ऑक्साइड गटातील खनिज. लॅटिन शब्द ‘स्पिनेला’(spinella – मणक्याचे लहान रूप) अर्थात त्याच्या टोकदार स्फटिकांच्या संदर्भावरून आले आहे. स्फटिक प्रणाली घनीय आणि अष्टभुजाकृती असून त्याचे आठ त्रिकोणी पृष्ठ दोन पिरॅमिड तळाशी एकत्र अडकविल्यासारखे दिसतात. कधीकधी अष्टपृष्ठीय स्फटिक जुळे होऊन ‘मॅकल्स’ तयार होतात, ते त्रिकोणी सँडविचसारखे दिसतात.

रासायनिक संघटन : रासायनिक संज्ञा : MgAl2O4 (मॅग्नेशियम ॲल्युमिनियम ऑक्साइड). यात मॅग्नेशियमची (Mg) स्फटिक रचना घनीय प्रणालीतील असून अष्टफलीय स्फटिक आढळतात. गॅनाइट (ZnAl2O4), गॅलेक्साइट (MnAl2O4), हर्सिनाइट (FeAl2O4) आणि मॅग्नेटाइट (Fe2+Fe3+2O4) ही स्पिनेल उपसमूहातील इतर काही खनिजे आहेत.

भौतिक गुणधर्म : रंग लाल, निळा, हिरवा, काळा किंवा तपकिरी. स्पिनेलमधील विविध रंग हे त्यातील रंगद्रव्य म्हणून काम करणाऱ्या लेश मूलद्रव्य घटकांमुळे येतो. शुद्ध स्वरूपात स्पिनेल रंगहीन, परंतु त्याच्या स्फटिक संरचनेमध्ये क्रोमियम, लोह यांच्या संक्रमणामुळे लाल, निळा, हिरवा, पिवळा, तपकिरी आणि काळा असे विविध रंग विकसित होतात. लाल रंगाच्या स्पिनेलला ‘लाल्डी’ म्हणतात.

                                   स्पिनेलमधील रंग

पारदर्शकता पारदर्शक ते अर्धपारदर्शक. चमक काचेसारखी. कठिनता ८, विदलन नसते, परंतु कधीकधी अष्टभुजाकृती आकारात भंग पावतात. भंजन शंखाभ. विशिष्ट गुरुत्व ३.५–४.१.

प्रकाशीय गुणधर्म : आकार बहुधा अष्टफलीय स्फटिक किंवा अनियमित कण स्वरूपात दिसतो. उठाव उच्च. अपवर्तनांक सु. १.७२, मध्यम ते उच्च असल्यामुळे कडा स्पष्ट दिसतात (स्पिनेल समस्थानिक आणि सममितीय असल्याने, अपवर्तनांक हा गुणधर्म स्पिनेलला ओळखण्यासाठी महत्त्वाचा आहे). वर्णबदल आढळत नाही.

काट निकोलखालील गुणधर्म : द्विवर्तन नसल्यामुळे कोणतेही व्यतिकरण रंग दिसत नाहीत. अपवर्तन तेजस्वी द्वितीय ते तृतीय श्रेणीतील रंग दिसतात. विलोपन सरळ. काही वेळा स्पिनेलमध्ये साधे किंवा पदरित यमलन दिसू शकते. (परंतु तरीही संपूर्ण कण काळाच दिसतो). द्विवर्तन मध्यम ते उच्च (सु. ०.००८–०.०१०). द्विअक्षीयता द्विअक्षीय धनात्मक. स्फटिक समदिश आहे, त्यामुळे सर्व अवस्थेत गडद दिसतो. काही नमुन्यांत सूक्ष्म अंतर्वेश किंवा मंडलन दिसू शकते.

प्राप्तिस्थान : स्पिनेल मुख्यतः तमिळनाडू, कर्नाटक व राजस्थान येथे रूपांतरित खडकांत आढळतो. श्रीलंका, म्यानमार, थायलंड व अफगाणिस्तान हे रत्न-गुणवत्तेच्या स्पिनेलसाठी प्रसिद्ध. म्यानमारमधील मोगोक प्रदेश जागतिक स्तरावर उत्कृष्ट लाल स्पिनेलसाठी प्रसिद्ध. तसेच श्रीलंका येथेही मौल्यवान स्पिनेल सापडतो. स्पिनेल हे औद्योगिक तसेच रत्नशास्त्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. पूर्वीच्या काळी स्पिनेलला माणिक समजत. इतिहासातील अनेक प्रसिद्ध ‘माणिक’ प्रत्यक्षात स्पिनेल होते.  ब्रिटिशांनी राणीच्या मुकुटात ‘ब्लॅक प्रिन्स रूबी’ आणि ‘तैमूर रूबी’ यांच्या रूपाने स्पिनेलचा वापर केला. समेरियन स्पिनेल हा जगातील सर्वांत मोठा ज्ञात स्पिनेल आहे, त्याचे वजन ५०० कॅरेट आहे.

संदर्भ :

  • Hughes, R.W. The rubies and spinels of Afghanistan: A brief history.Journal of Gemmology. 24 (4): 256–267, 1994.
  • Pardieu, V.; Farkhodova, and T. Spinel from Tajikistan InColor:30–33, 2019.
  • Ramchandran, K.T. & Panjikar, J. Gemstones-Properties & Identification, Pangem Publishers, Pune, 2016.

         समीक्षक : उदय कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.