प्राचीन मेसोपोटेमियन देव. ॲसिरियन आणि बॅबिलोनियन धर्मांमध्ये त्याला वादळ, मेघगर्जना, पर्जन्य, हवामान आणि सुपीकता यांचा प्रमुख देव म्हणून मानले जाते. सुमेरियन भाषेत त्याला इश्कुर, अकेडियन भाषेत अदाद, ॲमोराइट भाषेत अद्दू आणि पश्चिम सेमिटिक भाषेत हदाद म्हणून ओळखले जाते. ‘हदाद’ याचा अर्थ ‘तोडणे’ किंवा ‘नष्ट करणे’ असा होतो. तो ‘हद्दा’ या अरबी शब्दाशी संबंधित आहे. हे एक क्रियापद असून, मूलतः ते एका भीषण वादळासाठी वापरले जात असे. त्याला अनेकदा आकाशदेव अनूचा पुत्र मानले जात असे. काही ठिकाणी त्याची पत्नी शाला मानली जाते. ती शेती, धान्य आणि सुपीकतेशी संबंधित असलेली देवी होय.

अदाद हा वादळांचा देव असल्यामुळे त्याच्या हातात वीजेचे चिन्ह, गदा किंवा वज्रसदृश अस्त्र दाखविले जाते. बैल त्याचे वाहन असल्याने कधी कधी त्याला बैलावर उभे असलेले दाखविले जाते. त्याचे प्रतीक म्हणजे त्याच्या हातात असलेली वज्र किंवा दुहेरी डोक्याची वीज. ॲसिरियन आणि बॅबिलोनियन देवगणांमध्ये, विशेषतः इ.स.पू.च्या पहिल्या सहस्रकात, त्याला उच्च स्थान होते. शामाश (सूर्यदेव) सोबत त्याला न्याय आणि भविष्यवाणीचा देव मानले जात असे.

अदाद हा पर्जन्य व सुपीकतेचा देव असल्याने उत्तर सिरिया आणि मेसोपोटेमिया यांसारख्या पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रदेशात राहणाऱ्या लोकांकडून त्याची पूजा केली जात असे. त्यामुळेच त्याला ‘समृद्धीचा स्वामी’ म्हटले जात. सोबतच विनाशकारी पुरांचा देव म्हणूनही त्याची पूजा केली जात.

बॅबिलोनिया, आशूर आणि सिरियातील अलेप्पो येथे तो भविष्यवाणी आणि ज्योतिषशास्त्राचा देव मानला जाई. अदादचे कोणतेही विशिष्ट उपासनाकेंद्र नव्हते, मात्र मेसोपोटेमियातील बॅबिलन आणि आशूरच्या राजधानीसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये त्याची पूजा केली जात असे. स्मारके आणि मुद्रांवर अदादला वीज आणि गडगडाटासह चित्रित केले आहे. त्याला ‘रममन’ या नावानेही ओळखले जाते, ज्याचा अर्थ ‘गडगडाट करणारा’ असा होतो. उत्तर सिरियामध्ये, पर्वतांच्या शिखरांवर आणि आकाशात त्याच्या दर्शनामुळे, तो ‘स्वर्गाचा बाल’ म्हणजे स्वर्गाचा स्वामी, प्रभू किंवा जेबेल अल-अक्राचा स्वामी म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्यामुळे वादळाचा देव आणि पर्वताचा देव यांच्यातील फरक अस्पष्ट झाला. त्याच्या पंथीय महत्त्वामुळे ‘बाल’ हे नाव वायव्य सेमिटिक प्रदेशांमध्ये, जसे की – फोनिशियातील युगाट आणि एमर आणि कनानमध्ये, अनेकदा वापरले जात असे.

प्राचीन बॅबिलोनियन काळात अलेप्पो येथील हदादच्या मुख्य मंदिरात ज्या शस्त्राने त्याने समुद्रावर प्रहार केला ते शस्त्र ठेवलेले होते, जे एक मौल्यवान अवशेष मानले जात असे. युगाटिक पौराणिक ग्रंथांमध्ये ‘यम’ असे संबोधलेल्या, हदादच्या समुद्राविरुद्धच्या लढाईच्या स्मरणार्थ ते उभारले होते. या ग्रंथांमध्ये लढाईचे तपशीलवार वर्णन आले आहे. अदादची तुलना वैदिक परंपरेतील इंद्र, ग्रीक परंपरेतील झ्यूस आणि नॉर्स परंपरेतील थॉर यांसोबत केल्याचे दिसते.

संदर्भ :

  • Dalley, Stephanie, Myths from Mesopotamia, Oxford, 2000.
  • Driver, Godfrey Rolles; Gibson, John C. L. Canaanite Myths and Legends, Edinburgh, 1978.
  • Green, Alberto R. W. The Storm-God in the Ancient Near East, Eisenbrauns, 2003.
  • Rabinowitz, Jacob, The Faces of God : Canaanite Mythology As Hebrew Theology, Washington DC, 1998.
  • कुलकर्णी, वि. ग. ‘प्राचीन पश्चिम आशियाचा इतिहास’, पुणे, २०१२.

समीक्षक : आनंद गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.