हेब्बर, कट्टिनगेरी कृष्ण : (१५ जून १९११–२६ मार्च १९९६). विख्यात आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म दक्षिण कर्नाटकातील उडिपी जिल्ह्यात कट्टिनगेरी येथे झाला. वडील नारायण आणि आईचे नाव सिताम्मा. उडिपी येथील मिशन स्कूलमध्ये त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. हेब्बर अकरा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. हेब्बर वयाच्या पंधराव्या वर्षी ज्या शाळेत शिकत होते, त्याच शाळेत नोकरीला लागले. शाळेत शाकुंतल हे काव्य चित्रांच्या साहाय्याने शिकवताना, शाळा-तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याने त्यांची काही चित्रे पाहिली व त्यांना कलाशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. एकविसाव्या वर्षी त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. नंतर म्हैसूरच्या चामराजेंद्र टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला; पण तेथे त्यांचे मन न रमल्यामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडले व पुढील कलाशिक्षणासाठी ते मुंबईला गेले (१९३३) आणि दंडवतीमठ यांच्या नूतन कला मंदिरामध्ये त्यांचे कलाशिक्षण सुरू झाले. पुढे त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्ट ही पदविका घेतली (१९३८). दंडवतीमठ व जे. जे.मधील ब्रिटिश कलासंचालक जेरार्ड यांना ते गुरुस्थानी मानत. तत्पूर्वी आईच्या आग्रहाखातर त्यांचा विवाह झाला (१९३५). १९३९–४६ या काळात हेब्बरांनी जे. जे. स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून काम केले. त्या काळात त्यांची चित्रनिर्मितीही चालू होती. १९४९ मध्ये ते यूरोप दौऱ्यावर गेले. १९४९-५० या दरम्यान पॅरिसमधील ‘अकादमी ज्यूलियन’मध्ये त्यांनी सहा महिन्यांचे चित्रकलेचे शिक्षण घेतले, तसेच दृक्प्रत्ययवादाचे चित्रणतंत्र त्यांनी आत्मसात केले. त्यानंतर ‘एकोल एस्टीन’ या कलाशाळेत मुद्राचित्रतंत्राचा (प्रिंट मेकिंग) विशेष अभ्यास केला. भारतात परतल्यावर हेब्बर यांनी जवळजवळ पाऊण वर्ष महाबळेश्वर येथे वास्तव्य केले. महाबळेश्वर येथील मुक्काम त्यांना स्वत:चा शोध घ्यायला उपकारक ठरला. कलानिर्मितीच्या पूर्वसंकेतांपासून स्वातंत्र्य घेतल्याने आविष्काराच्या नानाविध दिशा त्यांना गवसू लागल्या. निसर्गातील घटकांचा, रंगरेषा-रचनांचा त्यांनी नव्याने शोध घेतला. महाबळेश्वर ही त्यांची जणू प्रयोगशाळाच ठरली.

कॅटल मार्ट (१९४२), चिकणरंग

जे. जे.मध्ये शिकताना व शिकवत असतानाही हेब्बर यांच्यावर आधुनिक पाश्चात्त्य चित्रकला व भारतीय पारंपरिक कलाशैली या दोहोंचाही प्रभाव होता. या दोन्ही कलाप्रवाहांनी त्यांना आकर्षित केले होते. ब्रिटिश चित्रकार जेरार्ड हे त्या काळात जे. जे. चे कलासंचालक होते. पाश्चात्त्य कलाजगतातील आधुनिक कलाचळवळींचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. दृक्प्रत्ययवादी शैलीत ते चित्रे काढायचे. कलानिर्मितीत व्यक्तिनिष्ठ आविष्कारास ते महत्त्व देत. हेब्बरांच्या एकूण निर्मितीवर याचा परिणाम झाला. रॉयल अकादमीच्या पठडीबद्ध शैलीचे अनुकरण न करता स्वत:चे काहीतरी स्वतंत्र सर्जनशील वैशिष्ट्य निर्माण करावे व कलेतील भारतीयत्व जपावे, अशी जाणीव याचकाळात त्यांना झाली. याच कालखंडात आनंद कुमारस्वामी यांच्या प्रिन्सिपल्स् ऑफ इंडियन आर्ट  या ग्रंथानेही ते प्रभावित झाले. यातूनच जैन चित्रशैली, मोगल लघुचित्रशैली, अजंठा भित्तिचित्रे इ. भारतीय चित्रशैलींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. भारतीय चित्रशैलीतील सपाट रंगलेपन व रेखांकन यांनी ते प्रभावित झाले. भारतीय चित्रशैलीचा पूर्णत: प्रभाव असलेले कॅटल मार्ट (गुरांचा बाजार, चिकणरंग, १९४२) हे त्यांच्या कला-कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील चित्र महत्त्वाचे ठरते. तसेच १९४१ मधील सुवर्णपदकविजेते चित्र कार्ले गुंफा हे पूर्णत: ‘अकादेमिक’ ( काहीसे दृक्प्रत्ययवादी शैलीत) पद्धतीने तैलरंगात रंगविलेले दिसते.

कॉक फाइट (१९५९), तैलरंग

हेब्बर यांची चित्रशैली निरनिराळी वळणे घेत गेली. वस्तुनिष्ठ वा वर्णनात्मक वास्तववादी शैलीपासून ते अमूर्त शैलीपर्यंतचा प्रवास त्यांच्या चित्रांत आढळतो. त्यांच्या चित्रांमध्ये अनेक प्रवाहांचा प्रभाव मिसळला आहे. व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, दैनंदिन जीवनातील प्रसंग वा घटना, पौराणिक विषय इ. नानाविध विषय त्यांनी आपल्या चित्रांतून आशय-विषयाच्या अनुषंगाने तंत्र आणि शैली यांचा वापर करून आविष्कृत केले.

बेगर्स (१९४८), जलरंग

हेब्बर यांच्या सुरुवातीच्या चित्रांत प्रामुख्याने दक्षिण भारतातील ग्रामीण जनजीवनाचे चित्रण दिसते. तसेच त्यांच्या चित्रांवर अमृता शेरगील आणि पॉल गोगँ या चित्रकारांचा प्रभाव दिसतो. १९४६ साली ते दक्षिण भारतातील केरळ प्रांतात चित्रे रंगविण्याकरिताच दौऱ्यावर गेले होते. दक्षिण भारतातील ग्रामीण जीवनाचे व स्त्री-पुरुषांचे त्यांनी केलेले चित्रण वेधक आहे. चिकणरंग (टेंपेरा) आणि तैलरंग या दोन्ही माध्यमांत ते काम करत असत. मेडनहुड (चिकणरंग, १९४६) व सनी साउथ (तैलरंग, १९४६) ही त्या काळातील प्रसिद्ध चित्रे त्यांच्या चित्रशैलीची कल्पना देतात. मेडनहुड या त्यांच्या चित्राला बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक लाभले (१९४७). यूरोपच्या दौऱ्यानंतर त्यांच्या चित्रांत, चित्रशैलीत बदल होत गेले. विशेषत: रचनात्मकता, वैशिष्ट्यपूर्ण रंगलेपन व विषयवैविध्यता त्यांच्या चित्रांत दिसू लागली. १९६० नंतरच्या काळात हेब्बर यांची कला विशेष बहराला आली.

हेब्बर यांची संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव त्यांच्या अनेक चित्रांमधील वेगवेगळ्या विषयांमधून प्रतीत होते. त्यांच्या पूर्वीच्या कष्टमय आयुष्यामुळे सामान्य माणसांबद्दल त्यांना सहानुभूती वाटत होती; ती त्यांच्या चित्रांतूनही प्रकटली आहे. शेतकरी, कामगार वर्ग तसेच ग्रामीण जीवनातील दैनंदिन घटना आदींचे चित्रण त्यांच्या वेगवेगळ्या चित्रांतून त्यांनी प्रभावीपणे केले. हिल स्टेशन (१९६०), बेगर्स, स्लम लाइफ (१९६४), बिल्डर्स (१९५६) हॉलिडे, लॉर्ड ऑफ द लँड (तैलरंग, १९५५), कॉक फाइट (तैलरंग, १९५९) इत्यादी चित्रांतून आपल्याला हा प्रत्यय येतो.

लॉर्ड ऑफ द लँड (१९५५), तैलरंग

हेब्बर यांची एकंदर चित्रसंपदा पाहताना त्यांना वेळोवेळी भावलेल्या विषयांनुसार त्यांच्या आविष्कारांच्या तऱ्हा व शैली बदलत गेलेल्या दिसतात. सामाजिक व सांस्कृतिक सभोवतालाला त्यांनी नेहमीच आपल्या चित्रांतून प्रतिसाद दिला. जीवनातील आनंददायक क्षण, भारतीय सण-उत्सव, धार्मिक विधी, लोकसंस्कृती तसेच ग्रामीण जनजीवनातील विषय यांबरोबरच बांगला देशाचे युद्ध, भोपाळ वायु-दुर्घटना इत्यादी प्रासंगिक घटना हे ही त्यांचे चित्रविषय झाले. त्यांच्या काही चित्रांमधून प्रतीकात्मकता दिसते. १९७०–७२ नंतरच्या काळातील त्यांच्या चित्रांतील अभि-व्यक्तीकरिता त्यांनी अमूर्त शैलीचा आधार घेतलेला दिसतो. वैज्ञानिक शोधांच्या कुतूहलातून आलेली, विशेषत: अवकाश-संशोधनविषयक चित्रे अमूर्तरूपी वाटतात. तसेच ‘एनर्जी’ या विषयांतर्गत पंचमहाभूते या मालिकेतील पाच तत्त्वांचा आविष्कार प्रतीकात्मक पातळीवर करणाऱ्या पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या विषयांवरील चित्रांतून अमूर्तता आणि आध्यात्मिकता याचा एक संयोग साधलेला दिसतो.

संगीत आणि नृत्य हे हेब्बर यांचे जिव्हाळ्याचे विषय. त्यांनी आपल्या काही चित्रांतून संगीत-ध्वनितत्त्व अमूर्ततेतून साकारण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच त्यांच्या रेखाचित्रांतूनही तरल व प्रवाही लयबद्धतेची प्रचिती येते. सिंगिंग लाइन (१९६१) या रेखाचित्रसंग्रहात त्यांच्या रेषेचे विविध तरल, गतिमान आविष्कार पाहावयास मिळतात. शरीरशास्त्रीय रचनेपेक्षा समबद्धयुक्त रेषेचे प्रवाहीपण व सौंदर्यदृष्टी हा या रेखाटनांचा विशेष आहे.

हेब्बर यांच्या चित्रांत रंग आणि रेषा हे दोन घटक महत्त्वाचे दिसतात. त्यांच्या बऱ्याच चित्रांतून रेषात्मक लयीची अनुभूती येते. ‘गॉश’ चिकणरंग या रंग-माध्यमातून त्यांनी काही काम केले असले, तरी तैलरंग माध्यमच त्यांनी आपल्या आविष्कारांकरिता बहुतांशी वापरलेले दिसते. त्यांच्या काही चित्रांतून दृक्प्रत्ययवादी तंत्रशैलीचा प्रभाव दिसतो. चित्राच्या रंगलेपनातून निर्माण झालेला पोत व अवकाशातील रंगांची स्पंदने यांतून हेब्बरांच्या चित्रांना एक वेगळेच परिमाण लाभले आहे.

हेब्बर यांच्या पुढील चित्रांतूनही त्यांच्या चित्रविषयांच्या व्याप्तीची कल्पना येते : शकुंतला (चिकणरंग, १९४५), फोक डान्स (चिकणरंग, १९५४), कन्स्ट्रक्शन (तैलरंग १९५६),  मदर अँड चाइल्ड (तैलरंग १९५८), ड्रमर (तैलरंग, १९६६), ॲट्रॉसिटी (तैलरंग, १९७२), वीणा (तैलरंग, १९७३), फिशर फोक ( तैलरंग, १९७५), हॉलोकास्ट (तैलरंग, १९८०), रिच्युअल्स (तैलरंग, १९८९), बर्थ ऑफ बांगला देश, लातूर, जल, अग्नी (१९८६), नागमंडल (तैलरंग, १९८६), गुलमोहर (तैलरंग, १९९२), इत्यादी.

मदर अँड चाइल्ड (१९५८), तैलरंग

याशिवाय त्यांनी मुंबई आणि कर्नाटक येथे चिकणरंग या माध्यमात काही भित्तिचित्रेही (म्युरल्स) रंगवली. १९६४ मध्ये न्यूयॉर्कमधील कला महोत्सवासाठी मोर ह्या विषयावर चित्रकाच या माध्यमात त्यांनी भित्तिचित्र केले. इलस्ट्रेटेड वीक्ली  यात शिलप्पाधिकारम् या तमिळ महाकाव्यावर आधारित सुनिदर्शने केली. तसेच फिल्म्स डिव्हिजननिर्मित तुलसीदास  या लघुपटासाठीही रेखाचित्रे केली. याशिवाय मौलाना अबुलकलाम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, शंकर दयाळ शर्मा, इंदिरा गांधी आदींची व्यक्तिचित्रेही केली. तसेच चार्ल्स जेरार्ड, चित्रकार के. एच्. आरा यांची व्यक्तिचित्रे आणि त्यांच्या स्वत:च्या आईचे व्यक्तिचित्र यांचेही उल्लेख खास अभिव्यक्तिविशेष म्हणून करता येतील.

कन्स्ट्रक्शन (१९५६), तैलरंग

हेब्बर यांना अनेक पारितोषिके व मानसन्मान लाभले : कलकत्ता अकादमी ऑफ फाइन आर्ट या संस्थेचे सुवर्णपदक (१९४१), बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक (१९४७), सलग तीन वर्षे राष्ट्रीय पुरस्कार (१९५६–५८), म्हैसूर विद्यापीठाची मानद डी. लिट्. पदवी (१९७६), भारत सरकारचे प्रतिष्ठित पद्मश्री (१९६१) व पद्मभूषण हे पुरस्कार (१९८९), तसेच सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार (१९८३) व महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०). दिल्ली येथील ललित कला अकादमीचे (१९८०–८४) ते अध्यक्ष होते.

हेब्बर यांची चित्रे व्हेनिस (१९५५), टोकियो, साऊँ पाउलू (१९५९) अशा अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतून प्रदर्शित झाली. दिल्ली येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ललित कला अकादमी इ. राष्ट्रीय संग्रहालयांत तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांची चित्रे संगृहीत आहेत. दिल्लीच्या रवींद्र भवनात १९७१ मध्ये तसेच १९८० मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे त्यांच्या चित्रांचे ‘के. के. हेब्बर रेट्रॉस्पेक्टिव्ह’ प्रदर्शन झाले. त्यांचे ॲन आर्टिस्ट क्वेस्ट हे पुस्तक, तसेच हेब्बर ही ललित कला अकादमीची पुस्तिकाही प्रसिद्ध आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘के. के. हेब्बर फाउंडेशन’ हे प्रतिष्ठान स्थापन झाले असून त्यामार्फत अनेक कलाविषयक उपक्रम राबविले जातात. स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रकारांत अस्सल भारतीय आशयाची चित्रनिर्मिती करणारे कलावंत म्हणून हेब्बर अग्रस्थानी आहेत. त्यांच्या कन्या रेखा राव यासुद्धा एक समकालीन चित्रकर्त्री म्हणून प्रसिद्ध आहेत.

हेब्बर यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ :

  •  सडवेलकर, बाबुराव, महाराष्ट्रातील कलावंत, पुणे, २००५.