जैनांचा एक कालचक्र विभाग. या कालचक्राचे जैनांनी दोन भाग केले आहेत. एक, वरून खाली येणारा अर्धा भाग म्हणजे अवसर्पिणी; तर दुसरा, खालून वर जाणारा अर्धा भाग म्हणजे उत्सर्पिणी. अवसर्पिणी व उत्सर्पिणी यांना अनुक्रमे निकृष्ट व उत्कृष्ट असे अभिप्राय दिले जाते. शिवाय ऱ्हास व विकास याही परिभाषा जोडल्या जातात. अवसर्पिणीला ‘अवसिपणी’ किंवा ‘अवसप्पिणी’ असेही म्हटले जाते. ज्याला अधोगती, अवरोही व ऱ्हासाचा काळ मानला जातो. जैन धर्मानुसार अवसर्पिणी व उत्सर्पिणी या दोहोंचे प्रत्येकी सहा विभाग पाडलेले आहेत. अवसर्पिणीत आयुष्य, शक्ती, उंची, नीतिमत्ता इ. गुणांचा ऱ्हास होतो. हा ऱ्हास पुढील सहा विभागांनी (आरांनी) क्रमश: होतो : १) सुषमा-सुषमा (परमसुख), २) सुषमा, ३) सुषमा-दु:षमा, ४) दु:षमा-सुषमा, ५) दु:षमा (दु:ख) आणि ६) दु:षमा- दु:षमा (अतिशय दु:ख). उत्सर्पिणीत हाच क्रम उलटा होऊन परमसुखप्रत जातो. अवसर्पिणीच्या चौथ्या विभागांत ६३ शलाकापुरुष जन्म घेतात. ह्या ६३ शलाकापुरुषांत २४ तीर्थंकरांचा अंतर्भाव होतो.
१. सुषमा-सुषमा (अत्यंत सुखदकाळ) : या टप्प्याचा कालखंड अत्यंत आनंदमय आणि दुःखरहित मानला जातो. या काळात मानवाला कोणत्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक दुःख नसते. कल्पवृक्षांच्या माध्यमातून सर्व गरजा आपोआप पूर्ण होतात. या काळात लोकांचे आयुष्य खूप मोठे आणि शरीर अजस्र असते. हा काळ पूर्णतः नैसर्गिक सौहार्द आणि आध्यात्मिक परिपूर्णतेचा मानला जातो. त्यांना कल्पवृक्षांकडून सर्व इच्छित वस्तू मिळतात.
२. सुषमा (सुखद काळ) : हा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा किंचित कमी सुखद असला, तरी तोही अत्यंत आनंददायी मानला जातो. दुःखाचे अस्तित्व अत्यल्प असते. लोकांचे आयुष्य आणि शरीरशक्ती अजूनही प्रचंड असते; परंतु पहिल्या टप्प्याच्या तुलनेत किंचित घट दिसू लागते. कल्पवृक्ष अजूनही उपलब्ध असतात आणि मानवी गरजा सहज पूर्ण होतात.
३. सुषमा-दुःषमा (सुख-दुःखद काळ) : हा संक्रमणाचा काळ मानला जातो. या काळात सुखाचे प्रमाण अधिक असले, तरी दुःखाची सुरुवात होते. कल्पवृक्षांची शक्ती कमी होऊ लागते आणि मनुष्याला श्रम करण्याची आवश्यकता भासते. जैन परंपरेनुसार प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांनी याच काळात सामाजिक जीवनाचे शिक्षण दिले.
४. दुःषमा-सुषमा (दुःख-सुखद काळ) : सुख आणि दुःख यांचे मिश्र स्वरूप असलेला हा कालखंड आहे. या काळात दुःखाचे प्रमाण वाढते; तरी काही प्रमाणात सुख अस्तित्वात असते. जैन परंपरेनुसार बहुतेक तीर्थंकरांचा जन्म याच काळात झाला. महावीर यांचे जीवनही या काळात मानले जाते. आध्यात्मिक साधनेचा विकास होत असला, तरी सामाजिक संघर्ष वाढतात.
५. दुःषमा (दुःखद काळ) : हा दुःखप्रधान कालखंड आहे. या काळात धर्म, कर्म, नीतिमूल्ये इ. गुणांचा हळूहळू ऱ्हास होत जातो. जैन दृष्टिकोनातून हा काळ आध्यात्मिक अधःपतनाचा मानला जातो; तरीही मोक्षमार्ग पूर्णतः बंद झालेला नसतो. जैन मतानुसार सांप्रत हा काळ चालू असून तो २१ हजार वर्षांचा मानला जातो.
६. दुःषमा-दुःषमा (अत्यंत दुःखद काळ) : हा काळ अत्यंत दुःखमय आणि अधःपतनाचा मानला जातो. मानवी आयुष्य अत्यंत अल्प होते आणि सतत संघर्षमय जीवन जगावे लागते. या काळात नैसर्गिक आपत्ती, रोगराई आणि सामाजिक अस्थिरता वाढते. धर्माचा प्रभाव जवळ जवळ नाहीसा होतो. या टप्प्यानंतर अवसर्पिणी समाप्त होऊन उत्सर्पिणीची सुरुवात होते, म्हणजेच पुन्हा क्रमशः उन्नतीकडे जाणारे कालचक्र आरंभ होते.
संदर्भ :
- Jain, Chand, Jainism, New Delhi, 2011.
- Jaini, J. L. The Universe According to Jainism, New Delhi, 1960.
- Shah, Natubhai, The Jaina Path of Purification, New Delhi, 1998.
- आचार्य तुलसी, ‘जैन दर्शन’, आदर्श साहित्य संघ, २००५.
- जैन, पं. महेंद्रकुमार, ‘जैन धर्म आणि तत्त्वज्ञान’, भारतीय ज्ञानपीठ, २००८.
- जैन, सागरमल, ‘जैन तत्त्वविद्या’, पार्श्वनाथ विद्यापीठ, २०१२.
समीक्षक : सुनिलदत्त गवरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
