चर्च वास्तूमधील प्रवेशद्वाराजवळील विशिष्ट जागा. गॅलिलीला नार्थेक्स (व्हरांडा) असेही म्हणतात. परंतु गॅलिली आणि नार्थेक्स दोन्ही चर्चमधील प्रवेशद्वाराजवळील जागा असली, तरी त्यांची ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय कार्ये वेगवेगळी आहेत. नार्थेक्स हे एक सामान्य प्रवेशद्वार आहे, तर अनेकदा कॅथीड्रलमध्ये आढळणारा गॅलिली हा नार्थेक्सचा एक विशिष्ट प्रकार आहे. गॅलिली ही संज्ञा सामान्यतः गॉथिक वास्तुकलेत वापरली जाते.

चर्चच्या पश्चिम टोकाला जोडलेली एक वेगळी आणि बाहेर आलेली चॅपलसारखी गॅलिलीची रचना असते. ही जागा जे लोग आंतरिक वर्तुळाच्या बाहेरील असतात, अशा परधर्मीयांसाठीच्या जागेचे प्रतिनिधित्व करते. तर ज्यांना मुख्य चर्चमध्ये प्रवेश नसतो अशा महिला नातेवाईकांना धर्मगुरू या जागेत भेटू शकतात. हा भाग चर्चच्या रुंदीचा असतो आणि चर्चमधील नेव्हला जोडलेला असतो. नेव्ह आणि गॅलिली यामध्ये जाळीदार भिंत अथवा खांबांची रांग असते.

चर्चमधील नेव्हच्या पश्चिम टोकाला नार्थेक्सची रचना आढळतो. सामान्यतः ते चर्चच्या पश्चिम भागात संपूर्ण रुंदीत पसरलेले असते. या भागात मुख्य प्रवेशद्वार असून ही जागा बाहेरील जग आणि आतील पवित्र जागा यांच्यातील एक संक्रमणकालीन जागा म्हणून काम करते. बायझंटिन वास्तुशैलीतील एक्सोनार्थेक्स आणि एसोनार्थेक्स अशी दोन भाग होते. एक्सोनार्थेक्स हे चर्चेचे बाहेरील प्रवेशद्वार असून ते एसोनार्थेक्सला वेढलेले होते. एसोनार्थेक्स हे चर्चमधील नेव्ह या ठिकाणी उघडते. ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीच्या काळात चर्चचा नार्थेक्स हा एकमेव भाग होता जिथे बाप्तिस्म्याच्या संस्काराची तयारी करणारे आणि प्रायश्चित्त करणाऱ्यांना प्रवेश दिला जात असे.

गॅलिली असा प्राचीन पॅलेस्टाइनचा सर्वात उत्तरेकडील प्रदेश असून तो आधुनिक इझ्रालचा उत्तरेकडील भूभाग आहे. दक्षिण लेबनॉन आणि उत्तर इस्त्रायल मधील गॅलिली या भागातून प्रवास करत ख्रिस्त जेरुसलेम येथे पोहोचला याचे स्मरण म्हणून चर्चमधील धार्मिक मिरवणूक गॅलिली येथून सुरू करतात.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/topic/galilee-church-architecture
  • https://en.wikipedia.org/wiki/Galilee_(church_architecture)
  • https://www.durhamworldheritagesite.com/learn/architecture/cathedral/intro/galilee-chapel#:~:text=The%20name%20Galilee%20was%20often,entry%20into%20Jerusalem%20from%20Galilee

समीक्षक : श्रृती बर्वे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.