काही चुनखडक बुंदीच्या कळ्यांसारख्या गोलसर व सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. पाण्यातील माशांच्या अंड्यांच्या पुंजक्यासारखा त्यांचा देखावा असल्यामुळे अशा खडकांना अंदुकाश्म किंवा अंदुकी चुनखडक म्हणतात. त्यांच्या घटक कणांना अंदुके (Ooids) असे म्हणतात.
अंदुकांचा व्यास साधारण ०·५ ते १·०० मिमी. इतका असतो. कणांचा व्यास २ मिमीपेक्षा अधिक झाल्यास त्या खडकाला पिसोलाइट (Pisolite) किंवा कलायाश्म असे नाव दिले जाते. अंदुकांचा आकार सामान्यतः गोल असतो; परंतु कधीकधी लंबगोल किंवा अनियमित गोलसरही आढळतो.
अंदुकांचा छेद घेतल्यास त्यांच्या अंतर्गत संरचनेत सकेंद्री (Concentric). [कांद्याच्या पाकळ्यांसारखी आवर्त थररचना, अरीय (Radial)] चाकाच्या आऱ्यांसारखी किरणात्मक रचना, प्रकार दिसून येतात, काही ठिकाणी सकेंद्री व अरीय दोन्ही प्रकार एकत्र दिसतात. अंदुकांची वाढ केंद्राभोवती थर (पुटे) साचत जाऊन आतून बाहेर (accretionary growth) झालेली दिसते. अनेक अंदुकांच्या मध्यभागी वाळूचा कण, खनिजकण किंवा प्राणिज कवचाचा सूक्ष्म तुकडा ‘केंद्रक’ (nucleus) म्हणून आढळतो. काही वेळा तो नसतो किंवा छेद योग्य ठिकाणी न गेल्याने दिसत नाही. अंदुके प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट (CaCO₃) ने तृप्त अशा नैसर्गिक पाण्यातून अवक्षेपित होऊन तयार होतात. तथापि त्यांच्या रचनात्मक उत्पत्तीविषयी भिन्न मते आढळतात.
रुक्ष प्रदेशातील खाऱ्या सरोवरांमध्ये, जिथे लाटांमुळे पाणी सतत हालचालीत असते, तेथे तळाशी घरंगळणाऱ्या वाळू किंवा कवचाच्या कणांभोवती CaCO₃ ची पुटे साचत राहतात. अशा प्रकारे अंदुके आजही तयार होताना दिसतात. याचे आधुनिक उदाहरण म्हणून ग्रेट सॉल्ट लेक (उटा, अमेरिका) परिसराचा उल्लेख केला जातो. बहुसंख्य अंदुकाश्म या पद्धतीने निर्माण झाले असावेत. काही शास्त्रज्ञांच्या मते अंदुके ही CaCO₃ चे कलिल (colloidal) स्वरूपातील निक्षेपण होऊन तयार झालेली संघिते असावीत. पायसद्रव्याचे (emulsion) घनीभवन होताना जर द्रव शुद्ध असेल तर अरीय रचना, तर इतर द्रव्ये मिसळलेली असतील तर सकेंद्री रचना निर्माण होते—अंदुके तशा प्रकारची संघिते असावीत, असे मत आहे. कित्येक अंदुकांत सूक्ष्म तंतूसारखे शैवालांचे (algal) अवशेष आढळतात. त्यामुळे शैवालांच्या जैवरासायनिक क्रियेमुळे CaCO₃ चे अवक्षेपण होऊन अंदुके तयार झाली असावीत, असे काही संशोधक सुचवितात.
खनिजीय दृष्टीने अंदुकांचे CaCO₃ प्रारंभी ॲरॅगोनाइट (Aragonite) या अस्थिर स्वरूपात असते. आधुनिक अंदुके बहुधा ॲरॅगोनाइटाची आढळतात. कालांतराने अनुनिक्षेपण (diagenesis) प्रक्रियेत हे ॲरॅगोनाइट स्थिर अशा कॅल्साइटमध्ये रूपांतरित होते. प्राचीन भूवैज्ञानिक कालातील अंदुके प्रामुख्याने कॅल्साइटाची आढळतात. झऱ्यांच्या किंवा गुहांतील खळबळत असलेल्या पाण्यातील CaCO₃ च्या अवक्षेपणामुळेही अंदुकाश्म तयार होऊ शकतात. आधुनिक काळात तयार होणारे अंदुकाश्म CaCO₃, ॲरॅगोनाइट किंवा कॅल्साइट स्वरूपात आढळतात. प्राचीन स्तरांतील काही अंदुकाश्मांमध्ये सिलिका, डोलोमाइट, हेमॅटाइट, फॉस्फेट, पायराइट इत्यादींच्या अंदुका आढळतात. त्यांपैकी काही मूळच्या CaCO₃ अंदुकांचे प्रतिस्थापन (replacement) होऊन तयार झालेले असतात; तर काही, विशेषतः फॉस्फेटी व लोही अंदुके, थेट अवक्षेपणाने निर्माण झालेली असण्याची शक्यता आहे. अंदुकाश्म हा गोलसर अंदुकांनी बनलेला चुनखडक असून तो उथळ, उबदार व लाटांनी सतत हालचाल असलेल्या जलपरिस्थितीत निर्माण होतो. त्याची सकेंद्री किंवा अरीय अंतर्गत रचना, ॲरॅगोनाइट ते कॅल्साइट रूपांतरण आणि विविध खनिजीय प्रतिस्थापन ही त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
भारतात अंदुकाश्म प्रामुख्याने राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशात आढळते. राजस्थानातील जैसलमेर व उदयपूर परिसरात जुरासिक काळातील अंदुकाश्म प्रसिद्ध आहे. गुजरातमधील कच्छ भागातही याचे साठे आढळतात. मध्य प्रदेशातील काही भागातही ही चुनखडी सापडते. या खडकांचा उपयोग सिमेंट व बांधकाम उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो.
जगात अंदुकाश्म चुनखडी इंग्लंडमधील कॉट्सवोल्ड्स प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच अमेरिकेतील युनायटेड स्टेट्समधील फ्लोरिडा व इंडियाना राज्यातही याचे महत्त्वपूर्ण साठे आहेत. मध्य पूर्व, बहामाज व इटली येथेही उथळ सागरी वातावरणात अंदुकाश्म तयार झालेली आढळते.
संदर्भ :
- Boggs, S. Principles of Sedimentology and Stratigraphy, (5th ed.), Pearson Education, 2012.
- Bathurst, R. G. C. Carbonate Sediments and Their Diagenesis, Elsevier, 1975.
- Flügel, E. Microfacies of Carbonate Rocks (2nd ed.), Springer, 2010.
- Pettijohn, F. J. Sedimentary Rocks (3rd ed.), Harper & Row, 1975.
- Scholle, P. A. & Ulmer-Scholle, D. S. A Color Guide to the Petrography of Carbonate Rocks, AAPG Memoir 77, 2003.
- Tucker, M. E. Sedimentary Petrology: An Introduction to the Origin of Sedimentary Rocks (3rd ed.), Blackwell Science, 2001.
समीक्षक : यू. डी. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.