बेरिलियम-ॲल्युमिनियम ऑक्साइड गटातील खनिज. याच्या काही जातींमधील अलेक्झांड्राइट (रंग बदलणारा प्रकार) व कॅट्स आय (डोळ्याच्या आकारासारखा) विशेष प्रसिद्ध. ग्रीक शब्द ‘क्रिसोबेरील’ हे क्रिसोस आणि बेरिलोस पासून आले असून त्याचा अर्थ ‘सोनेरी पांढरा स्पार’ आहे. क्रिसोबेरील आणि बेरील यांच्या नावांमध्ये समानता असून दोघांमध्ये बेरिलियम आहे, परंतु ही दोन पूर्णपणे भिन्न रत्ने आहेत.

रासायनिक संघटन : रासयानिक संज्ञा : BeAl₂O₄. यात सिलिका (SiO₂) नसल्याने ते बेरील समूहातील खनिजांपेक्षा वेगळे ठरते. लोह (Fe) व क्रोमियम (Cr) यांसारख्या धातूंच्या अशुद्धतेमुळे हिरवट किंवा लालसर रंग प्राप्त होतो. क्रिसोबेरीलमध्ये ऑक्सिजन अणूंची घन रचना असून त्यात बेरिलियम व ॲल्युमिनियम अणू विशिष्ट जागांवर स्थित असतात. बेरिलियम चतुर्भुज समन्वयात, तर ॲल्युमिनियम अष्टफली समन्वयात असतो. या सुसंघटित अणुरचनेमुळे खनिजाला उच्च कठिनता (८) प्राप्त होते.

भौतिक गुणधर्म : क्रिसोबेरीलचा रंग पिवळा, हिरवा, तपकिरी, मधासारखा तर काही वेळा रंग बदल दर्शवतो. क्रिसोबेरीलमध्ये पिवळा क्रिसोबेरील, अलेक्झांडराइट आणि सायमफेन (लस्निया) हे तीन रत्न प्रकार आहेत.

चक्रीय जुळे (त्रिकचा) क्रिसोबेरील

क्रिसोबेरील स्फटिकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ‘चक्रीय जुळे’ ज्याला त्रिक म्हणतात. या जुळ्या स्फटिकांचे स्वरूप षट्कोनी असते, परंतु ते जुळ्यांच्या त्रिगुणांचे परिणाम आहेत. जर तीन संभाव्य जुळ्या अभिमुखतेपैकी फक्त दोनच उपस्थित असतील, तर इंग्रजी व्ही आकाराचे जुळे तयार होतात.

क्रिसोबेरील पिवळसर-हिरवा आणि पारदर्शक ते अर्धपारदर्शक. फिकट हिरवा ते पिवळा रंग धारण करणारे पारदर्शक स्फटी रत्न म्हणून वापरतात. सायमफेनला रत्न ‘मांजरीचा डोळा’ म्हणून ओळखले जाते. ते क्रिसोबेरील मांजरीच्या डोळ्याप्रमाणे आकर्षक अपारदर्शकता दर्शवते. घुमटाच्या आकाराचे खनिज कापल्यावर, पृष्ठभागावर पसरलेल्या प्रकाशाच्या रेशमी पट्ट्यासह हलक्या-हिरव्या रंगाच्या मांजरीच्या डोळ्यासारखे दिसते.

सायमफेन

विशिष्ट गुरुत्व  ३.५–३.८, चमक काचेसारखी. विदलन स्पष्ट नसते. भंग शंखाभ. कठिनता ८.५. हे तिसरे सर्वांत कठीण नैसर्गिक रत्न असून स्फटिक प्रणाली समचतुर्भुज.

समतल ध्रुवीकृत प्रकाशातील गुणधर्म : आकार  सामान्यतः दाणेदार किंवा लहान त्रिकोणी (प्रिझमी) स्फटिक. रंग रंगहीन, कधीकधी फिकट पिवळसर किंवा हिरवट छटा दिसतात. अलेक्झांड्राइट प्रकाशाच्या स्वरूपानुसार रंग बदल दर्शवितो. दिवसा प्रकाशात हिरवट, तर दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात लालसर दिसतो.

वर्णबदल अतिशय दुर्बल किंवा जवळजवळ नसतो. उठाव अपवर्तनांक जास्त असल्यामुळे (सु. १.७४५ ते १.७५५) उच्च. विदलन स्पष्ट नसते; काहीवेळा अस्पष्ट तडे दिसतात.

काट निकोलखालील गुणधर्म : व्यतिकरण तेजस्वी द्वितीय ते तृतीय श्रेणीतील रंग दिसतात. द्विवर्तन उच्च (सु. ०.००८–०.०१०). विलोपन सरळ; स्फटिकाच्या लांबीच्या अक्षाशी समांतर विलोपन आढळते. यमलन कधीकधी साधे किंवा स्पर्श यमलन दिसते. द्विअक्षीयता द्विअक्षीय धनात्मक (Biaxial positive).

प्राप्तिस्थान : क्रिसोबेरील खनिज ग्रॅनाइटिक पेग्मटाइट शिरांमध्ये, अभ्रकयुक्त खडकांमध्ये व पट्टिताश्म खडकांमध्ये तयार होते. अग्निज खडकांमध्ये पेग्मॅटिक प्रक्रियेच्या परिणामाने ते तयार होते. पृथ्वीच्या कवचाच्या आत खोलवर कमी घनतेचा वितळलेला मॅग्मा तयार होतो, जो पृष्ठभागाच्या दिशेने वर येऊ पाहातो. मुख्य मॅग्मा कक्ष थंड होताना, मूळतः कमी सांद्रतेचे पाणी वितळलेल्या खडकात अधिक केंद्रित होते व अवशेष मॅग्मा पाण्याने समृद्ध होतो. म्हणून आम्लीय किंवा ग्रॅनाइटिक मॅग्माच्या शेवटच्या अवस्थेत विशेषतः पेग्मटाइट शिरांमध्ये त्याची स्फटिकीकरण प्रक्रिया होते. यावेळी मॅग्मामध्ये सिलिका कमी व ॲल्युमिनियम जास्त असल्यास क्रिसोबेरीलच्या निर्मितीस पोषक परिस्थिती तयार होते. काही वेळा संपर्क रूपांतरण प्रक्रियेतही, मॅग्मा व सभोवतालच्या खडकांच्या अभिक्रियेमुळे ते तयार होते. त्यामुळे क्रिसोबेरील हे मुख्यतः ग्रॅनाइट पेग्मटाइट व उच्च तापमानाच्या मॅग्मा कक्षांशी संबंधित खनिज मानले जाते. मॅग्मामधील पाण्याच्या उच्च टक्केवारीमुळे स्फटिक लवकर वाढू शकतात. म्हणून पेग्मॅटाइट स्फटिक बहुतेकदा बरेच मोठे असतात, ज्यामुळे तिथे रत्नांची तयार होण्याची शक्यता वाढते.

क्रिसोबेरील प्रामुख्याने पेग्मटाइट व रुपांतरित खडकांत आढळते. ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत याचे साठे आढळतात. विशेषतः तामिळनाडू व कर्नाटक येथे ‘मांजरीचा डोळा’ हा प्रकार प्रसिद्ध आहे. ५ कॅरेट (१००० मि.ग्रॅ.) आणि त्याहून मोठे अलेक्झांड्राइट उरल पर्वतांबरोबरच ब्राझीलमध्ये मोठ्या आकारात आढळले आहेत. इतर साठे मादागास्कर, रशिया, टांझानिया आणि श्रीलंकेत आहेत. श्रीलंकेत नदीपात्रातील गोट्यांमध्ये ‘मांजरीचा डोळा’ या प्रकारातील क्रिसोबेरील मोठ्या प्रमाणात मिळतो.

संदर्भ :

  • Ramchandran,T. & Panjikar J. Gemstones – Properties & Identification, Pangem Publishers, Pune, 2016.
  • Simon & Schuster’s, Guide to Gems and Precious Stones, K. Lyman, 1996.

   समीक्षक : उदय कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.