भारतातील ओडिशा राज्यातील कोनारक येथील सूर्यदेवाला समर्पित मंदिर. सूर्यमंदिराचे भग्न अवशेष आज उपलब्ध असून मंदिराचा गाभारा आणि आतील सूर्यमूर्ती, तसेच इतर लहानमोठे भाग उद्ध्वस्त झालेले आहेत. मंदिराच्या बांधकामाबाबत तज्ञात मतैक्य नाही. तथापि १२३८—६४च्या दरम्यान ओडिशावर राज्य करणारा गंगवंशीय पहिला नरसिंहदेव राजा आणि त्याची पत्नी सीतादेवी यांनी सूर्यमंदिर उभारले, याबद्दल बहुतेक तज्ञांनी मतैक्य व्यक्त केले आहे. त्यांनी आपला कीर्तिस्तंभ सूर्यमंदिराच्या रूपाने उभा केला.
सूर्यमंदिर सु. २५९ मी.(पूर्व-पश्चिम) लांब X १६७ मी (उत्तर – दक्षिण) रुंद आहे. त्याची रचना बाह्यबाजूने संयुक्त वाटत असली, तरी प्रत्यक्षात तीन उपमंदिरांनी जोडलेले गर्भगृह (विमान – शिखर), जगमोहन (महामंडप), नटमंडप आणि भोगमंडप अशा प्रमुख भागांमध्ये मंदिर विभागले आहे. मुख्य मंदिरात गर्भगृह, जगमोहन मंडपांचा समावेश होत असून त्याच्या पूर्व दिशेला नटमंडप आणि नटमंडपाच्या आग्नेय दिशेला भोगमंडप बांधले आहे. नटमंडपाच्या मध्यभागी चार स्तंभ उभारण्यात आले आहे.

सूर्यमंदिर नागर-शिल्पशैलीच्या कलिंगनामक उपशैलीचे निदर्शक आहे. मंदिराच्या जोत्यावर चोवीस रथचक्रे (सु. ३.७ मी. व्यासाची) कोरलेली असून रथ खेचण्यासाठी सात घोडे त्याला जुंपण्यात आलेले आहेत. सु. ३ मी. उंचीच्या चौथऱ्यांवर गर्भगृह, जगमोहन इत्यादींची रचना आहे. गर्भगृह आतील बाजूने सु. २.५ चौ.मी. असून तीन बाजूंना त्याच चौथऱ्यांवर सूर्यमूर्ती स्थापित उपमंदिरे आहेत. गर्भगृहाच्या समोरचा जगमोहन मंडपाचा चौथरा ९ चौ.मी. व आतील दालन ६ चौ.मी. आहे. त्याची उंची सु. ३० मी. आहे. त्यास तिन्ही बाजूंनी दारे आणि खाली उतरण्यास पायऱ्या आहेत. जगमोहनाच्या मस्तकाचे बांधकाम करताना स्थिरता प्रदानकारण्याकरिता मस्तकाच्या खालील बाजूस भरीव लोखंडी तुळई स्थापित करण्यात आल्या होत्या. पूर्वेकडील पायऱ्यांत तीन स्तबके व दुतर्फा घोडे बसविलेले आहेत. गर्भगृह व जगमोहन यांची एकत्रित लांबी ९० मी. आणि रुंदी ६० मी. आहे. पायऱ्यांसमोर सु. ९ मी. अंतरावर नटमंडप असून त्याचा चौथरा ६.५ चौ.मी. आणि मंडप ४.५ चौ.मी. आहे. सर्वसाधारणतः मंदिरावरच्या भिंतींची उंची सु. १२ मी. आणि त्यांवर छपराचा भाग आहे. त्या तीन मजल्यांच्या असून वर निमुळत्या होत गेल्या आहेत. सर्वांत वरचा मजला गोल विधानाचा असून त्यावर आमलक आहे. जगमोहनापेक्षा शिखराची उंची दुप्पट असल्याने तेथेही संगती साधली आहे. नटमंडप आकाराने जगमोहनाच्या निम्मा पण तळमजला, छप्पर व घाट या बाबतींत त्यासारखाच आहे.

सूर्यमंदिरामध्ये गजथर, नरथर ही पारंपरिक प्रतिमाने सर्वत्र आढळतातच, पण यांशिवाय अत्यंत मनोवेधक आकारांचे व घाटांचे भित्तिस्तंभ, नैसर्गिक व भौमितिक रचनाबंध, गज, सिंह, व्याल अशांसारखे अजस्त्र प्राणी, तसेच विविध हावभावांतील व असंख्य मुद्रा धारण करणारे स्त्री-पुरुष या सर्वांचे येथे विलक्षण साक्षेपाने शिल्पांकन केलेले आहे. मानवी मूर्तींत जगमोहनाच्या वरच्या मजल्यावर बसविण्यात आलेल्या मृदंग व झांज वाजविणाऱ्या स्त्रीमूर्ती, त्यांच्या शरीराचा डौलदार घाट, हालचालीतील लय आणि चेहऱ्यावरील भिन्न भाव लक्षणीय आहे. संभ्रम-विभ्रमादी आविर्भावांतील आणि मीलनचुंबनादी सर्व लैंगिक अवस्थातील ही शिल्पांकने कामोत्सुक भावनाधारित बहुतेक मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर खोदलेली आहेत. कामशिल्पांशिवाय अजस्त्र हत्ती, हत्तींची रांग, विजयी योद्ध्यांचे स्वागत, राजास व सैनिकांस निरोप इत्यादी विषय स्पष्ट करणारी विविध शिल्पे अप्रतिम आहेत.

सूर्यमंदिराचा पाया मजबुत आणि एकसंध राहण्यासाठी घर्षण स्थूणा तंत्रपद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वालुकामय मातीतसुद्धा ऊर्ध्व दिशेने प्रतिरोधक बल मंदिराला प्रदान होते. मंदिर समुद्रतटानजीक असल्याने समुद्री खारी-हवा आणि वादळे यांमुळे मंदिरांच्या दगडाचे क्षरण होऊ नये म्हणून बांधकामात झुकणाऱ्या टप्पा पद्धतीचा वापर करून जांभा दगड (लॅटोराइट; Laterite), क्लोराइट आणि कोंडालाइट प्रकारच्या दगडाचा वापर केला आहे. मंदिराचे पूर्व दिशेकडील मुख्य द्वार आणि मुख्य मंदिरातील तीन उपमंदिरे यांवरील पार्श्वदेवतांची शिल्पे क्लोराइट दगडांचा वापर करून तयार केले आहे. कोनारकच्या मंदिरास पांढरा वालुकाश्म व क्लोराइट दगड वापरला आहे. त्यांस अनुक्रमे ‘फूल खाडिया’ आणि ‘मुग्नी’ अशी स्थानिक नावे आहेत. हा दगड खडबडीत पण टणक आहे, त्यामुळे मूर्तिकारास बारीकसारीक शिल्पांकन करण्यास सुलभ झाले आहे. या मंदिराची वैशिष्टपूर्ण रचना सूर्याची सौरमंडळामधील प्रक्षेपपथ आणि गतीचे आकलन करून देते. मंदिराची रचना करताना मंदिराच्या गर्भगृहाची कल्पना एक पुरुष आणि जगमोहन एक स्त्री म्हणून केली आहे.
सूर्यमंदिर सु १९॰५३’ उत्तर आणि ८६॰५’ पूर्व अक्षांवर स्थित आहे. सूर्याच्या दक्षिणायन-उत्तरायन संक्रमणामुळे वर्षातून दोन वेळा मंदिराच्या पूर्वेकडील मुख्यद्वारामधून थेट गर्भगृहातील सूर्यनारायणाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे २.५॰ आणि १॰ अंशाचा कोन करून १०-१२ दिवस प्रक्षेपित होत असतात. सूर्यमंदिराला युनेस्कोद्वारे १९८४ मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये नामनिर्देशित केले असून २०२२ पासून प्रवेशद्वाराच्या पुनर्बांधणी करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला.
संदर्भ :
- https://www.britannica.com/place/Konark-Sun-Templeकोनारक
- Dey, Anil, The Sun Temple of Konark, 2016.
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.