चलन विनिमय दर हा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. स्वदेशी चलनाचा विनिमय दर सुधारल्यास आयात तुलनेने स्वस्त होते. त्यामुळे आयातदारांना अधिक फायदा होतो, तर निर्यातदारांना काही प्रमाणात नुकसान होते, ही सर्वसामान्य स्थिती होय. त्याच प्रमाणे विदेशी चलनाची बचत होऊन व्यापारतोल सुधारण्यास मदत होते; परंतु दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारातील घडामोडीत असे घडेलच असे सांगता येत नाही; कारण आयात स्वस्त झाल्यास आयात होणाऱ्या वस्तूंच्या संख्येत वृद्धीदर्शक बदल घडून येतात, तर दुसऱ्या बाजूस निर्यात वस्तूंच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दीर्घकालीन व्यापार घडामोडीत होणारे बदल विदेशी चलन साठ्यावर परिणामकारक ठरतात. विदेशी चलन साठ्याच्या दुहेरी परिणामांचे गांभीर्य सर्वप्रथम १९७० च्या दशकात नेदर्लंड्स या यूरोपीय देशाने अनुभवले आणि त्यानंतर कोलंबियाने. आंतरराष्ट्रीय व्यापारात एखाद्या देशात नैसर्गिक साधन सामग्रीसंबंधी विशिष्ट उद्योगाची अचानक भरभराट झाली, तर त्याचे नकारात्मक परिणाम दुसऱ्या उद्योगांवर होतात. या व्यापारविषयक आजारास डच आजार असे म्हटले जाते. नेदर्लंड्स या डच देशात असा परिणाम सर्वप्रथम अनुभवास आल्यानंतर १९७७ मध्ये इकॉनॉमिस्ट या अर्थविषयक नियतकालिकाने ʿडच आजारʾ ही संज्ञा पहिल्यांदा वापरात आणली.

नेदर्लंड्स देशाच्या उत्तरेकडील सागरी क्षेत्रात १९६०-७० च्या दशकात मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचे (खनिज तेलाचे) साठे सापडले. त्यामुळे नेदर्लंड्सच्या पारंपरिक निर्यातीत बदल होऊन खनिज तेलाच्या निर्यातीतून त्या देशास खूप मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाचा लाभ झाला. परिणामी देशाच्या चलन विनिमय दरात सुधारणा झाली. आयात स्वस्त झाल्याने आयात वस्तूंची संख्यात्मक वृद्धी झाली आणि दुसरीकडे अन्य उद्योगांकडे दुर्लक्ष झाल्याने वस्तू उत्पादनात घट झाली. परिणामी उद्योगांतील रोजगारात घट होऊन देशांतर्गत वस्तूंच्या किमती वाढल्या. निर्यातीवरही विपरीत परिणाम घडून आला. म्हणजेच, एका उद्योगासाठी जी बाब लाभदायक ठरली, तिच्यामुळे इतर उद्योगांसाठी ती विपरीत परिणामकारक ठरली.

डच आजाराची लक्षणे सुरुवातीच्या काळात लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे हा आजार दीर्घकालीन उद्योग-व्यापार घडामोडींमध्ये आढळून येतो. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्पेनमध्ये अमेरिकेतून आलेली संपत्ती आणि इ. स. १८५० साली ऑस्ट्रेलियात सापडलेल्या सोन्याच्या खाणी यांमुळे निर्माण झालेला डच आजार समजण्यास बराच काळ लोटला.

डच आजाराचे परिणाम : एखाद्या देशाच्या चलनाचे विनिमय मूल्य वाढल्यामुळे परंपरागत वस्तूंच्या निर्यात क्षमतेवर परिणाम होतो. पर्यायाने अशा निर्यातक्षम उद्योग-व्यापारावर विपरीत परिणाम होतात. डच आजारामध्ये खनिज तेलाच्या निर्यात वृद्धीमुळे या उद्योगातील कामगारांचे उत्पन्नसुद्धा वाढले; मात्र अन्य उद्योगांतील कामगारांचे उत्पन्न स्थिर राहिले अथवा कमी झाले. त्यामुळे अन्य उद्योगांतील कामगारांसुद्धा अधिक मजुरी द्यावी लागली. भारतामध्ये एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस संगणक प्रणाली आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांची निर्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने या क्षेत्रातील कामगारांना मोठमोठ्या वेतनाची संधी मिळू लागली. त्यामुळे शासकीय आणि इतर उद्योगांतील कामगारांच्या वेतनात तुलनेने मोठी तफावत निर्माण झाली. परिणामी सार्वजनिक व इतर उद्योगांतील अनेक अभियंते, शास्त्रज्ञ आणि कुशल कामगार माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळल्याचे दिसते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील आणि इतर उद्योगांनासुद्धा तुलनेने वेतनदरात मोठी वाढ करावी लागली. अशा प्रकारच्या वृद्धीक्षम रोजगारातील कामगारांच्या उत्पन्नातील वाढीमुळे त्यांच्या खरेदी क्षमतेत वृद्धी होते. परिणामी वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे इतर पारंपरिक उद्योगांतील कामगारांवर त्याचा परिणाम होतो. उदा., आपल्या देशात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासामुळे २००५ पासून पुणे, बेंगलुरू, हैदराबाद येथील स्थावर मालमत्तांच्या किमतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी इतर उद्योगांतील सर्वसामान्य कामगार वर्गाला घर खरेदी करणे कठीण झाले.

डच आजाराचे निराकरण : डच आजाराचे निराकरण करण्यासाठी दोन प्रकारच्या प्राथमिक धोरणांची मदत होते :

  • (१) देशांतर्गत चलन मूल्य वृद्धी : डच आजाराचे निराकरण करण्यासाठी किंवा त्याच्या दुष्परिणापासून बचाव करण्यासाठी देशांतर्गत चलन मूल्याची वृद्धी करणे, ही एक सोपी आणि अधिक व्यवहार्य रणनीती आहे. याकरिता सार्वभौम संपत्ती निधी तयार केली गेली पाहिजे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि रशिया या देशांसह अनेक विकसित आणि विकसनशील देश मोठ्या सार्वभौम संपत्तीचे व्यवस्थापन करतात. या सार्वभौम संपत्ती फंडाचे उद्दिष्ट अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाची आवक स्थिर करण्याचे आहे, ज्यामुळे अधिक धोके रोखून महत्त्वपूर्ण चलन वृद्धी होऊ शकेल आणि अर्थव्यवस्थेत विविधता आणण्यास मदत होईल.
  • (२) अर्थव्यस्थेचे विविधीकरण : अर्थव्यवस्थेचे विविधीकरण हे एक असे धोरण आहे की, जे डच आजाराचा अर्थव्यवस्थेवरील नकारात्मक परिणाम दूर करू शकते. अर्थव्यवस्थेत पिछाडीवर असणाऱ्या क्षेत्रांना अनुदान देऊन किंवा देशांतर्गत उत्पादकांना आधार देण्यासाठी दरांचे विविधीकरण करून आर्थिक विविधीकरण साध्य करता येते.

थोडक्यात, डच आजार हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चलन विनिमय दरातील बदलांमुळे देशांतर्गत उद्योगांवर परिणामकारक असतो. डच आजार सर्वप्रथम नेदर्लंड्स या डच देशात आढळून आला. त्यानंतर तो ब्रिटन, रशिया, कॅनडा यांसारख्या देशांतही विविध कारणांमुळे आढळून आला.

संदर्भ : गोविलकर, विनायक, अर्थजिज्ञासा, पुणे, २०१४.

समीक्षक : संतोष दास्ताने


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.