ब्लॅकवेल, एलिझाबेथ : (३ फेब्रुवारी १८२१ — ३१ मे १९१०). ब्रिटिश-अमेरिकन वैद्य. अमेरिकेत वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली महिला आणि युनायटेड किंगडमच्या जनरल मेडिकल काउन्सिलच्या वैद्यकीय नोंदणीमध्ये स्थान मिळवणारी पहिली महिला म्हणून त्या उल्लेखनीय आहेत. त्यांना आधुनिक काळातील पहिल्या महिला वैद्य मानल्या जातात. त्या समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षण क्षेत्रात विशेषतः स्त्रियांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावे यासाठी जनजागृती करणाऱ्या त्या आद्य कार्यकर्त्या होत्या.
ब्लॅकवेल यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. कुटुंबातील प्रौढ सुधारक मताचे असल्याने गुलामगिरी प्रथा बंद करणे, स्त्रियांना समान हक्क मिळवणे, बालकामगारांची पिळवणूक थांबवणे अशा विविध मुद्यांवर घरीच चर्चा होत असते. पुढे त्यांचे कुटुंब १८३२मध्ये अमेरिकेत कायमच्या वास्तव्यासाठी गेले आणि तेथे त्यांनी शाळा सुरू केली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांसाठी शिक्षकी पेशा समाजमान्य असल्याने त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. परंतु नंतर त्यांचा शिक्षकी व्यवसायतील रस कमी झाला.
ब्लॅकवेल यांनी सहानुभूती वैद्यांकडून खाजगीरित्या वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि १८४७ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यास सुरुवात केली. सर्व प्रमुख महाविद्यालयांनी त्यांचा अर्ज नाकारला, परंतु अखेरीस त्यांना न्यूयॉर्कमधील जिनीव्हा मेडिकल कॉलेजमध्ये (पूर्वीचे होबार्ट कॉलेज) प्रवेश मिळाला. तेथील त्यांच्या शिक्षणाची कारकीर्द अत्यंत जोखमीची होती. पुरुष विद्यार्थ्यांनी त्यांना वाळीत टाकले, त्यांचा छळ केला आणि सुरुवातीला त्यांना वर्गात प्रात्यक्षिके देण्यासही मज्जाव करण्यात आले. तथापि त्यांनी चिकाटीने प्रयत्न केले आणि जानेवारी १८४९ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्या अमेरिकेतील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला आणि आधुनिक काळातील पहिली महिला वैद्य बनल्यात. जिनीव्हा मेडिकल कॉलेजमध्ये पदवी परीक्षेसाठी त्यांनी ‘टायफस फिव्हर’ या संसर्गजन्य रोगावर प्रबंध सादर केला. हा प्रबंध नंतर बफेलो मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. पुढे त्या स्त्रीरोग आणि प्रसूती क्षेत्रात अधिक व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी इंग्लंड आणि पॅरीसला गेल्या (१८४९). तेथे असतांना दुर्दैवाने लहान बाळाचा जंतुसंसर्ग त्यांच्या डोळ्याला झाल्याने त्यांचा डोळा काढून टाकावा लागला आणि त्यांना शल्यचिकित्सक होण्याची आशा सोडून द्यावी लागली. नंतर इंग्लंडला परतून त्यांनी सेंट बार्थोलोम्यूज हॉस्पिटलमध्ये डॉ. (नंतर सर) जेम्स पॅगेट यांच्या हाताखाली काम करण्यातस सुरुवात केली. पुढे न्यूयॉर्कला आल्यावर (१८५१) त्यांना शहरातील रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये नोकरी नाकारण्यात आली. त्यांचा खाजगी व्यवसाय फार हळूहळू विकसित झाला आणि यादरम्यान त्यांनी व्याख्यानांची एक मालिका लिहिली. ही मालिका ‘द लॉज ऑफ लाइफ, विथ स्पेशल रेफरन्स टू द फिजिकल एज्युकेशन ऑफ गर्ल्स’ या नावाने प्रकाशित झाली (१८५२).
ब्लॅकवेल यांना स्त्री म्हणून वैद्यकीय व्यवसायातही विरोधाला तोंड द्यावे लागले. तरीही त्यांनी जिद्दीने चांगली सेवा देऊन व्यवसाय वाढवला. त्यांनी एका झोपडपट्टीत लहान दवाखाना उघडला (१८५३). काही वर्षांत त्यांची धाकटी बहीण डॉ. एमिली ब्लॅकवेल आणि डॉ. मेरी ई. झाक्रझेव्स्का यांच्यासोबत वैद्यकीय क्षेत्रात सामील झाल्या आणि विस्तारलेल्या त्या दवाखान्याची ‘न्यूयॉर्क इन्फर्मरी फॉर विमेन अँड चिल्ड्रन’ म्हणून नोंदणी करण्यात आली (मे १८५७). ग्रेट ब्रिटनच्या वर्षभराच्या व्याख्यान दौऱ्यादरम्यान, ब्रिटिश वैद्यकीय नोंदणीमध्ये नाव नोंदविणारी त्या पहिल्या महिला ठरल्या (जानेवारी १८५९). त्यांनी ‘विमेन्स सेंट्रल ॲसोसिएशन ऑफ रिलीफ’ आणि ‘यू.एस. सॅनिटरी कमिशन’ आयोजित करण्यास मदत केली आणि मुख्यत्वे पहिल्या संस्थेमार्फत युद्धसेवेसाठी परिचारिकांची निवड व प्रशिक्षण देण्याचे काम केले (१८६१).
ब्लॅकवेल यांनी इंग्लंडमधील फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्याशी मोठ्या प्रमाणावर सल्लामसलत करून विकसित केलेल्या आणि बऱ्याच काळापासून परिपूर्ण होत असलेल्या महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या रूपात यश आले (नोव्हेंबर १८६८). त्यांनी या महाविद्यालयात प्रवेश, शैक्षणिक आणि नैदानिक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रासाठी अत्यंत उच्च दर्जाचे निकष निश्चित केले. हे महाविद्यालय ३१ वर्षे कार्यरत राहिले त्यांत त्यांनी स्वच्छताशास्त्राच्या प्राध्यापक पदावर काम केले. त्यानंतर त्या कायमस्वरूपी इंग्लंडला स्थायिक झाल्यात (१८६९). त्यांनी तेथे यशस्वी खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मदत केली (१८७१) आणि लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन येथे स्त्रीरोगशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली (१८७५). त्यांनी हे पद १९०७ पर्यंत सांभाळले.
ब्लॅकवेल यांनी पुढीलप्रमाणे लेखन केले : ‘द रिलिजन ऑफ हेल्थ’ (१८७१), ‘काउन्सिल टू पेरेंट्स ऑन द मोरल एज्युकेशन ऑफ देअर चिल्ड्रन’ (१८७८), ‘द ह्यूमन एलिमेंट इन सेक्स’ (१८८४). आत्मचरित्रात्मक ‘पायोनियर वर्क इन ओपनिंग द मेडिकल प्रोफेशन टू वुमेन’ (१८९५) आणि ‘एसेज इन मेडिकल सोशियोलॉजी’ (१९०२).
ब्लॅकवेल यांच्या दृष्टिकोनाची आणि कार्याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी स्त्री-वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या स्त्रीला एलिझाबेथ ब्लॅकवेल नावाने पुरस्कार दिला जातो. तर १९०७ मध्ये अमेरिकन सरकारने त्यांचे एक पोस्टाचे तिकिट छापले. होबार्ट अँड विल्यम स्मिथ महाविद्यालय त्यांच्या नावे उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका महिला डॉक्टरला दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करते. ब्रिस्टल विद्यापीठाने एलिझाबेथ ब्लॅकवेल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्चची स्थापना केली (२०१३). पुलित्झर पारितोषिक विजेत्या आणि अमेरिकन लेखिका जॅनिस निमुरा यांनी एलिझाबेथ आणि एमिली या ब्लॅकवेल बहिणींचे चरित्र – ‘डॉक्टर्स ब्लॅकवेल’ लिहिले आहे (२०२१).
ब्लॅकवेल यांचे हॅस्टिंग्स, ससेक्स येथील राहत्या घरात पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले.
संदर्भ :
- https://www.newyorker.com/magazine/2021/02/01/the-blackwell-sisters-and-the-harrowing-history-of-modern-medicine
- http://www.columbia.edu/cu/lweb/archival/collections/ldpd_4079307/
- https://en.wikipedia.org/wiki/Elizabeth_Blackwell
- https://www.womenshistory.org/education-resources/biographies/elizabeth-blackwell
- https://www.newyorker.com/magazine/2021/02/01/the-blackwell-sisters-and-the-harrowing-history-of-modern-medicine
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.