे हुशार राहावे, मग लष्कर पाठवून हवेलिया, शहरे मारावी, ही तजवीज केली.’

मुंबईतील इंग्रजांची बातमी काढण्याच्या कामगिरीवर नेमणूक केलेल्या हेरांमध्ये सुंदरजी प्रभू हे नाव आढळते. हा सुंदरजी महाराजांचा दुतही होता, तसेच तो हेरगिरी देखील करीत असे. भिकाऱ्याचे सोंग घेऊन हा अनेकदा मुंबई बेटात शिरला, परंतु इंग्रजांना याचा संशय आल्यामुळे इंग्रजांनी त्याला अटक केली.

हेरगिरी करताना वल्लभ गंगादास या व्यापाऱ्यास सुरतेच्या मोगल सुभेदाराने छ. शिवाजी महाराजांचा हेर असल्याच्या संशयावरून अटक केल्याचे दिसते. महाराजांनी १६६९ मध्ये चक्क दोन गोऱ्या पोर्तुगीजांचाही हेर म्हणून वापर केल्याचा उल्लेख शिवकालीन महाराष्ट्र  या ग्रंथात आहे.

छ. शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना दक्षिण दिग्विजयाला निघण्यापूर्वी एक पत्र लिहिले. त्यामध्ये बहलोल खान व व्यंकोजी राजे यांच्यात पत्रव्यवहार झाल्याचे ते लिहितात. याचा सरळ अर्थ असा होतो, की महाराज रायगडावर बसून इतक्या लांब असलेल्या व्यंकोजी राजांना त्यांनाच बहलोल खानाकडून आलेल्या कागदाविषयी सांगत आहेत. तसेच त्या कागदात काय आहे, हेही सांगत आहेत. यावरूनच महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा संचार किती दूरवर होता, हे लक्षात येते.

हेरांनी आणलेल्या बातमीवर महाराजांनी केलेल्या कारवाईचे उत्तम उदाहरण दर्शवणारे पत्र उपलब्ध आहे. शायिस्तेखान पुण्यात तळ देऊन बसला होता, तेव्हा पावसाळ्यात लष्करी हालचाली थंड होत्या, पण पावसाळा संपत आल्यावर ताज्या दमाच्या मोगलांनी आपल्या प्रदेशात धुमाकूळ घालण्याच्या काय काय योजना केल्या आहेत, ही बातमी महाराजांना राजगडावर मिळाली. तेव्हा ते बाजी सर्जेराव जेधे यांना पत्र लिहून त्यांनी गावातील लोकांना व कुटुंब कबिल्याला सुरक्षित जागी हलवावे, असे कळविले.

शायिस्तेखानावर पुण्यात लाल महालात मारलेला छापा (१६६३) हेर खात्याच्या मदतीशिवाय यशस्वी होणे निव्वळ अशक्य होते. मोगल दरबारातील भीमसेन सक्सेना आपल्या तारीख – ए – दिलकुशा ग्रंथामध्ये लिहितो, हेरांनी खानाच्या छावणीची अगदी इत्थंभूत माहिती महाराजांना दिली होती. छ. शिवाजी महाराज एका पत्रात मोगल अधिकाऱ्याला लिहितात, की मोगल दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाला पत्रातून काय काय सांगतात, ते आम्हाला इथे जागेवर समजत होते.

फॉरिन बायोग्राफीज ऑफ शिवाजी (१९२२) या ग्रंथात इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात की, छ. शिवाजी महाराजांनी स्वतः फकिराच्या वेशात पाहणी करून सुरतला जाण्याचा सर्वांत जलद मार्ग शोधला. पण यात विशेष तथ्य वाटत नाही. पण यावरून एक मात्र नक्की समजते की, महाराज अशा प्रकारे फकिराच्या वेशात आपल्या हेरांना कामगिरी पार पडण्यासाठी पाठवत असतील. सुरत लुटीच्या वेळी बहिर्जी नाईकांनी अशीच, फकीर बनून सुरत शहराची खडानखडा माहिती महाराजांना दिलेली होती, असे उल्लेख इंग्रजांच्या कागदपत्रांत सापडतात. महाराज त्यांच्या हेरांना भरपूर मोबदला देत असत, अशा आशयाचे दोन संदर्भ या फॉरिन बायोग्राफीज … मध्ये आहेत. ॲबे कॅरे या परकीय लेखकाने महाराज आपल्या सैनिकांची जशी काळजी घेत, तशीच हेरांचीही घेत असत, असे नमूद केले आहे.

अनेक ठिकाणी ‘जासूद’ असा शब्द आढळतो, जासूद हा फार्सी शब्द आहे; पण जासूद म्हणजे गुप्तचर किंवा हेर असाच असेल असे नाही. किंबहुना नुसती बातमी किंवा निरोप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्यास सुद्धा जासूद म्हटले जात असे. हिंदीत ‘जासूस’ हा शब्द गुप्तहेर अशा अर्थी वापरला गेलेला दिसतो. काही ठिकाणी यांना ‘नजरबाज’ असा शब्द वापरलेला दिसतो, बाज म्हणजे गरुड आणि गरुड हा पक्षी त्याच्या तीक्ष्ण नजरेसाठी प्रसिद्ध आहे, कदाचित गरुडासारखी तीक्ष्ण नजर असलेला म्हणून नजरबाज हा शब्द हेरांसाठी वापरला जात असावा. हे हेर किंवा गुप्तचर एकमेकांची ओळख पटावी म्हणून काही खुणा किंवा काही वस्तू वापरत होते का याबद्दल फार तपशील मिळत नाहीत. परंतु सांकेतिक भाषेतील काही पत्रे पेशवेकाळात आढळतात; तथापि हेरखात्याबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध असणे, हे तत्कालीन हेरखात्याचे यशच म्हणावे लागेल.

संदर्भ :

  • कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर, शिवभारत, पुणे, १९९८.
  • ढेरे, रा. चिं. शिवदिग्विजय बखर, पुणे, १९७५.
  • देशपांडे, प्र. न. मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड २, मूळ खंड १५, राजवाडे संशोधक मंडळ, धुळे, २००२.
  • पगडी, सेतुमाधवराव, तारीख-ए-दिल्कुशा, समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३, मराठी साहित्य परिषद, हैदराबाद, २०१०.
  • सभासद बखर, मूळ मोडी प्रत, डेक्कन कॉलेज, पुणे.
  • हेरवाडकर, र. वि. सप्तप्रकरणात्मक चरित्र, पुणे, २०००.

                                                                                                                                                                                   समीक्षक : विद्याचरण पुरंदरे