जैन दर्शनातील सम्यक ज्ञानाच्या पाच प्रकारांपैकी असलेले तिसरे ज्ञान-प्रकार. जैन दर्शनात हे ज्ञान केंद्रस्थानी असून जीवाच्या मोक्षप्राप्तीसाठी दर्शन, ज्ञान व चरित्र ही त्रिरत्ने आवश्यक मानली जातात. ‘अवधिज्ञान’ म्हणजे इंद्रिये किंवा मनाच्या साहाय्याशिवाय आत्म्याच्या सामर्थ्याने थेट होणारे भौतिक वस्तूंचे (रूपी द्रव्यांचे) मर्यादित ज्ञान होय. अवधी म्हणजे ‘सीमा’ किंवा ’मर्यादा’−अर्थात काळ, क्षेत्र आणि द्रव्य यांच्या मर्यादेत राहून दूरचे किंवा सूक्ष्मरूपी पदार्थ पाहण्याची क्षमता होय. अवधी या शब्दाचा प्राकृत-अर्धमागधी रूप ‘ओहि’ असा आहे, तर अवधिज्ञान या शब्दाला प्राकृतमध्ये ‘ओहिणाण’ हा शब्द वापरला जातो.

जैन शास्त्रकारांनी ज्ञानाचे पाच प्रकार केलेले आहेत : (१) मतिज्ञान : इंद्रिये व मन यांच्या साहाय्याने होणारे ज्ञान. (२) श्रुतज्ञान : दुसऱ्याचा उपदेश ऐकून किंवा शास्त्र वाचून होणारे ज्ञान. (३) अवधिज्ञान : या ज्ञानामुळे स्थळांच्या व कालाचा काही मर्यादेपर्यंत सूक्ष्म, निरोहित व दूरस्थ पदार्थांचे ज्ञान होते. (४) मन:पर्यायज्ञान : यामुळे दुसऱ्याच्या मनातील विचार समजतात. (५) केवलज्ञान : संपूर्ण व शुद्ध ज्ञान. या पाच प्रकारच्या ज्ञानांमध्ये कुमती, कुश्रुत व कुअवधी ही तीन अज्ञाने मिळवून ज्ञानाचे आठ प्रकारही करतात.

‘अवधिज्ञान’ हा शब्द ‘अव’ आणि ‘धि’ यांपासून बनलेला आहे. ‘अव’ या उपसर्गाचा अर्थ खाली आणि ‘धि’चा अर्थ जाणणे असा आहे. अकलंकदेवांनी स्पष्ट केले की, अवधिज्ञानाचा विषय खालच्या दिशेने अधिक प्रचलित आहे. मलयगिरींनी ‘अधोविष्टमं वस्तु परिच्छिद्यते अनेन इति’ ही व्युत्पत्ती दिली आहे. याचा अर्थ असा की, जो खालच्या जगाला तपशीलवार जाणतो, त्याच्याकडे अवधिज्ञान असते. जैन दर्शनामध्ये ‘अवधिज्ञान’ ही अशा प्रकारची प्रत्यक्ष संवेदनशक्ती आहे, जी केवळ रूपधारी (मूर्त) पदार्थांपर्यंतच मर्यादित असते. हे एक प्रकारचे ‘दिव्यदृष्टीने होणारे ज्ञान’ (क्लेअरव्हॉयन्ट नॉलेज) असून त्याद्वारे तीनही लोकमधील असणाऱ्या भौतिक वस्तूंचे ज्ञान प्राप्त होत असते.

अवधिज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान असून त्याचे भवप्रत्यय व गुणप्रत्यय हे दोन प्रकार खालीलप्रमाणे दिलेली आहेत :

१. भवप्रत्यय अवधिज्ञान : जन्मजात प्राप्त होणारे ज्ञान. स्वर्ग आणि नरकातील जीवात्म्यांमध्ये ही नैसर्गिक क्षमता जन्मापासूनच असते. जैन तीर्थंकरांना भवप्रत्यय अवधिज्ञान जन्मापासूनच असते; परंतु जर ते टिकवून ठेवले नाही, तर त्यांनाही ते प्राप्त करावे लागते. हे ज्ञान काळ आणि स्थळ यांच्या बाबतीत मर्यादित असते.

२. गुणप्रत्यय (क्षायोपशमिक) अवधिज्ञान : साधना, तपश्चर्या आणि आत्मशुद्धी यांमुळे प्राप्त होणारे ज्ञान. मनुष्य आणि पशूंच्या जीवात्म्यांना ही क्षमता प्राप्त करावी लागते. ज्ञानाला अंशतः नाहीसे करून आणि अंशतः दडपून, म्हणजेच कर्माला एका विशिष्ट प्रकारे झाकून, निर्माण होणारी दिव्यदृष्टी केवळ पशू आणि मनुष्यांमध्येच शक्य आहे. गुणप्रत्यय अवधिज्ञानाचे सहा भेद आहेत : आनुगामिक, अनानुगामिक, वर्धमान, हीयमान, अवस्थित व अनवस्थित.

  • आनुगामिक अवधिज्ञान : ‘आनुगामिक’ या शब्दाचा अर्थ ‘मागे जाणारा’ किंवा ‘सोबत राहणारा’ असा होतो. आत्म्यासोबत उत्पन्न होणाऱ्या आणि त्याच्यासोबत असणाऱ्या अवधिज्ञानाला/दिव्यश्रवणज्ञानाला आनुगामिक ज्ञान म्हणतात. जे एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित राहत नाही, तर साधक किंवा जीव ज्या प्रदेशात स्थलांतर करतो, त्या नवीन ठिकाणीही त्याचे ज्ञान टिकून राहते. ते तीन प्रकारचे असते : क्षेत्रानुगामिक, भावनानुगामिक आणि क्षेत्रभावनानुगामिक.
  • अनानुगामिक अवधिज्ञान : जे ज्ञान साधकाच्या स्थानांतरानंतर त्याच्यासोबत टिकून राहत नाही, ते म्हणजे अनानुगामिक अवधिज्ञान होय. हे ज्ञान विशिष्ट ठिकाण, अवस्था किंवा परिस्थितीपुरते मर्यादित असते. ज्या क्षणी त्या परिस्थितीत बदल होतो, त्या क्षणी हे ज्ञानही लोप पावते. साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीनुसार हे ज्ञान अधिक स्थिर आणि व्यापक रूप धारण करू शकते. अनानुगामिक/असामान्य अवधिज्ञान तीन प्रकारचे आहे : क्षेत्राननुगामिक, भावनानुगामिक आणि कालाननुगामिक.
  • वर्धमान (वृद्धिंगत) अवधिज्ञान : ‘वृद्धिमान’ म्हणजे वाढणारे किंवा विस्तार पावणारे. या ज्ञानाची व्याप्ती, स्पष्टता आणि सूक्ष्मता कालांतराने वाढत जाते. हे ज्ञान आत्मशुद्धी, तप आणि कर्मक्षय यांच्या साहाय्याने विस्तारत जाते आणि साधकाला उच्च आध्यात्मिक अवस्थेकडे नेते. त्यामुळे हे ज्ञान केवळ बौद्धिक नसून आत्मिक उन्नतीचे एक द्योतक आहे.
  • हीयमान अवधिज्ञान : ज्यामध्ये ज्ञानाची व्याप्ती, स्पष्टता किंवा क्षमता कालांतराने कमी कमी होत जाते. हे अवधिज्ञान साधकाच्या आध्यात्मिक स्थितीचे प्रतिबिंब मानले जाते. ज्ञान टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संयम, तप आणि आत्मशुद्धी यांची अखंड साधना आवश्यक आहे.
  • अवस्थित (स्थित) अवधिज्ञान : ‘अवस्थित’ म्हणजे स्थिर किंवा कायमस्वरूपी स्थितीत असलेले असे ज्ञान, ज्यामध्ये त्याची मर्यादा, स्पष्टता आणि व्याप एका निश्चित स्तरावर स्थिर राहतो. हे ज्ञान एकदा प्राप्त झाल्यावर त्यामध्ये वाढ (वृद्धी) किंवा घट (ह्रास) होत नाही. ते ज्या प्रमाणात आणि ज्या मर्यादेत उत्पन्न झाले आहे, त्याच स्थितीत ते कायम टिकून राहते.
  • अनवस्थित (अस्थिर) अवधिज्ञान : बदलणारे किंवा चंचल स्वरूपातले ज्ञान. याची मर्यादा, स्पष्टता किंवा कार्यक्षमता सतत बदलत राहते. यात ज्ञानाची सीमा (अवधी) निश्चित राहत नाही. कधी ज्ञानाचा विस्तार वाढतो, तर कधी तो कमी होतो. त्यामुळे हे ज्ञान स्थिर स्वरूपाचे नसून परिवर्तनशील असते.

अवधिज्ञान हे ज्ञानावरणीय कर्मांच्या क्षय किंवा उपशमावर अवलंबून असते. जेव्हा हे कर्म कमी होते, तेव्हा आत्म्यातील ज्ञानशक्ती प्रकट होते आणि अवधिज्ञान प्राप्त होते. अवधिज्ञानात भ्रम किंवा शंका नसते. हे ज्ञान निश्चित (निश्चयात्मक) आणि स्पष्ट असते; कारण ते थेट आत्म्याच्या ज्ञानशक्तीतून उत्पन्न होते.

संदर्भ :

  • Dundas, Paul, The Jains, London, 2002.
  • Divakar, S. C. Glimpses of Jainism, Jaipur, 2002.
  • Jaini, Padmanabh S. The Jaina Path of Purification, California, 1979.
  • Kundakunda, Acharya; Trans. Chakravarti, A. Samayasara,  Bharatiya Jnanpith, New Delhi, 2008.
  • Matilal, Bimal Krishna, Perception : An Essay on Classical Indian Theories of Knowledge, Oxford, 1986.
  • Mehta, Mohan Lal, Outlines of Jain Philosophy, Bangalore, 1991.
  • Umāsvāti; Trans. Tatia, Nathmal, Tattvartha Sutra, Delhi, 1994.
  • आचार्य तुलसी, ‘जैन तत्त्वज्ञान परिचय’, लाडनूं, २००५.
  • आचार्य महाप्रज्ञ, ‘जैन तत्त्वज्ञान आणि ज्ञानमीमांसा’, लाडनूं, २००८.
  • जैन, सागरमल, ‘जैन ज्ञानमीमांसा’, वाराणसी, १९९५.
  • भारिल्ल, हुकमचंद, ‘जैन तत्त्वज्ञान’ (भाग १ व २), जयपूर, २०१०.
  • मालवणिया, पं. दलसुख, ‘जैन आगमांचे तत्त्वज्ञान’, गुजरात विद्यापीठ प्रकाशन, अहमदाबाद, २००१.
  • मेहता, मोहनलाल, ‘जैन धर्म आणि तत्त्वज्ञान’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००२.
  • संघवी, पं. सुखलाल, ‘जैन दर्शन’, अहमदाबाद, १९९८.

समीक्षक : सुनिलदत्त गवरे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.