पुष्पा द्रविड

द्रविड, पुष्पा शरद : (२३ नोव्हेंबर १९४१). प्रसिद्ध भारतीय चित्रकार आणि शिल्पकार. पुष्पाताईंचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे विद्यासंपन्न कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण श्रीधर काळे हे प्रख्यात मानसोपचार तज्ञ होते. त्यांच्या आईचे नाव मनोरमाबाई काळे त्या गृहिणी होत्या. या दांपत्यास तीन मुलगे आणि पुष्पा ही मुलगी. पुष्पाताईंचे प्राथमिक शिक्षण इंदूरमध्ये झाले. त्यांचे वडील मानसोपचाराच्या उच्चशिक्षणासाठी डब्लिनला गेले. ते तेथून परतल्यानंतर हे कुटुंब ग्वाल्हेरला स्थायिक झाले. त्यानंतर पुष्पाताईंचे पुढील शिक्षण ग्वाल्हेरमध्ये झाले. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी लक्ष्मी सिंह (एल.एस) राजपूत यांच्याकडे चित्रकलेचे अनौपचारिक धडे घेतले. ग्वाल्हेर येथील कमला राजा कन्या महाविद्यालयात त्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला. याच दरम्यान शासकीय कला महाविद्यालयात चित्रकलेसाठीच्या सात वर्षांच्या राष्ट्रीय पदविका अभ्यासक्रमासाठीही प्रवेश घेतला आणि दोन्हीही अभ्यासक्रम यशस्वी रीतीने पूर्ण केले (१९५४—६५). उज्जैन येथून त्यांनी फाइन आर्ट्समध्ये एम.ए. केले (१९६६). त्यावेळी मध्यप्रदेशातून एकाचवेळी एम.ए. विथ फाइन आर्ट्स आणि सात वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. शिक्षण घेत असतानाच त्या विविध चित्रकला स्पर्धांमध्येही भाग घेत असत. बाटिककाम, बांधणीकाम, भरतकाम, लोकरीचे विणकाम, उठावरेखन (एम्बॉसिंग) व पक्व मृदेच्या (टेराकोटाच्या) वस्तू बनवणे यामध्ये त्यांना विशेष गती होती.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुष्पाताईंचे भारतात निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्र चित्र प्रदर्शन भरवणे तसेच सांघिक चित्र प्रदर्शनात भाग घेणे सुरू होते. १९६६-६७ या कालावधीत इंदूरच्या न्यू डिग्री कॉलेजमध्ये त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. विवाहानंतर १९६७ मध्ये त्या बेंगळुरु (बेंगलोर) येथे स्थायिक झाल्या. तेथील स्थानिक भाषा कन्नड त्यांना येत नव्हती. या परप्रांतात कलाक्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. दिल्लीच्या ‘ललित कला अकादमीच्या’ बेंगळुरु येथील प्रदर्शनात त्यांनी आपली चित्रे मांडली. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रशियन वंशाचे भारतीय चित्रकार स्वेतोस्लाव्ह रोरिच आणि त्यांच्या पत्नी भारतीय अभिनेत्री देविका राणी यांनी केले होते. पुष्पाताईंच्या चित्रांचे त्यांनी खूप कौतुक केले. तसेच स्थानिक वृत्तपत्रांतही याबद्दल माहिती आलेली होती. या प्रदर्शनात भेटलेले विश्वेश्वरय्या संग्रहालयाचे अध्यक्ष माणिकम्य यांच्या मार्गदर्शनाने पुष्पाताईंनी बेंगळुरु विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदासाठी अर्ज केला. उत्तम शैक्षणिक योग्यतेमुळे त्यांना तेथे लगेच नोकरी मिळाली. त्यांनी वास्तुशास्त्रातील किचकट तंत्रज्ञान स्वतः अभ्यासपूर्वक समजावून घेऊन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली, लवकरच त्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या पी.डी. मॅडम बनल्या. त्याकाळी त्या महाविद्यालयामध्ये शिकवणाऱ्या त्या एकमेव स्त्री प्राध्यापिका होत्या. तसेच बेंगळुरुमध्ये स्कूटर चालवणाऱ्या मोजक्या महिलांपैकी त्या एक होत्या. बेंगळुरु विद्यापीठाच्या स्थापत्य कला विभागात सुमारे तेहतीस वर्षे त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. याच विद्यापीठातून त्यांनी चुडामणी नंदगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘डॉक्टर निकोलस रोरिच आणि त्यांची हिमालय पेंटिंग्स’ या विषयातून पीएच.डी. मिळवली (२०११). कर्नाटकातून फाइन आर्ट्समधील पीएच.डी. मिळवणाऱ्या त्या पहिल्या चित्रकार.

१९७१ मध्ये कर्नाटक सरकारने श्रवणबेळगोळच्या जैन मंदिराच्या भिंतींवरील व छतावरील भित्तीचित्रांची प्रतिकृती चित्रे बनवण्यासाठी काही प्रतिथयश चित्रकार निवडले. यात पुष्पाताईंची निवड करण्यात आली. पुष्पाताईंनी हे काम उत्तमप्रकारे केले. आजही ती चित्रे कर्नाटक कला अकादमीमध्ये सुरक्षित ठेवली आहेत. म्हैसूरच्या दसरा महोत्सवामध्ये त्यांच्या चित्रांना १९६८ ते १९७२ अशी सलग पाच वर्षे पारितोषिके मिळाली. पुढे त्यांनी इतर चित्रकारांना संधी मिळावी म्हणून या स्पर्धेत भाग घेणे बंद केले होते. त्यांनी १९७२-२०२४ या कालावधीत भारतभर अनेक स्वतंत्र चित्रप्रदर्शने केली. त्यांच्या दिल्ली, चंदीगढ, बेंगळुरु, मुंबई, कोलकाता, कोचीन, ग्वाल्हेर अशा विविध ठिकाणच्या प्रदर्शनातील चित्रांचे रसिकांनी भरभरून कौतुक केले. परदेशात त्यांचे चित्र प्रदर्शन कॅलिफोर्निया (१९९९), भारतीय विद्या भवन, लंडन (२०००), टेक्सास (२००४) इत्यादी ठिकाणी भरवण्यात आले होते. ऑल इंडिया स्टेट एक्झिबिशन, दिल्ली; कालिदास चित्रकला प्रदर्शन, उज्जैन; कला विथिका, मध्यप्रदेश अशा अखिल भारतीय पातळीवरच्या विविध कलाप्रदर्शनात प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रांना अनेक पारितोषिके मिळाली.

पुष्पाताईंच्या चित्रांमध्ये विषय आणि तंत्राची विविधता आहे. दुर्गा, गणेश आणि मध्य प्रदेशातील टेसू आणि सांझे या लोकोत्सवांवर त्यांची चित्रे आधारलेली दिसून येतात. समीक्षकांच्या मते त्यांच्या चित्रात स्वतंत्र प्रयोगशीलता आणि चिंतनात्मक रंगसंगती दिसून येते. त्यांच्या काही काही चित्रांमध्ये दिवसाच्या ठराविक वेळा दाखवताना पुष्पाताईंनी छायाप्रकाशाच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या रंगांचा खेळ सूक्ष्म रंगछटा अचूकतेने रंगवून घडवून आणला आहे. स्त्रीची क्रियाशीलता, तिच्या आवडीनिवडी, तिने शोधलेले आनंद, तिचे मातृत्व, कर्तव्यनिष्ठा, एकूणच स्त्रीचे जीवनावरचे प्रेम अशा अगणित छटा त्यांच्या चित्रात दिसतात. नजरेचा ठाव घेतील अशा विविध रंगांचा वापर, स्त्री आणि सृष्टी यातील संबंधांचे विविध पदर हे त्यांचे काही चित्र विषय. त्यांच्या चित्रात त्यांनी जलरंग, तैलरंग, ॲक्रेलिक, पेन्सिल, पेस्टल आणि कोलाज इत्यादी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग केला आहे. रंगाच्या वापरावर त्यांचे प्रभुत्व दिसून येते. समर्पक, सूचक आणि भावानुकूल रंगसंगती हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या वस्तूच्या पारंपरिक आणि वास्तव प्रतिमापेक्षा त्यांच्या मन:पटलाला जाणवेल असे त्या वस्तूचे, व्यक्तीचे कलात्मक पातळीवरील सौंदर्य त्या आपल्या चित्रात रेखाटतात. त्यांची मॉडर्न आर्ट शैलीतील चित्रे बोलक्या रंगसंगती आणि त्यांना असलेला समतोल पोत याने प्रेक्षकांना मोहवून टाकतात.

पुष्पाताईंची चित्रे कर्नाटक सरकारच्या अखत्यारीत असलेल्या व्यंकटआप्पा आर्ट गॅलरी, कर्नाटक स्टेट ललित कला अकॅडमी, कर्नाटक स्टेट इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आर्ट गॅलरी, केरळ आर्ट गॅलरी, कोचीन आर्ट गॅलरी इत्यादी संग्रहालयामध्ये समाविष्ट आहेत.

पुष्पाताईंनी दिल्ली येथील चित्र प्रदर्शनातील काही चित्रांत कलात्मक रीत्या उष्णता दिलेल्या प्लास्टिकचा (बर्न प्लॅस्टिक) उपयोग करून मानवी शारीरिक ठेवणीचे कोलाज केले होते. कोची येथील चित्रप्रदर्शनात तानपुरा वाजवणाऱ्या ग्रामीण स्त्रीचे चित्र काढले होते (२००५). त्यात स्त्रीचा अर्धा चेहरा तानपुऱ्याच्या आड होता. स्त्रीला आयुष्यात अनेकदा अव्यक्त रहावे लागते. तरीही ती आनंदाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करते हे दर्शवणारे ते चित्र होय. त्यांच्या ‘इन सर्च ऑफ हेल्पिंग हँड’ या चित्रात पूर परिस्थितीमध्ये झोपडीत अडकलेल्या दोन ग्रामीण स्त्रिया त्यांनी चितारल्या आहेत. ‘फोक म्युझिशियनस’ या चित्रात त्यांनी ग्रामीण स्त्रियांचा वाद्यवृंद ग्रामीण पार्श्वभूमीसह चितारला आहे. ‘बांबू ग्रुव्ह’ हे जंगल आणि तेथे काम करणाऱ्या ग्रामीण स्त्रियांचे सुंदर चित्र आहे. ‘अस्पिरेशन्स’ या चित्रातील स्त्री घरी पाळलेल्या पक्षाबरोबर हितगुज करते आहे. ‘वुमन अँड गोट’ या चित्रात नवजात बकरीचे पिल्लू खांद्यावर घेतलेली एक वात्सल्यमूर्ती ग्रामीण स्त्री आहे. हे चित्र कमीतकमी रंगाचा वापर करून अत्युत्तम प्रभाव साधणारे आहे.

पुष्पाताईंनी अनेक व्यक्तिचित्रे देखील चितारली आहेत. त्यांनी काढलेले बालगंधर्व यांचे व्यक्तिचित्र ‘बेंगळुरु महाराष्ट्र मंडळ’ येथे जतन करण्यात आलेले आहे.

पुष्पाताई या उत्तम शिल्पकार ही आहेत. त्यांनी अनेक भव्य अशी भित्तिशिल्पे वयाची साठी पार केल्यानंतर बनवली आहेत. त्यांची काही विशेष भित्तिशिल्पे पुढीलप्रमाणे आहेत. ‘वासवी विद्यानिकेतन बसवंनगुडी, बेंगळुरू येथील ‘गीतोपदेश’ हे ३० x ७.५ फूट मापाचे भित्तिशिल्प आहे. यात दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत. या त्रिमिती भास देताना त्यांनी मधली भिंत आणि बाजूच्या दोन भिंतीचा वापर कुशलतेने करून घेतला आहे. रथाचे वैभव टेराकोटामधील नक्षीकामाने तर राजरथाची भव्यता आणि व्यक्तिशिल्पांचे दागिने आरसे वापरून दाखवले आहेत. रथांच्या घोड्यांची चपळाई, सौंदर्य, रुबाब यात ठळक रित्या दिसून येतो. ‘यदा यदा ही धर्मस्य’ हा श्लोक देखील यावर कोरला आहे.
‘नॅशनल एरोनॉटीक्स लिमिटेड’च्या कार्यालयामध्ये सिरॅमिक टाइल्स वापरून ३० x ६.५ फूट आकाराचे बनवलेल्या भित्तिशिल्पात निसर्गयात्री पक्षी आणि संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या विमानाची गगनभरारी दाखवून, पक्षी आणि विमान यातील समान धागा दाखवला आहे. तसेच त्यांचे पृथ्वी आणि अंतराळ यांच्याशी असणारे अमीट नाते दाखवले आहे. ‘मेगा आर्ट वर्क’ या नावाने ओळखले जाणारे बंगळुरूच्या ‘चिन्नास्वामी स्टेडियम’वरील दर्शनी भागात असणारे साडेचार हजार चौरस फुटातील भित्तिशिल्प हे त्यांनी तीन वेगवेगळ्या भिंतींवर केलेले आहे. ते सारे मिळून एकसंध दिसावे याकरता या तीनही भित्तिशिल्पांना जोडणारे पट्टीच्या आकाराचे खूप मोठ्या लांबीचे भित्तिशिल्प त्यांनी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये घडवून स्टेडियमचे वातावरण निर्माण केले आहे. चेंडू, बॅट, बॉल आणि सामन्यामध्ये रंगून जावून दाद देणाऱ्या प्रेक्षकांची अनेक उत्थित शिल्पे यात आहेत. यात कर्नाटकचे राष्ट्रीय पातळीवर खेळलेले २२ क्रिकेटपटू यांच्या शिल्पाकृती आहेत. प्रत्येक खेळाडूच्या खेळातील वैशिष्ट्य त्या शिल्पात दाखवली आहेत. एकेका खेळाडूचे शिल्प आठ ते दहा फुटांचे आहे.

ही भित्तिशिल्पे पाहताना प्रेक्षक त्या शिल्पांमधील खेळाडू सहज ओळखतात, इतकी जिवंत भित्तीशिल्पे पुष्पाताईंनी परिश्रमपूर्वक घडवली आहेत. क्रिकेट खेळताना विजेसारखे लवलवणारे खेळाडूंचे चपळ शरीर, त्याचा बांधा, बॅट पकडण्याची पद्धत, पुढे मागे होणारी पावलं, उडणारे केस, बॉल टाकताना, पकडताना आणि बॅटने मारताना बदलणारे स्नायूंचे आकार यात कुशलतेने शिल्पांकित केलेले आहेत. यासाठी त्यांनी पक्वमृदा (टेराकोटा) आणि फायबर ग्लास हे माध्यम व बास रिलीफ पद्धत वापरली आहे. यासाठी त्यांना साडेसहा ते सात वर्षे कालावधी लागला. याशिवायही त्यांची अनेक भित्तिशिल्पे प्रसिद्ध आहेत.

पुष्पाताई ग्वाल्हेर येथील दक्षिणात्य अय्यर कुटुंबातील शरद विश्वनाथ द्रविड यांच्याशी २८ मे १९६७ रोजी विवाहबद्ध झाल्या. शरद द्रविड हे एका व्यावसायिक कंपनीत बेंगळुरुमध्ये अन्न-उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करत होते. तसेच ते क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, हॉकी हे खेळ उत्तम खेळत असत. या सुसंस्कृत दांपत्याला दोन मुले. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविड हे त्यांचे मोठे सुपुत्र आणि त्यांच्या पत्नी विजेता या वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांचे धाकटे सुपुत्र विजय आणि त्यांच्या पत्नी भावना हे दोघेही भारतीय व्यावसायिक कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. कलेतील स्वतःची कारकीर्द घडवत असताना त्यांनी आपला संसार ही यशस्वी रीत्या सांभाळला. संसार, नोकरी आणि आपली कलेतील आवड हा समतोल काटेकोरपणे सांभाळून पुष्पाताईंनी राहुल आणि विजय या दोनही मुलांचे धीरोदत्त, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी जागरुकतेने प्रयत्न केले. हा तोल त्यांनी कसा साधला याचे उत्तर त्यांनी पुढीलप्रमाणे दिले. “इच्छा झाली की चित्र काढायला बसणं वगैरे चैन मला परवडणारी नव्हती. त्यामुळे मी आधीच ठरवले होते की, चित्र काढण्यासाठी किंवा आपल्या आवडीचे कोणतेही काम करण्यासाठी आपली मन:स्थिती केव्हाही तयार करता यायला हवी. मनाचा निश्चय करून कोणता वेळ कोणत्या कामासाठी वापरायचा हे ठरवून त्याप्रमाणे काम करता यायला हवे” हे त्यांचे विचार त्यांचे कामातील सातत्य आणि त्यांचा विविध कलाविष्काराच्या माध्यमातून कलाक्षेत्रात असलेला दीर्घकाळ वावर कसा यशस्वी झाला हे दर्शवितात.

वयाच्या ८५ व्या वर्षीही पुष्पाताईंची कलेची आराधना चालू आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रह’ यांच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, बंगळुरू येथे आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनात त्यांच्या संपूर्ण कला कारकीर्दीतील अनेक चित्रे प्रदर्शित केली गेली. हा त्यांच्या कलेतील तपस्येचा अगदी नुकताच झालेला गौरव होय.

संदर्भ :

  • पटवर्धन, शर्मिला, ‘कॅनव्हास ते वॉल’, पुणे, २०२२.

 समीक्षण : वर्षा देवरुखकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.