औद्योगिक सांडपाण्याची शुद्धीकरणप्रक्रिया उद्योगाच्या स्वतःच्या जागेवर किंवा सामाईक शुद्धीकरण केंद्रामध्ये केली जाते. ह्या केंद्रांचा आराखडा तयार करताना विचारात घेण्याचे मुद्दे : सध्याचे उत्पादन व भविष्यात त्यात वाढ किंवा बदल होण्याची शक्यता, सध्याच्या आणि भविष्यातील उत्पादनपद्धतीमध्ये आणि त्या अनुषंगाने वापरण्याच्या कच्चा मालात आणि रसायनात होणारे संभाव्य बदल, त्यामुळे सांडपाण्याच्या मात्रेवर आणि प्रतीवर होणारे परिणाम, वरील बदलांमुळे शुद्धीकरणप्रक्रियेमध्ये करावे लागणारे बदल, ज्यामुळे शुद्ध केलेल्या सांडपाण्याची प्रत पूर्ववत मान्यताप्राप्त राहील, इत्यादी.
सांडपाण्याचे शुद्धीकरण केंद्र हे कारखान्याचे अविभाज्य अंग असल्यामुळे त्याचे व्यवस्थापन कारखान्यातील बदलानुरूप असणे आवश्यक असते.
ह्या व्यवस्थापनाचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे करता येते : (१) तांत्रिक (Technical), (२) आर्थिक (Financial), (३) कायदेविषयक (Legal), (४) प्रशासकीय (Administrative), (५)शुद्धीकरण केंद्राची आणि कामगारांची सुरक्षितता (Safety of treatment plant and its operating personnel), (६) शुद्ध केलेल्या सांडपाण्याची शुद्धता व गाळाची प्रत दिलेल्या मानकानुसार आहे आणि ह्या दोन्हींचे निस्सारण पर्यावरणपूरक आहे ह्याची खात्री करून घेणे. (Quality control).
वरील भाग कामाच्या सोयीसाठी केलेले असले तरी त्यांचे परस्परसंबंध अत्यंत जवळचे आहेत.

तांत्रिक : शुद्धीकरण केंद्रातील सर्व यंत्रणा उच्चतम क्षमतेने चालत आहेत हे पाहणे, यंत्रणेची प्रतिबंधक (Preventive), दुरुस्तीसाठी (Curative) आणि पूर्वानुभव शक्यतेनुसार (Predictive) देखभाल करण्यासाठी वेळापत्रक तयार करणे आणि त्यानुसार ती करून घेणे, ह्यासाठी लागणारी रसायने आणि सुटे भाग उपलब्ध करून देणे, शुद्धीकरण टाक्या, नलिका, झडपा, नाले इ. चालू स्थितीत ठेवणे इ.
आर्थिक : यंत्रणा चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, शुद्ध केलेले सांडपाणी, पचवलेला गाळ, उत्पन्न झालेला इंधनवायू इ. विकणे असल्यास त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील ठेवणे, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे इ.
कायदेविषयक : प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर संपर्क ठेवणे, मंडळाकडून आणि/अथवा नगरपालिका, जिल्हा परिषद, ह्यांसारख्या संस्थांकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करणे. जर संबंधित अशासकीय (NGO) संस्थांकडून काही विचारणा झाली तर कारखान्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्याामार्फत योग्य प्रतिसाद देणे.
प्रशासकीय : संपूर्ण यंत्रणेच्या कामाचे दैनिक, मासिक, वार्षिक इ. अहवाल तयार करणे, कारखान्यातील व्यवस्थापकांशी व विशेषतः उत्पादन विभागप्रमुखांशी संपर्क ठेवणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद इ. संस्थांबरोबर पत्रव्यवहार करण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापकांना साहाय्य करणे, शुद्धीकरण यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची नेमणूक, उपस्थिती, प्रशिक्षण इत्यादी बाबींची काळजी घेणे.
शुद्धीकरण केंद्राची आणि कामगारांची सुरक्षितता : केंद्रातील यंत्रणा आणि सुटे भाग, केंद्राचे आवार आणि परिसर ह्यांचे संरक्षण, कामगारांची वैद्यकीय तपासणी, अपघात झाल्यास करण्याचे प्रथमोपचार, गंभीर जखमा असतील तर कामगारांना योग्य त्या इस्पितळात उपचार करून मिळतील ह्याची खबरदारी घेणे, कामगारांना योग्यवेळी रोगप्रतिबंधक लशी टोचून घेण्याची व्यवस्था करणे.
गुणवत्ता नियंत्रण (Quality control) : शुद्ध केलेले सांडपाणी व गाळ नेमून दिलेल्या मानकाबरहुकूम आहेत ना हे तपासणे, यंत्रणेमधील प्रत्येक एकक (unit) उच्चतम क्षमतेने चालत आहे हे पाहणे, यंत्रणेकडे वाहत येणाऱ्या सांडपाण्याची मात्रा आणि गुणवत्ता योग्य आहे हे बघणे, शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांची गुणवत्ता आणि मात्रा बरोबर आहेत ना हे बघणे, ह्या व इतर अनेक गोष्टींसाठी केंद्रामध्ये एक सुसज्ज प्रयोगशाळा असणे अत्यंत आवश्यक असते. तेथील रसायनशास्त्रज्ञाला सांडपाण्याचे, गाळाचे इ. नमुने घेणे, त्यांचे पृथःकरण करणे आणि त्याच्या लेखी नोंदी ठेवणे ही कामे करण्याचे शिक्षण देणे जरुरीचे असते. ह्या नोंदींच्या आधारावर शुद्धीकरण केंद्राच्या कामगिरीचा अहवाल बनवला जातो. ह्या अहवालाची विश्वासार्हता आणि अचूकपणा वाढवण्यास मदत होते ती दैनंदिन कामामध्ये योग्य ठिकाणी स्वयंचलित उपकरणे वापरण्यामुळे. ह्या गोष्टीचा विचार केंद्राच्या व्यवस्थापकाने करणे अगत्याचे ठरते.
संदर्भ :
Operation of wastewater treatment plants. Manual of Practice no.11, Water Pollution Control Federation, Washington, D.C. 20037, 1976.
समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
