नेमिनाथ : जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी बाविसावे तीर्थंकर. त्यांचा जन्म यदुवंशामध्ये सौरिपूर (सध्याचे आग्राजवळील एक ठिकाण) येथे झाला. परंपरेनुसार ते तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांच्या ८४,००० वर्षे आधी होऊन गेले, असे म्हटले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव राजा समुद्रविजय आणि आईचे शिवादेवी होते. बलदेव आणि वासुदेव हे त्यांचे चुलत भाऊ मानले जातात. त्यामुळे त्यांच्या जीवनकथेचा संबंध वैष्णव परंपरेशीही दिसून येतो.

नेमिनाथ शिखरावरील देवालय : एक विहंगम दृश्य.

अरिष्टनेमी यांना नेमिनाथ, अरिष्टनेमिनाथ या नावांनीही ओळखले जाते. नेमिनाथ हे नाव दोन संस्कृत शब्दांनी बनलेले आहे. नेमी म्हणजे ‘चाकाचा काठ वा कडा’ किंवा ‘वीज’ आणि नाथ म्हणजे ‘स्वामी, आश्रयदाता, रक्षक’. श्वेतांबर जैन ग्रंथांमध्ये त्यांच्या नावाचा अरिस्तनेमी असा उल्लेख असून, हे नाव त्यांच्या आईला गर्भधारणेदरम्यान पडलेल्या स्वप्नातून आले आहे, अशी एक पुराणकथा आहे. ज्यात तिने ‘अरिस्टा रत्नांचे चक्र’ पाहिले. जे सूर्यरथाचे विशेषण आहे.

नेमिनाथ यांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. करुणा व अहिंसा या तत्त्वांचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. त्यांचे चरित्र भारतीय तत्त्वज्ञानात नैतिकतेचा उच्च आदर्श मानले जाते. भगवान ऋषभदेव, पार्श्वनाथ आणि महावीर यांच्याप्रमाणेच नेमिनाथ यांनाही जैन धर्मातील अत्यंत पूजनीय तीर्थंकरांपैकी एक तीर्थंकर मानले जाते. त्यांच्या मूर्तींमध्ये त्यांचे प्रतीक म्हणून नावाप्रमाणेच हरीण, महावेणू वृक्ष, सर्वाण्ह (दिगंबर) किंवा गोमेद (श्वेतांबर) यक्ष आणि अंबिका यक्षी यांचा समावेश आहे. त्यांचे ‘शंख’ हे प्रतीक आहे. श्वेतांबर परंपरेत नेमिनाथ यांचा रंग कृष्णवर्णीय दर्शविला जातो, तर दिगंबर परंपरेत निळा मानला जातो.

नेमिनाथ हे देखणे राजपुत्र होते. राजपुत्र म्हणून त्यांचे जीवन अत्यंत वैभवशाली होते. त्यांच्याकडे सर्व प्रकारची ऐहिक सुखे उपलब्ध होती. पण त्यांचे मन आध्यात्मिकतेकडे झुकलेले होते. ते करुणामय आणि संवेदनशील स्वभावाचे होते. त्यांचा विवाह राजमती (राजुल) हिच्याशी ठरला होता. विवाहभोजनासाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल केली जाणार होती. त्या जनावरांचे आक्रोश ऐकून व क्रूरता पाहून त्यांना फार दुःख झाले; त्यांच्या अंतःकरणात करुणा जागृत झाली. त्यांनी तत्काळ जनावरांना मुक्त केले. विवाह त्यागून संन्यास स्वीकारला आणि कठोर तपश्चर्या केली. त्यांनी इंद्रियांचे संयमन, ध्यान आणि आत्मशुद्धी यांवर भर दिला. त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांना आत्मज्ञानाच्या उच्च पातळीवर पोहोचता आले.

नेमिनाथ यांनी दीक्षा घेतल्यानंतरच्या ५६ व्या दिवशी ते ‘क्षपक-श्रेणी’ या अवस्थेपर्यंत पोहोचले. जी तपश्चर्येची सर्वोच्च अवस्था मानली जाते. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवशी, दुपारच्या वेळी, एका बांबूच्या वृक्षाखाली त्यांना ‘केवलज्ञान’ प्राप्त झाले. त्यांनी जीव, अजीव, कर्म, बंधन आणि मोक्ष यांचे तत्त्वज्ञान स्पष्ट केले. त्यांच्या उपदेशात सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.

जैन ग्रंथांनुसार नेमिनाथ यांचे ११ गांधार होते आणि वरदत्तो स्वामी हे नेमिनाथ शिष्यांचे नेते होते. ‘कल्पसूत्रा’तील उल्लेखांनुसार नेमिनाथांच्या धार्मिक संघात १८,००० साधू (पुरुष भिक्षू) आणि ४४,००० साध्वी (महिला भिक्षू) होते, असे मानले जाते.

तीर्थंकर नेमिनाथ यांचे निर्वाण गिरनार (सौराष्ट्र, गुजरात) येथे झाले. त्यास नेमिनाथ शिखर म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी त्यांचे भव्य व संपन्न देवालय असून, जैनांचे हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. स्वयंभू (आठवे शतक) या कवीने नेमिनाथ यांचे ‘रिठ्ठणेमिचरिउ’ नावाचे चरित्र लिहिले. त्या चरित्राचे दुसरे नाव ‘हरिवंशपुराण’ असे आहे. त्याची यादव, कुरू, युद्ध व उत्तर ही चार कांडे असून यादव कांडात ‘हरिवंशा’च्या आधारे कृष्णजन्म, कृष्णाच्या बाललीला, विवाह तसेच प्रद्युम्न व तीर्थंकर नेमिनाथ यांच्या जन्मकथा आहेत. तर कुरू व उत्तर या दोन कांडांत कौरव-पांडवांच्या जन्मापासून भारतीय युद्धात पांडव विजय झाल्यापर्यंतची ‘महाभारत’ कथा आहे. या काव्याची शैली साधी, पण सुंदर आहे. उत्तर कांडात तीर्थंकर नेमिनाथ यांचे चरित्र आहे.

संदर्भ : 

  • Dundas, Paul, The Jains, Oxfordshire, 2002.
  • Glasenapp, Helmuth Von, Jainism : An Indian Religion of Salvation, Delhi, 1999.
  • Jaini, Padmanabh S. The Jaina Path of Purification, California, 1979.
  • Shah, Natubhai, Jainism : The World of Conquerors, Portland, 1998.
  • तुलसी, आचार्य, ‘जैन धर्म : एक परिचय’, १९९८.
  • मेहता, मोहनलाल, ‘जैन धर्माचा इतिहास’, २००५.
  • संघवी, पं. सुखलाल, ‘जैन धर्म आणि तत्त्वज्ञान’, २००१.

समीक्षक : सुनिलदत्त गवरे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.