या ज्वालामुखीतून लावारसाचा उद्रेक न होता, गरम किंवा उकळत्या चिखलाचा उद्रेक होतो. चिखलाच्या ज्वालामुखींचा उष्णतेचा स्रोत पृथ्वीच्या आत खोल असतो. या ज्वालमुखीतून प्रामुख्याने बारीक गाळ (चिखल, चिकणमाती आणि वाळू), पाणी (बहुतेकदा खारट) आणि उच्च दाबाखाली असलेले वायू (मिथेन आणि इतर कर्बोदके; हायड्रोकार्बन्स) उत्सर्जित होतात. या उत्सर्जनासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोलवर असलेले उच्च-दाबाचे द्रव आणि वायू, भूगर्भीय भेगांमधून (fault or Weak Zone) बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. अशा ठिकाणी चिखलाचे ज्वालामुखी तयार होतात. यातील दाब बहुतेकदा पाण्याने समृद्ध गाळाच्या जलद संचयामुळे किंवा भूसांरचनिक होतो. या ज्वालामुखींचा उद्रेक सामान्यतः थंड किंवा सभोवतालच्या जमिनीच्या तापमानापेक्षा थोडा जास्त असतो. भूऔष्णिक क्रियाकलापांशी संबंधित काही चिखलाच्या ज्वालामुखींमधून गरम चिखल बाहेर पडू शकतो. याचे तापमान १००० से. किंवा त्याहून अधिक असते.
चिखलाचे ज्वालामुखी वेगवेगळ्या आकारचे असतात. काही ज्वालामुखी एक मीटर रुंदीच्या छोट्या मडक्याच्या आकारापासून ७०० मी. उंच आणि १० किमी. रुंदीच्या उंच टेकडीपर्यंत मोठे असतात. जेव्हा चिखलाचा उद्रेक होतो, तेव्हा नेहमीच्या ज्वालामुखीप्रमाणे मोठा आवाज़ होत नाही, तर फक्त बुडबुडे मोठे होऊन फ़ुटताना थोडा आवाज़ होतो. काही स्फोटकांमुळे उद्रेक होतात, विशेषतः जेव्हा संचित ज्वलनशील वायू (मिथेन) प्रज्वलित होतो, त्या वेळी ज्वाला निर्माण होतात. चिखलाचे ज्वालामुखी सामान्यतः विवर्तनी सक्रिय प्रदेश ते बहुतेकदा नमवणी क्षेत्र (Subduction Zone), गिरिजनक पट्टा आणि लक्षणीय भूकंप क्रियाकलाप असलेल्या क्षेत्रांशी संबंधित जागे जवळ तयार होतात, विशेषत: पेट्रोलियम-समृद्ध गाळाचे खोरे, आणि अपतट (ऑफशोअर) अशा ठिकाणी निर्माण होतात.

आढळ : चिखलाचे ज्वालामुखी आझरबैजान या देशात कॅस्पियन समुद्राच्या जवळ सर्वाधिक म्हणजे ३०० पेक्षा जास्त आहेत. या जागेला लँड ओफ़ फ़ायर म्हटले जाते. तसेच सुराबाया शहराजवळ सिदोआरजो (इंडोनेशिया) येथे ऑगस्ट २००६ मधे दररोज ५०,००० घन मी. चिखलाचा उद्रेक झाला. या चिखलाबरोबर हायड्रोजन सल्फ़ाइड वायूचाही उद्रेक झाला. त्रिनिदाद आणि टोबागो येथेही चिखलाचे ज्वालामुखी आहेत. त्यामधे पिपारो या ज्वालामुखीतून सतत चिखलाचा उद्रेक होत आहे. याशिवाय, डेविल्स वुडयार्ड आणि नारिव स्वाम्प येथेदेखील आहेत. या बेटावरील लोक येथील चिखलामधे आनंद घेतात कारण हा चिखल औषधी असल्याचे मानले जाते.
भारतात अंदमान आणि निकोबार मधील बारातांग बेटावर चिखलाचे ज्वालामुखी आढळतात. येथील ज्वालामुखीमधून सडणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमधून वायू (प्रामुख्याने मिथेन), चिखल आणि पाणी पृष्ठभागावर येतात. कालांतराने चिखलातून वायूंचे बुडबुडे वातावरणात मुक्त झाल्याने अशा वाळलेल्या चिखलात असंख्य लहान पोकळ्या निर्माण होतात. काही वेळा चिखल वाळल्यानंतर शंकूच्या आकाराचे कोन तयार होतात. दोन दशकांच्या निष्क्रियतेनंतर (डोर्मांसी) २०२५ च्या बारातांग येथील ज्वालामुखीचा अखेरीस उद्रेक झाला, यातील चिखलाचे वय २.३ – ३.४ कोटी वर्षे असल्याचे अनुमान काढले गेले.
संदर्भ :
- Kopf, A.J. Significance of mud volcanism, Rev Geophys., 40, 2, 1-52., 2001.
- Mazzini, A. Etiope, G. Mud volcanism: An updated review, Earth Science Review. Vol 168, 81-112, 2017.
- Niemann, H., Boetius, A. Mud Volcanoes. In K. N. Timmis (ed.), Handbook of Hydrocarbon and Lipid Microbiology, DOI 10.1007/978-3-540-77587-4_13, 2010.
समीक्षक : पी एस कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.