बोल्यॅश, एंद्रे अलिक्सांद्र : (१० जानेवारी १९२० —२९ ऑगस्ट २०१५). हंगेरियन वैद्य, संशोधक आणि व्यावसायिक. त्यांनी हायल्युरॉनिक आम्ल (किंवा हायल्युरॉनॅन) यांसारख्या निसर्गत: आढळणाऱ्या वंगणाचे रूपांतर संधिविकारांसाठी उपशामक औषधात तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी एका महत्त्वाच्या पूरक घटक निर्मित केले.
बोल्यॅश यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे झाला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण बुडापेस्ट विद्यापीठात झाले (१९४२). विद्यार्थी असतानाच त्यांनी काही काळ विद्यापीठात संशोधन साहाय्यकाचे कामही केले. त्यांनी शरीररचनाशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्र आंतरराष्ट्रीय सभेत वनस्पतींतील बहुवारिक कर्बोदकांचा (पॉलिसॅकराइड्स) वंगण म्हणून उपयोग करण्यासंबंधीचा शोध सादर केला. त्यानंतर त्यांनी प्राणिजन्य बहुवारिक कर्बोदकांचा विशेषत: हायल्युरॉनिक आम्लाचा वंगणासारखा उपयोग करणाऱ्या संशोधनाला सुरुवात केली. या विषयावर त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले. पुढे त्यांनी स्टॉकहोम स्वीडन येथील सहाव्या आंतरराष्ट्रीय पेशीशास्त्र परिषदेत ऊती संवर्धनात आणि पेशी बहुगुणित होण्याकरिता हायल्युरॉनिक आम्लाच्या सहभागावर संशोधन सादर केले. त्यांनी कॅरॉलिन्स्का इन्स्टिट्यूट येथे झाल्मर होल्मग्रेन यांच्या मार्गदर्शनाखाली हायाल्युरॉनिक आम्लाची रचना आणि अर्बुद निर्मितीत व जखमा भरून येण्यातला त्याचा सहभाग यांवर काम सुरू केले (१९४७). पुढे त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रेटीना फाउंडेशनमध्ये दृष्टिपटल आणि त्याच्या समोर परंतु डोळ्याच्या भिंगामागे असणाऱ्या जेलीसारख्या घट्ट व काचेसारख्या पारदर्शक नेत्रकाचाभ द्रवपदार्थ (सांद्ररस; व्हिट्रियस बॉडी ऑफ आय) यांचा अभ्यास केला. त्यांनी माकडे, पक्षी, मासे अशा विविध जातीच्या प्राण्यांच्या नेत्रकाचाभ द्रवपदार्थाचे निरीक्षण आणि पृथक्करण केले. त्यांना कोलॅजेन, व्हिट्रोसिन आणि हायल्युरॉनिक आम्ल नेत्रकाचाभ द्रवपदार्थात आढळले. त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी नेत्रकाचाभ द्रवपदार्थांची रचना, कार्य, घटना, निर्मिती याबद्दल सलग पंधरा वर्षे संशोधन केले. हा द्रवपदार्थ स्रवणाऱ्या पेशी त्यांना हायाल्युरॉनिक आम्लात सापडल्या. नंतर त्या पेशींना त्यांच्या गौरवार्थ बालाझ्सच्या हायालोसाइट्स (hyalocytes of Balazs) असे नाव देण्यात आले. डोळ्यातील दोन थर, दृष्टिपटल आणि त्याखालील रंजितपटल (Choroid) नेत्रकाचाभ द्रवपदार्थामुळे एकमेकांवर दाबून धरले जातात. नेत्रकाचाभ द्रवपदार्थ पातळ झाला वा कमी झाला तर काही ठिकाणी दृष्टिपटल सुटा होऊन दृष्टी मंद होऊ शकते. अन्य संयोजी ऊती प्रकारांतही त्यांना हायल्युरॉनिक आम्ल आणि तत्सम पदार्थ अधिक प्रमाणात आढळले उदा., विकसित होणाऱ्या कास्थींमध्ये विशेषत: नाकाचे टोक, बाह्यकर्ण. माशांच्या शरीरातही त्यांना हायल्युरॉनिक आम्ल यांचेशी साम्य असणारी आणि जटील रचना असणारी दोन संयुगे मिळाली. त्याला त्यांनी इक्थियोसान्स (ichthyosans) हे नाव दिले. हायल्युरॉनिक आम्ल आणि इक्थियोसान या प्रकारांचे पदार्थ सिमेंटसारखे बांधकाम माध्यम त्रिमित सांगाड्यासारखे उपयोगी पडतात. पुढे रेटीना फाउंडेशनने द इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल अँड मेडिकल सायन्सेस ऑफ रेटीना फाउंडेशन अशी संस्था बोल्यॅश यांच्या देखरेखीखाली स्थापन केली. मात्र १९६५ मध्ये नियामक मंडळाने विशुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बॉस्टन बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (नंतरचे नाव चार्ल्स स्केपेन्स आय इन्स्टिट्यूट) या संस्थेची स्थापन केली.
बोल्यॅश यांनी हायल्युरॉनिक आम्ल शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी टोचून घेतल्यावर डोळ्यातील नैसर्गिक नेत्रकाचाभ द्रवपदार्थात कमी असल्यास त्याचा वापर करता येतो, असे शोधून काढले. संधिवाताच्या रुग्ण घोड्यांत आणि माणसांतही विकारग्रस्त संधिद्रवाच्या जागी हायल्युरॉनिक आम्ल अंत:क्षेपित केल्यास एकूण संधिद्रव प्रमाण वाढून वेदना शमतात आणि सांध्याची हालचाल सुलभ होऊन रोग बरे होण्यास मदत होते. मोठ्या प्रमाणात अतिशुद्ध रूपातील हायल्युरॉनिक आम्ल निर्मितीसाठी त्यांनी बायोट्रिक्स नावाची एक लहानशी उत्पादक कंपनी स्थापली. त्यांनी कोंबड्यांच्या तुऱ्यांपासून हायल्युरॉनिक आम्ल उत्पादन किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र फार्मासिया या व्यावसायिक औषध निर्माण कंपनीने उत्पादन आणि वितरण स्वतःकडे घेतले. त्यामुळे डोळ्यातील काचाभ द्रवपदार्थाची कमतरता आणि गुडघ्याच्या संधिवाताच्या रोग्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यांनी काही काळ कोलंबिया प्रेसबायटेरियन मेडिकल सेंटरच्या नेत्रचिकित्सा विभागाचे संचालक या नात्याने काम पाहिले (१९७५—८२). पुढे माल्कम आल्ड्रिच प्राध्यापक म्हणून त्यांनी कोलंबियातील संशोधन सेवानिवृत्तपर्यंत सुरू ठेवले. निवृत्त होण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:ची बायोमॅट्रिक्सही कंपनी काढली आणि हायल्युरॉनिक आम्लाची सहा नवी वेगवेगळी उत्पादने बाजारात त्वचा आणि संधिविकारांवर उपलब्ध करून दिली. बायोमॅट्रिक्स कंपनी विकून मिळवलेल्या निधीतून त्यांनी मॅट्रिक्स बायॉलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे हायल्युरॉनिक आम्लावरील संशोधन कार्य चालू ठेवले.
बोल्यॅश यांनी नेत्र क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी एक्सपेरिमेन्टल आय रिसर्च हे नियतकालिक सुरू केले. त्याचे त्यांनी एकोणतीस वर्षे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. त्यांच्या पुढाकाराने इंटरनॅशनल सोसायटी फॉर आय रिसर्चची स्थापना झाली. या संस्थेचे कार्यकारी सचिव तसेच नंतर अध्यक्ष या नात्याने त्यांनी काम पाहिले. त्यांनी केवळ हायल्युरॉनिक आम्ल या विषयाला वाहिलेली इंटरनॅशनल सोसायटी फॉर हायल्युरॉनॅन सायन्सेस ही संस्था स्थापना केली आणि तिच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी दिलेल्या मोठ्या देणगीतून स्वीडनमधील स्टॉकहोम येथील कॅरॉलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये उद्यमशीलता आणि सृजनशीलता या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्राध्यापकपद निर्माण करण्यात आले. त्यांच्या संशोधकवृत्तीचा आणि सर्जनशीलतेचा न्यूजर्सी इन्व्हेटर्स हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून गौरव करण्यात आला आहे (२०१२).
बोल्यॅश यांचे सेंट ट्रोपेझ फ्रान्समध्ये निधन झाले.
कळीचे शब्द : #संधिवात #हायल्युरॉनिक आम्ल
संदर्भ :
- https://www.nytimes.com/2015/09/04/health/endre-a-balazs-doctor-who-found-acid-to-treat-arthritic-knees-dies-at-95.html
- https://pubs.acs.org/doi/10.1021/acs.biomac.0c00045
- https://ishas.org/
- https://en.wikipedia.org/wiki/Hyaluronic_acid
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
