(ऑक्टहेड्राइट). खनिजाचा एक प्रकार. रूटाइल, ब्रूकाइट आणि ॲनॅटेज या तिन्ही खनिजांची रासायनिक संज्ञा : TiO2. ॲनॅटेज हे रूटाइलचे बहुरूपक मानले जाते. स्फटिक प्रणाली चतुष्कोणीय, आकार वटिकाकार किंवा द्विअष्टफलकाकार (Dioctahedral).
भौतिक गुणधर्म : रंग गडद निळा किंवा निळा (इंडिगो) व पिवळा, तर काही वेळा तपकिरी किंवा काळा. उठाव मध्यम. पारदर्शकता अर्धपारदर्शक ते अपारदर्शक. लोहाचे प्रमाण जास्त असल्यास अपारदर्शक. रेखा पांढरी किंवा फिकट पिवळ्या रंगात. चमक हिऱ्यासारखी (Adamantine) कठिनता ५.५ – ६. ६. काहीसे ठिसूळ. विशिष्ट गुरुत्व ३.४ – ३.८.
प्रकाशकीय गुणधर्म : वर्ण बदल क्षीण गडद रंगात फिकट ते गडद बदल दर्शवतो. एक अक्षीय (- ve) अपस्करण दाट. अपवर्तन २.४९ – २.५६. आढळ रूपांतरित खडकात अभ्रकी पट्टिताश्म किंवा क्लोराइट सुभाजा या खडकातील गौण खनिज या रूपाने आढळते. विदारण प्रक्रियेमुळे तयार झालेल्या द्वितीय निक्षेपात विपुल.
प्राप्तिस्थान: स्वित्झर्लंडमधील अल्पाइन पर्वतात खडकातील शिरांमध्ये. तसेच फ्रान्स, इटली, नॉर्वे व ब्राझील या देशांत ते आढळते.
उपयोग : अति तेजस्वी असल्याने रत्न म्हणून उपयुक्त, परंतु ठिसूळपणामुळे फक्त गळ्यात घालण्याच्या माळा बनविण्यासाठीच उपयुक्त.
संदर्भ : https://www.britannica.com/science/anatase.
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.