गर्डन, सर जॉन बरट्रण्ड : (२ ऑक्टोबर १९३३ — ७ ऑक्टोबर २०२५). ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ. त्यांनी सर्वप्रथम अंडपेशी विभेदित (परिपक्व) पेशींच्या केंद्रकांना पुन:कार्यक्रमण करू शकत असल्याचे सिद्ध केले. यामुळे पेशी बहुशक्तिक (प्लुरिपोटेंट) अवस्थेत परत येतात आणि कोणत्याही प्रकारच्या पेशी बनण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करतात. या शोधाकरिता त्यांना शिन्या यामानाका यांच्यासह २०१२ चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. गर्डन यांच्या कार्यामुळे कृंतक (क्लोनिंग) आणि मूलपेशपी (स्टेम सेल) संशोधनातील प्रगतीचा पाया घातला गेला. ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ सर इयान विल्मुट यांनी यशस्वी रीत्या क्लोन केलेल्या डॉली शेळीची निर्मिती केली आणि जपानी वैद्य व संशोधक शिन्या यामानाका यांनी प्रेरित बहुशक्तिक मूलपेशींचा (प्लुरिपोटेंट स्टेम पेशी; iPS) शोध लावला. त्यामुळे पुनरुत्पादक औषधशास्त्राच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
गर्डन यांचा जन्म न्यू हॅंपशायर परगण्याच्या एका गावातील सुखवस्तू कुटुंबात झाला. लहानपणी त्यांना वनस्पती आणि कीटकांची आवड होती. फुलपाखरे, पतंग आणि सुरवंट गोळा करणे त्यांचा छंद होता. विज्ञानातील प्रगती बघून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना विज्ञान शिकण्यास प्रतिबंध केल्याने त्यांनी प्राचीन ग्रीक, लॅटिन आणि आधुनिक भाषेचा अभ्यास केला. पुढे त्यांना ऑक्सफर्डच्या क्राइस्ट चर्च विद्यापीठात अभिजात साहित्याचा अभ्यास पुढे चालू ठेवण्याचा मानस होता, परंतु त्यांना त्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला नाही. पुढे त्यांनी ऑक्सफर्डच्या प्राणिशास्त्र विभागात प्रवेश घेऊन बी.एस. पदवी संपादन केली (१९५६). नंतर भ्रूणशास्त्रज्ञ मिखाईल फिशबर्ग यांच्या प्रयोगशाळेत पदव्युत्तर शिक्षण सुरू केले. तेथे त्यांनी आफ्रिकन बेडकावर (झेनोपस लेविस) केंद्रक हस्तांतरण (स्वतःचे केंद्रक काढून टाकलेल्या अंडपेशीमध्ये विभेदित पेशीतील केंद्रक टाकणे) करण्याच्या संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी सिद्ध केले की, अंडपेशी पूर्वी विभेदित झालेल्या केंद्रकांना अविभेदित करू शकतात आणि या तंत्राने सामान्य भ्रूण तयार केले जाऊ शकतात. त्यांनी १९५८ मध्ये हे महत्त्वपूर्ण निष्कर्ष प्रकाशित केले. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर (१९६०) त्यांना पासाडेना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करण्यासाठी एक वर्षासाठी पोस्टडॉक्टरल अधिछात्रवृत्ती देण्यात आली. तेथे त्यांनी जिवाणूंना संसर्ग करणाऱ्या विषाणूंच्या (बॅक्टेरिओफेजेस) जनुकीय रचनेचा अभ्यास केला. ऑक्सफर्डला परतल्यावर ते प्राणिशास्त्र विभागात प्राध्यापक झाले आणि पेशी विभेदनादरम्यान होणाऱ्या केंद्रक बदलांचे स्वरूप स्पष्ट करण्याचे संशोधन चालू ठेवले. पुढे ते केंब्रिजमधील मेडिकल रिसर्च काउन्सिल लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी येथे रुजू झाले (१९७१) आणि १९७९ मध्ये तेथेच ते पेशी जीवशास्त्र विभागाचे प्रमुख झालेत. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पेशी जीवशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारले (१९८३). नंतर ते वेलकॉम ट्रस्ट/कॅन्सर रिसर्च कॅम्पेन इन्स्टिट्यूट (नंतर वेलकॉम ट्रस्ट/कॅन्सर रिसर्च यूके गर्डन इन्स्टिट्यूट) येथे दाखल झालेत. त्यांनी २००१ पर्यंत या संस्थेचे संचालकपद भूषविले. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ संशोधनावर लक्ष केंद्रित केले.
गर्डन यांनी परिपक्व पेशीचे पुन्हा मूलपेशीमध्ये रूपांतरण करणारे संशोधन केले. एका जनुकबाह्य अनुवंशिकीच्या व्याख्येप्रमाणे एका पेशीतून दुसऱ्या पेशीत प्रेषित केलेला (एका पिढितून दुसऱ्या पिढीत) डीएनए आणि त्यांचे दृश्य प्रारुप फक्त डीएनए क्रमावर अवलंबून नसते. जनुकबाह्य आनुवंशिकीनुसार तोच जनुक क्रम विविध दृष्य प्रारुपाचे कारण असतो. एकयुग्मनज जुळी किंवा क्लोन सजीवामध्ये हे आढळते. अनेक रसायनांमुळे डीएनए आणि आरएनए यांच्यावर परिणाम होऊन त्यांच्यापासून बनणारी प्रथिने बदलतात. याला अनुवंश बाह्य बदल म्हणतात. उदा., मिथिलीकरण, क्रोमॅटिन पुनर्रचना इत्यादी. कर्करोग व अनेक मानवी आजारांमध्ये यांचा परिणाम आढळून आला आहे.
गर्डन यांना पुढील अनेक मान सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे : रॉयल सोसायटीतर्फे अधिछात्रवृत्ती (१९७१), रॉयल मेडल (१९८५), कॉप्ले पदक (२००३), ब्रिटिश सरकारची सर (नाइट) पदवी (१९९५), अल्बर्ट लास्कर बेसिक मेडिकल रिसर्च ॲवॉर्ड (यामानाका यांच्यासोबत विभागून; २००९). यू.एस. नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फॉरेन असोसिएट (१९८० ) इत्यादी.
गर्डन यांचे केंब्रिज येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #केंद्रक #क्लोनिंग
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/2012/gurdon/biographical/
- https://en.wikipedia.org/wiki/John_Gurdon
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.