शुद्धीकरण केलेल्या सांडपाण्याचे अशा पद्धतीने निस्सारण करणे की ज्यामुळे कारखान्याच्या परिसराबाहेर एकही थेंब जाणार नाही या पद्धतीला शून्य सांडपाणी विसर्ग प्रणाली म्हणतात, ह्यामुळे पर्यावरण प्रदूषणाची तीव्रता कमी होते, कारखान्यांना त्यांच्या पाण्याचा कमी वापर करता येतो, काही वेळा सांडपाण्यापासून काही उपयुक्त पदार्थ मिळवता येतात.
कारखान्यांचे वर्गीकरण साधारणपणे असे करता येते : (१) उत्पादनप्रक्रियेत खूप पाणी वापरावे लागणारे कारखाने; उदा कापड, कागद, रबर,अन्नपदार्थ बनवणारे, लोखंड आणि पोलाद उत्पन्न करणारे, इ. अशा कारखान्यांत पाणीबचतीला आणि पुनर्चक्रीकरणाला मोठा वाव असतो. (२) विविध प्रकारची रसायने वापरणारे आणि त्यापासून अनेक नवे पदार्थ आणि रसायने तयार करणारे, त्यांच्या सांडपाण्यापासून वेगवेगळे उपपदार्थ बनवण्यास वाव असतो. (३) उत्पादनामध्ये विषारी आणि धोकादायक पदार्थ वापरणारे. ज्याप्रमाणे ह्या कारखान्यांचा माल विषारी असतो, उदा., कीटनाशके, वनस्पतीनाशके, शैवालनाशके, तसेच उत्पादनात वापरलेल्या रसायनांचा थोडासा भाग सांडपाण्यात असतो, त्यामुळे त्यांच्या पुनर्चक्रीकरणाचा किंवा पुनर्वापराचा विचार अत्यंत जपून करावा लागतो.

ह्या प्रणालीचा आराखडा तयार करताना पुढील गोष्टींचा विचार केला जातो : अतिरिक्त शुद्धीकरण करताना नवीन दूषितके उत्पन्न होऊ नयेत, सांडपाण्यातून काढलेली दूषितके कोरड्या पावडर किंवा पाण्याचे अत्यंत कमी प्रमाण असलेल्या गाळाच्या रूपात असावीत आणि ही दूषितके साठवण्याची व्यवस्था फक्त कारखान्याच्या परिसरातच असावी.
एखाद्या कारखान्यास ZLD पद्धत वापरायची असेल तर पुढील उपायांची मदत होते : उत्पादनादरम्यान कमीतकमी पाणी व रसायने वापरणे, त्यातून उत्पन्न झालेल्या सांडपाण्याचा कारखान्यात (किंवा त्याच्या परिसरात) योग्य ठिकाणी वापर करणे, सांडपाण्यातून मिळवता येतील तेवढे उपपदार्थ मिळवणे आणि कारखान्यात जास्तीतजास्त स्वच्छता पाळणे.
ही पद्धत यशस्वीपणे राबवणाऱ्या काही उद्योगांची नावे पुढे दिली आहे : कापसापासून कापड बनवणे, कोळसा वापरणारे औष्णिक विद्युत केंद्र, मद्यार्कशाळा, मळीपासून मद्य, धान्यापासून मद्य, औषधे, शीतपेये, तांबे शुद्धीकरण इत्यादी.
संदर्भ :
- Rane, R.; Deshpande K. Textile effluent recycle – a case study, Paper presented at the 8th International Conference on water conservation and reuse. (2003).
- Robinson, B. Effluent treatment for raw wool waste liquors. Textile Technology Technical Information Letter, New Zealand, 1992.
- Tank, R. et al. Study on feasibility of reverse osmosis for reuse of effluent channel wastewater in Vadodara, Gujarat. Indian Journal of Environmental Health NEERI, Nagpur, Vol. 41, 1999.
- Thiruppathi, K. Wastewater management in nonferrous metallurgical plant in India. Journal Indian Association for Environmental Management. Vol.32, P. 32, 2005.
समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.